डॉक्टरांचा निष्काळजीपणा की हत्या? १२ वर्षांनंतर ५ डॉक्टरांवर गुन्हा दाखल!

0

शिवाजीनगर येथील मिलेनियम हॉस्पिटल आणि चेंबूरच्या साई हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल १२ वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर आणि जे.जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अभिप्रायानंतर, शिवाजीनगर पोलिसांनी पाच डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, उपचारावेळी संबंधित रुग्णालय नोंदणीकृत देखील नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार नसिम बानू शाह यांचा मुलगा सलमान शाह (वय २३) हा २०१४ मध्ये एका चित्रीकरणावरून परतत असताना अपघातात जखमी झाला होता. त्याच्या उजव्या मांडीचे हाड फॅक्चर झाले होते. ओळखीच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला शिवाजीनगर येथील मिलेनियम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉ. उमेश पिंपळे यांनी सलमानवर शस्त्रक्रिया केली. तक्रारीनुसार, सलमानच्या ऑपरेशनवेळी रुग्णालयाची वीज अर्धा तास गेली होती. अंधारातच शस्त्रक्रिया उरकण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर सलमानची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडत गेली. त्याला प्रचंड रक्तस्त्राव झाला होता, तरीही डॉक्टरांनी त्याला जनरल वॉर्डमध्ये ठेवले. रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने रुग्णाचे सर्व विधी नातेवाईकांनाच करावे लागत होते.

सलमानची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्याला चेंबूरच्या साई हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ‘सेप्टिसेमिया’मुळे (रक्तातील संसर्ग) हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी वारंवार मागणी करूनही दोन्ही रुग्णालयांनी उपचाराची महत्त्वाची १७ कागदपत्रे सादर केली नाहीत. ही कागदपत्रे मुद्दाम नष्ट करण्यात आल्याचा संशय पीडित मातेने व्यक्त केला आहे.

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी सलमानवर उपचार सुरू होते, तेव्हा मिलेनियम हॉस्पिटलची मुंबई महानगरपालिकेकडे कोणतीही नोंदणी नव्हती. याप्रकरणी पालिकेने संबंधित रुग्णालयावर २०१८ आणि २०२४ मध्ये दंडात्मक कारवाई देखील केली होती. शिवाजीनगर पोलिसांनी डॉ. नियाज अहमद खान, डॉ. इम्तियाज अहमद खान, डॉ. उमेश पिंपळे, डॉ. खालीद आणि डॉ. अमित शोभावत यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४-ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू), २०१ (पुरावा नष्ट करणे) आणि मुंबई शुश्रुषा गृह नोंदणी अधिनियम १९४९ च्या कलम ३ व ६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज खिलारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech