शाळेत जाताना किंवा येताना आपले मूल सुरक्षित आहे का? हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात घर करून असतो. अंबरनाथमध्ये एका धावत्या खासगी व्हॅनमधून दोन निष्पाप विद्यार्थी खाली पडून जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर, आता राज्य सरकारने झोपेतून जागे होत संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठी ‘क्लीन अप’ मोहीम राबवण्याचे जाहीर केले आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत या मोहिमेची घोषणा करत नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशारा दिला आहे.
अंबरनाथमधील एका इंग्रजी शाळेच्या व्हॅनमधून ७ जुलै २०२५ रोजी दोन विद्यार्थी खाली पडले होते. ही व्हॅन पालकांनी खासगीरित्या लावली होती. या गंभीर घटनेनंतर आमदार रईस शेख आणि इतर सदस्यांनी सभागृहात सरकारला धारेवर धरले. यावर उत्तर देताना मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले की, संबंधित चालकावर गुन्हा दाखल झाला असून आरटीओने कडक कारवाई केली आहे. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आता ‘शिक्षण विभाग, पोलीस आणि आरटीओ’ यांचे संयुक्त पथक राज्याच्या कानाकोपऱ्यात शाळांच्या गाड्यांची झडती घेणार आहे.
आता ‘हे’ नियम पाळणे बंधनकारक!
शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नियमावली अधिक कडक केली आहे. आता प्रत्येक स्कूल बस किंवा व्हॅनमध्ये खालील गोष्टी असणे अनिवार्य असेल.
सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस प्रणाली : विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी.
महिला सेवक : विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला मदतनीस असणे गरजेचे.
चालकांची कडक तपासणी : चालक मद्यप्राशन किंवा अमली पदार्थांचे सेवन करत नाही ना, याची पोलिसांकडून नियमित पडताळणी होईल.
विशेष प्रशिक्षण : वाहतूक कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांशी वागण्याचे आणि आपत्कालीन स्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
परवाना नाही तर वाहन होणार जप्त!
या चर्चेत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी अत्यंत कडक निर्देश दिले आहेत. रिक्षा असो वा बस, विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनासाठी आता ‘स्वतंत्र परवाना’ घेणे बंधनकारक असेल. सीसीटीव्ही आणि जीपीएस सारख्या अटी पूर्ण केल्याशिवाय हा परवाना मिळणार नाही. विशेष म्हणजे, विनापरवाना विद्यार्थी वाहतूक करताना कोणतेही वाहन आढळल्यास ते थेट जप्त करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले आहेत. पालकांनीही आपल्या पाल्यासाठी खासगी वाहन लावताना या नियमांची खात्री करणे आता काळाची गरज बनली आहे.