पोलादी करिष्मा ( 19 नोव्हेंबर 1917 / 31 ऑक्टोबर 1984)

0

भाऊ तोरसेकर

इंदिरा गांधी हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील इतिहासाचे अपरिहार्य पात्र आहे. ह्या महान महिलेने एकविसाव्या शतकात जाणार्‍या भारताचा पाया घातला आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अडकून पडलेल्या काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्य चळवळीच्या भूतकाळातून बाहेर ओढून आणण्याचे ऐतिहसिक कार्य पार पाडले.इंदिराजींनी समोरची आव्हाने पेलली म्हणून त्यांना पोलादी व्यक्तिमत्त्व साकारता आले. संधीपेक्षा संकटांनी व सहकार्‍यांपेक्षा विरोधकांच्या आव्हानाने त्यांच्यातली अमूल्य गुणवत्ता प्रकट होत गेली आणि देशाला एक पोलादी नेतृत्व मिळू शकले.
…………………………………
मागच्या तीन महिन्यांत राहुल गांधी ह्यांना काँग्रेसच्या भावी नेतृत्वासाठी पुढे करण्याचा खूप प्रयास झाला. त्यांनीही आवेशपूर्ण भाषणाचा खूप आव आणला. पण त्याचा जनमानसावर फारसा परिणाम झाला नाही.

ह्याच दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी आपल्या आजीची आठवण सांगितली. जातीयवादी शक्तींनी व हिंसक राजकारण्यांनी आपल्या दादीला व पप्पाला ठार मारले, असे सांगून राहुलनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावर टीका झाली ती बाजूला ठेवू. पण जो तरूण आज पक्षात आपली निर्विवाद हुकूमत असताना आपल्या आजीची आठवण काढतो आहे; त्याला खरोखरच ती आजी वा तिचे कर्तृत्व कितपत कळले आहे, याचीच शंका येते.

ज्या आजीचा वारसा चालवायला पक्षाने त्याला पुढे केले आहे आणि वारशातून त्याला आज नेतृत्व करण्याची अपूर्व संधी मिळाली आहे; तो वारसा निर्माण करण्यासाठी त्याच आजीने किती कष्ट घेतले व किती धोके पत्करले, याची साधी जाण तरी ह्या मुलाला आहे काय? त्याने ती आजी वा तिचे कष्टप्रद प्रयास समजून घेण्याचा तरी प्रयत्न कधी केला आहे काय, याचीच शंका येते. कारण ज्या पुण्याईवर राहुल गांधी व त्यांची मातोश्री सोनिया गांधी ऐष व मौज करीत आहेत; ती राजकीय पुण्याई संपादन करताना इंदिरा गांधींनी आपल्या जीवनाचे समर्पण केलेले आहे.

पिता पंडित नेहरू ह्यांच्या पुण्याईने इंदिराजींना पक्षात व राजकारणात फक्त संधी मिळाली. पण पक्षात आणि देशात त्यांची अनिर्बंध हुकूमत मात्र चालत नव्हती. ती हुकूमत वा आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांना खूप मोठी झुंज द्यावी लागली होती आणि एकदाच नव्हे तर दोनदा त्यांना त्याच दिव्यातून जावे लागले. त्यांच्या सहवासात राहूनही राहुलना त्या कष्टांची साधी झळही लागलेली नाही. किंबहुना आजच्या राजकारणात नरेंद्र मोदी वा राजकीय घडामोडींचे जे विश्लेषण केले जात असते, ते करणार्‍यांनाही इंदिराजी कळू शकलेल्या नाहीत. मग त्यांना राहुलचे तरी विश्लेषण कसे करता येईल? त्यांना नरेंद्र मोदी तरी कसा ओळखता येईल? त्यासाठी आधी स्वातंत्र्योत्तर कालखंडातील अपरिहार्य ठरलेल्या इंदिराजी समजून घ्याव्या लागतात.

इंदिराजी म्हटले की निदान आजच्या पिढीला तरी त्यांचे महान व्यक्तिमत्त्व आठवते. त्यांनी जिंकलेली बांगलादेशची लढाई, पाकिस्तानचे केलेले तुकडे, किंवा देशावर लादलेली आणीबाणी काँग्रेस पक्षात रुजवलेली घराणेशाही, त्यांच्यासमोर रांगणारे लाचार कॉँग्रेस नेते; इतकेच बहुतेकांना आठवते. पण आपली इतकी निर्विवाद हुकूमत पक्षात व देशाच्या राजकारणात इंदिराजी निव्वळ नेहरू कन्या म्हणून प्रस्थापित करू शकल्या नव्हत्या. त्यांना पक्षांतर्गत राजकारणाने थेट पंतप्रधानपदावर आरुढ व्हायची संधी कोवळ्या वयात मिळाली. पण ते काम सोपे नव्हते किंवा मार्ग निष्कंटक नव्हता. पित्यासोबतचे जुने जाणते पितृतुल्य नेते आणि त्यांच्या मेहरबानीने कठपुतळी म्हणून मिळालेले पद; यापेक्षा इंदिराजींना वारशात अधिक काहीही मिळालेले नव्हते.

आज राहुलच्या इशारा वा तालावर नाचणारा काँग्रेस पक्ष वा कार्यकारिणी इंदिराजींच्या वाट्याला आलेली नव्हती. उलट तीच कार्यकारिणी व पक्षश्रेष्ठी त्यांच्या पायातले लोढणे झालेले होते. जनमानसातून उतरलेला काँग्रेस पक्ष व त्याची फिकीर नसलेले आत्मकेंद्री नेते; ह्यातून वाट काढत काँग्रेसची विश्वासार्हता नव्याने पुनर्स्थापित करण्याचे आव्हान इंदिराजींच्या समोर होते. मात्र, त्यांना त्यात विश्वासाने मदत करू शकतील असे कोणीही सहकारी नव्हते आणि समोर विरोधी पक्षात एकाहून एक मोठे अनुभवी योद्धे शस्त्रास्त्रे परजून सज्ज होते. त्यातून मार्ग शोधत पुन्हा जनतेला काँग्रेसकडे आणणे आणि विरोधी पक्षांच्या हल्ल्याला उत्तर देतानाच पक्षात दबा धरून बसलेल्यांना शह देणे; अशा दोन आघाड्यांवर इंदिराजींना एकाचवेळी लढावे लागत होते.

तशा इंदिराजी स्वातंत्र्यपूर्व काळापासून पक्षात कार्यरत होत्या. स्वातंत्र्योत्तर काळात पिता देशाचे नेतृत्व करीत असताना इंदिराजींनी पक्षाध्यक्ष म्हणूनही काम केलेले होते. देशातले नव्हेत तर जगातले पहिले  निवडून आलेले कम्युनिस्ट सरकार केरळात सत्तेवर असताना त्याला जमीनदोस्त करून तिथे बाहेरून पाठिंबा देऊन अल्पमताचे सरकार सत्तेवर बसवण्याचे डावपेच इंदिराजींनी यशस्वीरित्या खेळून दाखवले होते. म्हणजेच पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी पक्षकार्याचा संघटनात्मक अनुभव गाठीशी बांधलेला होताच. पण त्या सर्वोच्च पदापर्यंत येण्याआधी त्यांनी शास्त्रींच्या मंत्रिमंडळात नभोवाणी मंत्री म्हणून प्रशासकीय अनुभवही मिळवला होता. पण जेव्हा त्यांना गटबाजीने पंतप्रधान पदावर बसवले; तेव्हा त्यांची मुकी बाहुली अशी हेटाळणी झाली होती.

तो काळ नेमका आजच्या इतका अस्थिरतेचा व अराजकाचा होता. काँग्रेसची लोकप्रियता संपलेली होती आणि विरोधकांच्या एकजुटीतून आघाडीच्या राजकारणाला वेग आलेला होता. त्यामुळे दहा राज्यांत काँग्रेसने सत्ता गमावली आणि संसदेतही कसेबसे काठावरचे बहुमत गाठले होते. त्या धक्यातून पक्षश्रेष्ठी बाहेर पडायचा विचारही करीत नव्हते. उलट त्यांच्यातली लठ्ठालठ्ठी सुरूच होती. त्यामुळे एकीकडे विरोधक, दुसरीकडे सरकारची जबाबदारी आणि तिसरीकडे पक्षाचे संघटनात्मक स्वरूप; अशा तीन आघाड्यांवर लढायची वेळ एकाकी इंदिराजींवर आलेली होती. तेव्हा त्यांनी खेळलेले डावपेच आणि दोन गटातील आपल्या विरोधकांना परस्परांच्याविरोधात खेळवून मारलेल्या राजकीय बाजीनेच इंदिराजी हे भारतीय इतिहासातील अजरामर पात्र होऊन गेले.

ज्याने पक्ष, त्याची संघटनात्मक शक्ती किंवा पक्षाचे बलदंड नेते; यापेक्षा देशातल्या सामान्य जनतेशी थेट संपर्क साधून इतिहास घडवला, असे इंदिरा गांधी हे आधुनिक भारतातील ऐतिहासिक पात्र आहे. आज तो इतिहासच बघून प्रत्येकजण त्यांना भारताची पोलादी महिला म्हणू शकतो.पण जेव्हा ही महिला ऐन उमेदीच्या काळात आपले महात्म्य सिद्ध करायला एकाकी झुंज देत होती, तेव्हा तिचे महात्म्य किती लोकांनी मान्य केले होते? इंदिराजींच्या राजकारणाचे व डावपेचांचे कितीसे कौतुक झाले होते? दगडातून देवाची मूर्ती आकार घेते त्यानंतर तिची लोक पूजा करतात, तिच्यासमोर नतमस्तक होतात. पण तो मूर्तीचा आकार घेताना त्या दगडाने सोसलेल्या घावांची दखल कोणी घेत नसतो. इंदिराजी नेमके तसेच व्यक्तिमत्त्व आहे.

पंडित नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाइतका मोठा नेता पुढल्या काळात काँग्रेस पक्षाकडे नव्हता. त्यामुळेच त्यांच्या जागी आलेल्या लहानखुर्‍या लाल बहादूर शास्त्री यांची टवाळी झाली होती. म्हणूनच पाकिस्तानने भारतावर सशस्त्र हल्ला करण्याची आगळीक केली. तिला पुरून उरले तेव्हा शास्त्रींचे व्यक्तिमत्त्व जगासमोर आले. मात्र त्यांचेही आकस्मिक निधन झाले आणि पुन्हा भारतासमोर नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. तेव्हा काँग्रेसमध्ये ज्येष्ठ म्हणावे असे वयाने खूप मोठे दरबारी नेते उपलब्ध होते. त्यांच्यात कर्तृत्वापेक्षा धूर्तपणा अधिक होता.

त्यांच्यातल्या बेबनावामुळे पंतप्रधानपदाची माळ इंदिरा गांधींच्या गळ्यात पडली. मोरारजी गटाला शह देताना इंदिराजी ही गुंगी गुडिया आपल्याच तालावर नाचेल, अशी खात्री होती म्हणून दुसर्‍या गटाने त्यांना पंतप्रधानपदावर आणले होते. त्यासाठी इंदिराजींनी प्रयासही केलेला नव्हता; परंतु पंतप्रधान झाल्यावर त्यांना देशाचे व पक्षाचे भवितव्य आपल्या हाती असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी समर्थपणे परिस्थितीला सामोरे जाण्याची हिंमत दाखवली.

आपापला सत्तालोभ व मतलब साधत बसलेल्या काँग्रेसने त्यांना झुगारून देशाला दिशा देण्याची गरज होती आणि त्यासाठी कालबाह्य विचार करणार्‍या पक्ष नेत्यांनाही बाजूला सारण्याची आवश्यकता उभी ठाकली. तेव्हा इंदिराजींच्या नेतृत्वाचे खरे पैलू चमकू लागले. चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीआधी अल्पकाळ इंदिराजी पंतप्रधान झाल्या आणि नंतरच्या निवडणुकीत पक्षाने नऊ राज्यात सत्ता गमावली. लोकसभेतही तुटपुंज्या बहूमताने सत्ता टिकवली.

निकालांनी काँग्रेस पक्षासमोर प्रश्नचिह उभे केले होतेच. पण विरोधी पक्षांच्या आघाड्यांनी राज्याराज्यात उभे केलेले अराजक, ही देशाच्या स्थैर्याला भेडसावणारी सर्वांत भीषण समस्या होती. ते संकट ओळखून पक्षासह राजकारणाची नवी मांडणी करायला कोणीही राजी नव्हतेच. पण खुद्द काँग्रेस पक्षातही राजकीय सुंदोपसुंदी माजली होती. देशातली जनता हवालदिल व्हावी, अशी राजकीय अराजकाची स्थिती निर्माण झाली होती. आज मागल्या पाच वर्षांतल्या अस्थिरतेने लोक अस्वस्थ दिसतात, तशीच जवळपास स्थिती 1967-69 च्या सुमारास भारतीय समाजात व राजकारणात होती. तिथून मग इंदिरा गांधी ह्या व्यक्तिमत्त्वाची खरी ऐतिहासिक जडणघडण सुरू झाली असे म्हणावे लागेल.

केंद्रात बहुमत असलेल्या काँग्रेस सरकार व पक्षात एकवाक्यता नव्हती. नऊ मोठ्या राज्यांत विरोधी पक्षांच्या आघाडी सरकारांनी रणधुमाळी माजवलेली होती. कधी एका दिवसात तर कधी महिन्याभरात राज्यातली सरकारे बदलत होती. दोन-चार आमदार असलेला छोटासा पक्ष वा नेता सरकारला ओलीस ठेवल्याप्रमाणे मनमानी करीत होता. सकाळी ह्या पक्षात असलेले आमदार संध्याकाळी त्या पक्षात जायचे आणि सरकार बरखास्त करायची पाळी येत होती.

जनता व तिला भेडसावणारे प्रश्‍न-समस्या ह्यांची कोणाला फिकीर नव्हती. दुसरीकडे नक्षलवादाच्या रूपाने दहशतवादी हिंसाचार प्रशासकीय अस्थिरता निर्माण करून राहिला होता. लोकशाहीची इतकी घोर विटंबना भारताने कधी बघितली नव्हती आणि जनताही असल्या सतत चेहरे बदलणार्‍या लोकशाहीला कंटाळले होते.

मात्र त्याला समर्थपणे तोंड द्यायची इच्छाशक्ती देशव्यापी काँग्रेस पक्षही गमावून बसला होता. कारण पक्षाचे नेतृत्व करायला शास्त्रीजी वा नेहरूंसारखे कोणी प्रभावी व्यक्तिमत्व नव्हते. लोकशाहीतही खंबीर नेतृत्व लागते आणि नेताही शेवटी व्यक्तीच असते, पक्षाला, संघटनेला व समाजाला आपल्या मागून घेऊन जाण्याची ज्याच्यात कुवत असते त्याला नेता म्हणतात. जिथे नेता जनमानस ओळखून ते शब्दात व्यक्त करतो आणि त्याच्या शब्द व इच्छाच आपली आकांक्षा असल्याचे जनतेला वाटू लागते; तिथून मग लोकशाही बलवान होत असते. नेहरू व शास्त्रींच्या निधनाने तशा नेतृत्वाची पोकळी निर्माण केली आणि काँगेस पक्षाच्या संघटनात्मक तिजोरीवर पक्षश्रेष्ठी नागोबाप्रमाणे वेटोळे घालून बसले होते.

त्यांना हुसकावून काँग्रेसला पुन्हा लोकाभिमुख बनवण्याची गरज होती आणि तीच देशाचीही गरज होती. कारण ह्या खंडप्राय देशाला एकत्र राखू शकणारा दुसरा कुठला देशव्यापी पक्ष नव्हता. ती काळाची व देशाची गरज ओळखून इंदिराजी पुढे सरसावल्या. त्यांनी प्रस्थापित राजकारण, संकेत व पक्षशिस्तीच्या अवडंबराला झुगारून देत जनतेच्या आशा-आकांक्षांना आपल्याशी जोडण्याची मोहीमच उघडली.

एकाचवेळी कालबाह्य काँग्रेसने त्यांच्या पुराणमतवादाला आणि विरोधकांच्या सत्तालंपटतेने उभ्या केलेल्या अराजकाला भिडण्याचा त्यांचा पवित्रा, त्या कालखंडात राजकीय हाराकिरीच होती. आपली राजकीय कारकीर्द पणाला लावायचा जुगार इंदिराजी खेळायला पुढे सरसावल्या आणि त्यातून आज आपण बघतो त्या ऐतिहासिक पोलादी इंदिराजी साकार झाल्या.

आज आपण आम आदमी पक्षाची तक्रार किंवा मुद्दा बघितला, तर राजकारण्यांची मस्ती हाच आहे आणि ह्या राजकारण्यांना सामान्य माणसाच्या समस्यांची फिकीर उरलेली नाही, असेच भासवून तो पक्ष सत्तेपर्यंत पोहोचला आहे. 1967 सालात मोठ्या प्रमाणात विरोधकांच्या एकजुटीला जनतेचा त्याच कारणास्तव प्रतिसाद दिला होता.

पण संयुक्त आघाडी म्हणून सत्तेवर बसलेल्यांनी कारभाराचा इतका विचका करून टाकला, की त्यापेक्षा काँग्रेसचे स्थिर सरकार बरे म्हणायची पाळी लोकांवर आलेली होती. मात्र त्या जनमानसाचा फायदा घ्यायला काँग्रेस नेते सज्ज नव्हते. संप, बंद, हरताळ, गैरकारभार इत्यादी समस्या आधीच ग्रासलेल्या जनतेला अधिक भयभीत करणार्‍या ठरल्या होत्या. अशावेळी इंदिराजींनी सामान्य जनतेला दिलासा देऊ शकणारी भूमिका घेतली आणि समाजवाद, गरिबी हटाव, अशा घोषणा दिल्या.

त्याला पूरक असे काही धाडसी निर्णयसुद्धा घेतले. चौदा खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण व संस्थानिकांचे तनखे बंद करणे, यांनी सुरुवात केलेल्या इंदिराजींनी पुढे ‘गरीबी हटाव’ अशी घोषणा दिली. त्यात म्हणजे समाजवादाच्या धोरणात आडव्या येणार्‍या स्वपक्षीय बड्या नेत्यांना झुगारण्याचा त्यांचा डाव एक प्रकारे राजकीय हाराकिरीच होती.

अखेर त्यांना श्रेष्ठींनी पक्षातून हाकलण्याचा निर्णय घेतला. पण पक्षातले तरूण नवे नेते त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले आणि एक नवा धाडसी नेता देशाला व जनतेला मिळाला. त्या घोषणांनी गरिबी संपली नाही की लोकांच्या जीवनातले गहन प्रश्न सुटले नाहीत. पण देशाला एकत्र राखू शकणारे व राजकारणासह कारभाराला शिस्त लावणारे नेतृत्व जनतेला मिळाले. त्यातून इंदिराजी हे इतके भव्यदिव्य व्यक्तिमत्त्व उदयास आले, की त्याच्यापुढे देशातला सर्वांत मोठा व जुना देशव्यापी काँग्रेस पक्ष एकदम खुजा होऊन गेला. पक्षातले विरोधक व बाहेरचे राजकीय विरोधक यांना खुबीने परस्परांच्याविरोधात वापरून इंदिराजी मोठ्या झाल्या.

त्यांच्या राष्ट्रीयीकरण, तनखेबंदी व समाजवादी घोषणांनी सुखावलेल्या डाव्या विरोधकांनी काँग्रेसमधील जुन्या नेत्यांच्या विरोधात इंदिराजींना साथ दिली. त्यात जुने काँग्रेस नेते नामोहरम झाले आणि त्यातून आपणच काँग्रेस दुबळी केल्याच्या मस्तीत डावे पक्ष राहिले. पण पक्षातला विरोध संपवल्यावर इंदिराजींनी बाहेरच्या विरोधकांकडे मोर्चा वळवला. गरीबांची ताराणहार अशी प्रतिमा उभारण्यास ज्यांनी हातभार लावला होता, त्याच विरोधकांवर इंदिराजींनी लवकरच मध्यावधी निवडणूक लादली.

तेव्हा त्या काँग्रेसच्या ़फुटीर गटाच्या नेत्या म्हणून समोर आल्या होत्या आणि मतदाराने त्यांनाच कौल देऊन विरोधकांना पाणी पाजले. 1970 अखेर अकस्मात लोकसभा बरखास्त करून त्यांनी मध्यावधी निवडणुका घेतल्या. त्यात त्यांचे पक्षातले व बाहेरचे सर्वच विरोधक बेसावध सापडले आणि त्यांचे पानिपत होऊन गेले. थोडक्यात, 1967 च्या धक्क्यातून काँग्रेस पक्षाला सावरताना आणि आपले प्रभावी व्यक्तीमत्त्व उभे करताना इंदिराजींनी पक्ष संघटना दुय्यम करून टाकली.

देशाचे एकूणच राजकारण व्यक्तिकेंद्री करण्यास हातभार लावला. त्यातच बांगलादेशाची समस्या समोर आली. पाकच्या लष्करशहांनी पूर्व पाकिस्तानात सैनिकी कारवाई केल्याने भारतीय सीमेवर निर्वासितांचा लोंढा आला, त्याला आवरताना त्यात लष्करी हस्तक्षेप करण्याचे धाडस इंदिरा गांधींनी केले आणि पाकचे दोन तुकडे केले. त्यातून त्यांची प्रतिमा जागतिक नेत्याची होऊन गेली. कारण एका बाजूला चीन व दुसर्‍या बाजूला अमेरिका पाकच्या समर्थनाला उभे ठाकले होते.

अमेरिकेने तर भारतावर हल्ला करायला बंगालच्या उपसागरात आरमार आणून उभे केले होते. त्यालाही न डगमगता समर्थपणे तोंड देण्यातून देशाला आधुनिक भारताचे पोलादी नेतृत्व मिळाले, त्याचे नाव इंदिरा गांधी. मात्र, त्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झालेल्या इंदिराजींमधली आई त्यावर मात करून गेली. आपला राजकीय वारसा आपल्याच घराण्याने व मुलाने पुढे चालवण्याच्या अट्टाहासाने त्यांच्या थोरवीला डागाळले. काँग्रेसचीही घसरण त्यातूनच झाली.

बांगला विजय आणि पुढल्या यशस्वी राजकारणानंतर इंदिराजी हुकूमशहा म्हणण्यापेक्षा राजेशाही थाटात वागू लागल्या. घराणेशाही त्यांनी रुजवली आणि तिला खतपाणीही घातले. त्यातून मग त्यांचा राजकीय र्‍हास सुरू झाला होता. त्यातूनच मग आणीबाणी व हुकूमशाहीकडे त्यांची वाटचाल झाली. मात्र त्यांच्यातला लोकशाहीवादी नेता पूर्णपणे मेलेला नव्हता. म्हणूनच अवघ्या दोनच वर्षांत त्यांनी देशात खुल्या निवडणुका घेऊन आपलाच पराभव ओढवून आणला. पण ते त्यांचे दुसरे दिव्य होते. जणू प्रायश्चित्त होते.

इंदिराजी व्यक्तिगत निवडणूक हरल्याच, पण पक्षाचीही सत्ता त्यांनी गमावली. मात्र, त्यांना पराभूत करणारे राजकारणफार काळ देश चालवू शकले नाही आणि त्यांच्याच छत्र छायेत नव्याने उभा राहिलेला काँग्रेस पक्षही स्वत:च्या पायावर उभा राहू शकला नाही. त्यांनीच मोठ्या केलेल्या नव्या काँग्रेसश्रेष्ठींना झुगारण्याची वेळ इंदिराजींवर 1978 सालात आली. तेव्हा पुन्हा प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत इंदिराजी उभ्या ठाकल्या आणि जवळपास शून्यातून त्यांनी आज दिसतो त्या इंदिरा काँग्रेस पक्षाची उभारणी केली. पण आता त्या पक्षाचा स्वातंत्र्यपूर्व वारसा संपलेला होता. नेहरू गांधी खानदानाच्या निष्ठावंतांचा घोळका असेच त्याचे स्वरूप झाले होते आणि मागल्या तीन दशकांत त्याचीच साक्ष आपल्याला मिळते आहे.

काँग्रेसला संकटातून व देशाला दोनदा अराजकातून एकहाती बाहेर काढण्याचे कर्तृत्व इंदिरा गांधी ह्या व्यक्तीपाशी नसते तर आज देशाचा इतिहास व वर्तमान कितीतरी वेगळेच झाले असते. राजीव गांधी, सोनिया गांधी अशी नावे आपण राजकारणात ऐकलीसुद्धा नसती, की राहुल गांधींकडे भावी पंतप्रधान म्हणून कुणा काँग्रेसवाल्याने बघितलेही नसते. इंदिराजी हे म्हणूनच विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील इतिहासाचे अपरिहार्य पात्र आहे. त्याच महान महिलेने एकविसाव्या शतकात जाणार्‍या भारताचा पाया घातला आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अडकून पडलेल्या काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्य चळवळीच्या भूतकाळातून बाहेर ओढून आणण्याचे ऐतिहसिक कार्य पार पाडले.

1970 च्या आसपास दिशाहीन निर्णायकीच्या अवस्थेत  असलेल्या भारताला स्वत:ची ओळख नव्याने करून देण्याचे काम करताना इंदिराजींकडून खूप चुका झाल्या. कधी कधी त्यांच्या अहंकारासमोर तर कधी नाते संबंधांसमोर ह्या पोलादी महिलेला गुडघे टेकावे लागले. पण कितीही त्रुटी व दोष असले तरी इंदिरा गांधी ह्या व्यक्तिमत्त्वाचे ऐतिहासिक कर्तृत्व आणि अपरिहार्यता त्यांचे विरोधकही नाकारू शकणार नाहीत. किंबहुना त्या काळातल्या परिस्थितीने व संकटांनीच हे पोलादी व्यक्तिमत्व घडवले, असे म्हणायला हरकत नसावी. त्यात संकटे, विपरीत परिस्थिती, काळाची गरज आणि त्यांचे तात्कालीन विरोधक अशा सर्वांचा वाटा आहे.

पक्षात त्यांची कोंडी झाली नसती, तर इंदिराजी अशा झुंज द्यायला पुढे आल्या असत्या काय? विरोधकांनी त्यांना चक्रव्युहात फसवायचा प्रयत्नच केला नसता, तर त्यांची लढवय्या वृत्ती अशी झळाळून समोर आली असती काय? इंदिराजींनी समोरची आव्हाने पेलली म्हणून त्यांना पोलादी व्यक्तिमत्त्व साकारता आले. संधीपेक्षा संकटांनी व सहकार्‍यांपेक्षा विरोधकांच्या आव्हानाने त्यांच्यातली अमूल्य गुणवत्ता प्रकट होत गेली आणि देशाला एक पोलादी नेतृत्व मिळू शकले.

त्याऐवजी राहुल वा राजीवप्रमाणे त्यांचा मार्ग निष्कंटक असता, तर इंदिराजींची अपूर्व गुणवत्ता कसोटीला तरी लागली असती काय? इतिहासाने ज्यांना घडवले, अशी जी मोजकी व्यक्तिमत्त्वे असतात, त्यापैकी हे भारताच्या वाट्याला आलेले अजब, महान नेतृत्व होते. परिस्थितीच त्या-त्या संकटावरचा उपाय जन्माला घालते. ती व्यक्ती आपण अगोदर बघत असतो, तेव्हा त्याच्या हातून इतिहास घडेल याची आपल्याला सुतराम कल्पना नसते. पण परिस्थितीच अशी येते आणि घटनाक्रम इतक्या झपाट्याने बदलत जातो की बघता बघता समोरची ती सामान्य व्यक्ती एक असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्या डोळ्यादेखत रूपांतरीत होऊन जाते. आपल्या आकलनापलीकडला अनुभव म्हणून मग आपण त्याला करिष्मा असे नाव देतो.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech