महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाचा ‘रोडमॅप’ तयार; राजभवन ते मंत्रालयापर्यंत हालचालींना वेग!

0

महाराष्ट्रातील उच्च आणि तंत्रशिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता राजभवनापासून मंत्रालयापर्यंत हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकतीच राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची ‘लोकभावन’ येथे भेट घेतली. या भेटीत केवळ शिष्टाचार नव्हता, तर राज्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी आखण्यात आलेल्या एका मोठ्या ‘रोडमॅप’वर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ ची (NEP) राज्यात होणारी अंमलबजावणी हा होता. महाराष्ट्रातील विद्यापीठे आता केवळ पदव्या देणारी केंद्रे न राहता, ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये अव्वल स्थानी कशी झळकतील, यासाठी शासन स्तरावर नेमके काय प्रयत्न सुरू आहेत, याची सविस्तर माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यपालांना दिली. संशोधनाच्या नव्या संधी आणि तांत्रिक शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रम यामुळे राज्यातील विद्यार्थी जागतिक स्तरावर स्पर्धेत टिकतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

विशेष म्हणजे, राज्यपालांनीही महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेचे कौतुक करत, हे नवीन धोरण राज्यातील उच्च शिक्षणाला अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करेल, अशी आशा व्यक्त केली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमुळे आगामी काळात राज्यातील कॉलेज कॅम्पसमध्ये मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech