एसटी महामंडळात मेगाभरतीचा धमाका! १७,७४२ पदांसाठी लवकरच निघणार जाहिरात

0

एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी आणि नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे रखडलेली ‘लालपरी’ आता पूर्ण क्षमतेने धावण्यासाठी सज्ज होत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत घोषणा केली आहे की, एसटी महामंडळात लवकरच १७ हजार ७४२ पदांची महाभरती केली जाणार आहे. या निर्णयामुळे एसटीच्या ताफ्यात केवळ नवीन बसेसच येणार नाहीत, तर हजारो हातांना हक्काचा रोजगारही मिळणार आहे.

एसटी महामंडळाने सध्या कात टाकण्यास सुरुवात केली असून, ताफ्यातील बसेसची संख्या १४ हजारांवरून वाढवून दरवर्षी ५ हजार नवीन बसेस समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. मात्र, गाड्यांची संख्या वाढत असताना चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची भासणारी मोठी चणचण या भरतीमुळे दूर होणार आहे. विशेष म्हणजे, २०२२ च्या ऐतिहासिक संपादरम्यान ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एसटीची सेवा सुरू ठेवली होती, त्यांना या भरतीमध्ये विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा सन्मान करत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे संकेत मंत्र्यांनी दिले आहेत.

या मेगाभरतीचा प्रस्ताव सध्या वित्त विभागाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, तिथून हिरवा कंदील मिळताच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि युद्धपातळीवर राबवली जाणार असल्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. संपाच्या कठीण काळात ज्यांनी साथ दिली, त्यांना पूर्णवेळ सेवेत सामावून घेण्याच्या मागणीवरून विरोधकांनीही सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला होता. आता १७ हजारांहून अधिक जागांची ही भरती महाराष्ट्रातील बेरोजगारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech