श्रीरामपूरची ६ हजार कोटींची जमीन ‘शेल’ कंपनीच्या घशात? वडेट्टीवारांनी विधानसभेत सरकारचा डाव उधळला!

0

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची ४ हजार एकर मौल्यवान बागायत जमीन एका संशयास्पद ‘शेल’ कंपनीच्या घशात घालण्याचा मोठा डाव काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत उधळून लावला. “सरकारला स्वतःचा फायदा करून घ्यायचा असेल, तर ही जमीन खुल्या लिलावात विका, ती मंत्र्यांच्या बगलबच्च्यांना बहाल करू नका,” अशा कडक शब्दांत वडेट्टीवारांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारवर तोफ डागली.

वडेट्टीवार यांनी पुराव्यांसह आरोप केला की, ‘ZR2 ग्रुप होल्डिंग’ या कंपनीला ही ६ हजार कोटींची जमीन देण्याचा घाट घातला जात आहे. विशेष म्हणजे, या कंपनीचे संचालक राज्यातील एका प्रभावशाली मंत्र्यांच्या संस्थांशी संबंधित आहेत. “ज्या कंपनीची उलाढाल अवघी दीड कोटी आहे, ती ३० कोटींचा नफा कसा दाखवते? आणि अचानक १०० कोटींचे भांडवल कुठून येते?” असा सवाल करत त्यांनी या कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमधील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले. उद्योग विभागाने चक्क जीआर बदलून ही जमीन एमआयडीसीमार्फत या बोगस कंपनीला देण्याचा कट रचल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला.

या आरोपांमुळे सभागृहात प्रचंड खळबळ उडाली. यावर उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी बचावात्मक पवित्रा घेत स्पष्ट केले की, या जमिनीबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये घेतला जाईल आणि कोणत्याही चुकीच्या पद्धतीने व्यवहार होणार नाही. वडेट्टीवारांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी लावून धरल्यानंतर, सरकारने या मुद्द्यावर विशेष बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणामुळे आता सत्ताधारी बाकांवर मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून श्रीरामपूरच्या जमिनीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech