सावधान! खेळणाऱ्या मुलींना उचलले अन्…; घाटकोपरमधील ‘त्या’ बागेत नेमकं काय घडलं?

0

घाटकोपर पश्चिम येथील दामोदर पार्क या ठिकाणी असलेल्या बागेत खेळणाऱ्या ७ वर्षाच्या दोन मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांनी मंगळवारी रात्री हाणून पाडला आहे. या मुलींना बळजबरीने घेऊन निघालेल्या एका अनोळखी व्यक्तीला स्थानिकानी पकडून त्याच्या तावडीतून दोन्ही मुलींची सुटका केली आहे.अपहरणकर्त्याला पार्कसाईड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी अपहरणकर्त्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर पश्चिम येथील दामोदर पार्क, मैत्री को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथे असलेल्या बागेत मंगळवारी रात्री त्याच परिसरातील ७ वर्षाच्या दोन मुली खेळत होत्या, दरम्यान ३५ वयोगटातील एक अनोळखी इसम या बागेत संशयास्पदरित्या फिरत असताना त्याने एका मुलीला उचलून घेतले आणि दुसरीचा हात पकडून तिला ओढत बागेच्या बाहेर घेऊन जात होता. त्याचवेळी इमारतीत राहणारे मोहम्मद जकारिया हे काही कामानिमित्त खाली आले आणि आपली मोटार काढत असताना त्यांनी या मुलींना घेऊन जाणाऱ्या संशयित व्यक्तीला अडवून त्याच्या तावडीतून दोन्ही मुलीची सुटका केली. दरम्यान अपहरणकर्त्याने तेथून पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी त्याला बागेच्या गेटवर पकडून पोलिसांना कळवले.

पार्क साईड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपहरणकर्त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार सरजुप्रसाद केशुलाल बनवासी (वय ३४) असे अपहरणकर्त्याने नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्याचा रहिवासी आहे. या परिसरात प्रथम त्याला नागरिकांनी बघितले असून तो मुलींना कुठे घेऊन जात होता, त्याचा मनसुबा काय होता या बाबत तपास सुरू आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech