‘‘जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, तेव्हा केवळ एक कुटुंबच नाही तर संपूर्ण राष्ट्राची अर्थव्यवस्था गती घेते. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिलांचा अर्थव्यवस्थेतील सहभाग अनिवार्य असून, महाराष्ट्रात आगामी वर्षात १ कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास विभागामार्फत आयोजित ‘सक्षम महिला-सशक्त महाराष्ट्र’ या विशेष सोहळ्यात ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे रंगलेल्या या सोहळ्यात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठणाऱ्या राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत ३७ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्यात यश आले असून, २०२६-२७ पर्यंत ही संख्या १ कोटीवर नेली जाईल, ज्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राचे संपूर्ण अर्थचक्र बदलून जाईल.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी महिलांच्या निर्णय प्रक्रियेतील अधिकारावर भर दिला. ‘महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ गौरव नव्हे, तर त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे होय,’ असे त्या म्हणाल्या. तर, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. “एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण आखणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, ‘लाडकी बहीण’ योजनेनंतर आता मनोधैर्य आणि शक्ती सदन सारख्या योजनांची व्याप्ती वाढवून महिलांना उद्योगासाठी अधिक प्रोत्साहित केले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्यात जळगावच्या वैशाली हिवराळे, नाशिकच्या सेजल जडेजा आणि पुण्यातील बागेश्वरी रेड्डी यांच्यासह अनेक रणरागिणींचा गौरव करण्यात आला. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’चे लक्ष्य गाठण्यासाठी महिलांना केवळ लाभार्थी न ठेवता त्यांना ‘मानव संसाधन’ म्हणून विकसित करण्यावर सरकारचा भर असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले.