सातासमुद्रापार मराठी डंका! महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये व्यापार अन् संस्कृतीची नवी युती

0

महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यातील मैत्रीचे नाते आता केवळ सांस्कृतिक न राहता ते आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून नव्या उंचीवर नेण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. ‘महाराष्ट्रातील शेतीमाल, इथेनॉल उत्पादन आणि सौरऊर्जेसह फार्मा क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ अशी ग्वाही पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे मॉरिशसच्या उच्चायुक्त शिलाबाई बप्पू यांनी त्यांची भेट घेतली, तेव्हा या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

या भेटीत केवळ व्यापारावरच नव्हे, तर ‘मराठी’ अस्मितेवरही विशेष भर देण्यात आला. मॉरिशसमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या मराठी वंशाच्या समाजासाठी मराठी भाषा शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि संस्थात्मक संबंध दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रातून मॉरिशसला फळे, भाजीपाला आणि धान्य निर्यात करण्यासाठी राज्याची कृषी पणन यंत्रणा अधिक सुलभ प्रक्रिया राबवणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणे सोपे होणार आहे.

भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ (शेजारी प्रथम) धोरणाला महाराष्ट्राचे पूर्ण पाठबळ असल्याचे सांगत मंत्री रावल यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) सारख्या बंदरांच्या माध्यमातून सागरी वाहतूक आणि थेट परकीय गुंतवणूक (FDI) वाढवण्याचे संकेत दिले. मॉरिशसच्या उच्चायुक्तांनी यावेळी जयकुमार रावल यांना मॉरिशस भेटीचे निमंत्रण दिले असून, आगामी काळात फूड पार्क आणि कोल्ड चेन पायाभूत सुविधांच्या विकासात दोन्ही देश एकत्र काम करताना दिसतील.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech