केंद्र सरकारने घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात केलेल्या भरमसाठ वाढीने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतानाच, आता गॅसच्या तुटवड्यामुळे राज्यातील चुली विझण्याची वेळ आली आहे. सरकारच्या या ‘अन्यायकारक’ धोरणाविरोधात आणि गॅस टंचाईच्या निषेधार्थ उद्या, १२ मार्च रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरमध्ये ६० रुपये, तर व्यावसायिक सिलिंडरमध्ये ११५ रुपयांची मोठी वाढ केली आहे. “एकीकडे महागाईने जनता होरपळत असताना दुसरीकडे दरवाढ करून सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे,” अशी घणाघाती टीका काँग्रेसने केली आहे. केवळ दरवाढच नाही, तर गॅस बुकिंगचा कालावधी वाढल्याने आणि पुरवठा विस्कळीत झाल्याने राज्यातील हॉटेल व्यवसाय आणि खानावळी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आखाती युद्धाचे कारण पुढे करून सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून केंद्र सरकारचा निषेध करतील. “गॅस तुटवडा नाही हा सरकारचा दावा साफ खोटा असून सामान्य माणसाला तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे,” असे सांगत, जोपर्यंत दरवाढ मागे घेतली जात नाही आणि पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे.