महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला दोन दशके पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक मुहूर्तावर, मनसेने आता थेट गड-किल्ल्यांच्या राजाकडून म्हणजेच किल्ले रायगडावरून आपल्या भव्य ‘नोंदणी सप्ताहा’चा श्रीगणेशा केला आहे. ‘ज्यांना पक्षात काम करायची जिद्द आहे आणि राजसाहेबांच्या विचारांवर विश्वास आहे, त्या सर्वांसाठी मनसेची दारे आता उघडली आहेत,’ असे आवाहन मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. या मोहिमेमुळे आगामी राजकीय समीकरणांमध्ये मनसेची ताकद कितपत वाढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येत्या ९ ते १९ मार्च या कालावधीत हा नोंदणी सप्ताह संपूर्ण राज्यभर राबवला जाणार आहे. दरवर्षी मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांमध्ये ही नोंदणी पार पडते, मात्र पक्षाच्या विसाव्या वर्षात पदार्पण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात करावी, ही संकल्पना पुढे आली. त्यानुसार, किल्ले रायगडावर छत्रपतींच्या समाधीस्थळी आणि मेघडंबरीला नतमस्तक होऊन या मोहिमेची अधिकृत सुरुवात केली आहे. महाराजांच्या आशीर्वादाने सुरू होणारी ही ‘सदस्यता मोहीम’ कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणारी ठरेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
बाळा नांदगावकर यांनी यावेळी तरुण रक्ताला पक्षात येण्याचे खास निमंत्रण दिले आहे. महाराष्ट्र हितासाठी ज्यांना ज्यांना सक्रिय राजकारणात उतरायचे आहे, त्यांनी या नोंदणी सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे. पक्षाची २० वर्षांची वाटचाल आणि बदलती राजकीय स्थिती पाहता, रायगडावरून होणारी ही नवी सुरुवात मनसेसाठी किती ‘गेमचेंजर’ ठरणार आणि किती नवीन चेहरे मनसेच्या इंजिनावर स्वार होणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.