मतदान २३ एप्रिलला तर ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार
रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.यामध्ये महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि पुणे जिल्ह्यातील बारामती या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.आयोगाकडून आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार मतदान २३ एप्रिल २०२६ रोजी होणार असून मतमोजणी ४ मे २०२६ रोजी केली जाणार आहे.
राहुरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे विद्यमान आमदार व उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी आवश्यक कार्यक्रम जाहीर केला असून मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांचा वापर करण्यात येणार आहे.
मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असेल.याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड आदी कागदपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत.
दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राहुरी आणि बारामती मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ लागू झाली असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती उमेदवार आणि राजकीय पक्षांनी प्रचार काळात तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
जाहीर कार्यक्रमानुसार ३० मार्च २०२६ म्हणजेच सोमवारी निवडणुकीसाठी राजपत्र अधिसूचना जारी केली जाईल.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सोमवार ६ एप्रिल २०२६ अशी निश्चित करण्यात आली असून दाखल झालेल्या अर्जांची छाननी मंगळवार ७ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. तरं उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख गुरुवार ९ एप्रिल २०२६ अशी आहे.त्यानंतर संबंधित मतदारसंघांमध्ये गुरुवार २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान पार पडेल.
मतदानानंतर सोमवार ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बुधवार ६ मे २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले असून या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.