जागतिक राजकारणातील संघर्षाची झळ आता थेट सर्वसामान्यांच्या ताटापर्यंत पोहोचली आहे. इराण आणि इस्रायलमध्ये पेटलेल्या युद्धाच्या वणव्यामुळे केवळ खनिज तेलच नाही, तर खाद्यतेलाच्या बाजारपेठेतही मोठी खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने भारतातील खाद्यतेलाच्या किमतींनी अचानक उसळी घेतली असून, येत्या काही दिवसांत तेल आणखी महागण्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या आठवड्यापर्यंत स्थिर असलेले खाद्यतेलाचे दर अवघ्या सात दिवसांत प्रति लिटर ४ ते ५ रुपयांनी वधारले आहेत. मात्र, ही तर केवळ सुरुवात असल्याचे व्यापारी सूत्रांचे म्हणणे आहे. आखाती देशांमधील तणाव असाच कायम राहिल्यास पुढील आठवड्यात खाद्यतेलाच्या किमतीत प्रति लिटर १० ते १५ रुपयांची मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जहाजांची वाहतूक आणि कच्च्या मालाची आवक मंदावल्याचा हा थेट परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अचानक झालेल्या या दरवाढीमुळे गृहिणींचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक बाजारात मागणी कायम असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेमुळे व्यापाऱ्यांनीही सावध पवित्रा घेतला आहे. महागाईचा हा ‘तडका’ बसल्यामुळे आता मध्यमवर्गीय कुटुंबांना तेलाचा वापर जपून करावा लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत.