‘कॅप्टन’ प्रकरणावरून राज ठाकरेंचा थेट देवेंद्र फडणवीसांना सवाल; श्रेय घेताय, मग पापाची जबाबदारी कोणाची?

0

नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणाच्या ‘टायमिंग’वर गंभीर संशय व्यक्त केला आहे. “जर या प्रकरणाचा भांडाफोड करण्याचे श्रेय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेत असतील, तर हे पाप घडत असताना सरकारला त्याचा सुगावा का लागला नाही?” असा रोकडा सवाल करत राज ठाकरेंनी थेट सत्तेतील घटक पक्षांच्या भूमिकेवरच बोट ठेवले आहे.

श्रेय घेताय, तर जबाबदारीही स्वीकारा अशोक खरातच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्हीच हे प्रकरण शोधून काढले’ असे सांगत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले होते. यावर प्रत्युत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, “हे प्रकरण तुम्हीच शोधून काढले असेल आणि याचा तपास तुम्हीच सुरू केला असेल, तर मग जेव्हा तुमच्याच घटक पक्षातील बड्या नेत्यांभोवती संशयाची सुई फिरत होती, तेव्हा या कृत्यांचा सुगावा का लागला नाही? या विलंबासाठी तुम्हाला दोषी का धरू नये?”

राजकीय महत्त्वाकांक्षांचा बळी? या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठी राजकीय खेळी असल्याचे संकेत राज ठाकरेंनी दिले आहेत. “कोणाच्या तरी राजकीय महत्त्वाकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या फाईलचा वापर केला जात आहे, असे माझ्या कानावर येत आहे,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला. एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली की हे प्रकरण बासनात गुंडाळले जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. राज ठाकरेंचा हा रोख थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

काय आहे ‘शिंदे-खरात’ कनेक्शन? २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले नियोजित दौरे रद्द करून सिन्नरच्या ईशानेश्वर मंदिरात अशोक खरातची भेट घेतली होती. तिथे त्यांनी भविष्यवाणीसाठी हात दाखवल्याच्या चर्चांनी राज्यभर टीका झाली होती. तेव्हापासून सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांची खरातच्या दरबारी हजेरी वाढली होती. ज्या काळात हे नेते भोंदू बाबाकडे जात होते, त्याच काळात महिलांचे लैंगिक शोषण सुरू होते, असे धक्कादायक वास्तव आता समोर येत आहे. राज ठाकरेंच्या या टोकदार प्रश्नांमुळे महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली असून, ‘कॅप्टन फाईल्स’मुळे सरकारमधील कोणत्या बड्या नेत्याची अडचण होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech