भोंदूबाबा अशोक खरातच्या जादुई पाण्याचे पडसाद आता थेट विधीमंडळाच्या सभागृहात उमटले आहेत. “जशी अंधश्रद्धा घातक असते, तशीच अधिकाऱ्यांची ‘अंधबुद्धी’ही लोकशाहीसाठी धोक्याची आहे,” अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आसूड ओढला. आश्वासन समितीसमोर दांडी मारणाऱ्या आणि मंत्र्यांना चुकीची माहिती देऊन फसवणाऱ्या अधिकाऱ्यांची तुलना त्यांनी थेट भोंदू खरातशी केल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली.
५ हजार आश्वासने अधांतरी; रवि राणा आक्रमक
विधीमंडळ आश्वासन समितीचे अध्यक्ष रवि राणा यांनी समितीचा अहवाल सादर करताना प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा पाढाच वाचला. मंत्र्यांनी सभागृहात दिलेली तब्बल ५ हजारांहून अधिक आश्वासने आजही प्रलंबित आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या संदर्भातील बैठकांना वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहत नसल्याने राणा यांनी संताप व्यक्त केला. “यापुढे अधिकारी गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर थेट हक्कभंग आणला जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
लोकशाहीवर ‘जादूचे पाणी’ भारी?
मुनगंटीवार यांनी या विषयाला अधिक धार देत म्हटले की, “केवळ अशोक खरातच मंत्र्यांना फसवतो असे नाही, तर हे अधिकारी म्हणजे खरातचीच आधुनिक रूपे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दिलेली आश्वासने पूर्ण करणार नाही, असे सांगण्यापर्यंत या अधिकाऱ्यांची मजल गेली आहे. जर विधीमंडळाला हे कामचोर अधिकारी घाबरत नसतील, तर कठोर कारवाईची वेळ आली आहे.” जादुई पाणी अशा प्रकारे लोकशाहीवर भारी पडणे चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षांचे कारवाईचे ‘अस्त्र’
या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रशासनाला कडक तंबी दिली. “विधीमंडळ समित्या हा लोकशाहीचा आत्मा आहेत. जर अधिकारी या समित्यांच्या कामकाजात विलंब करत असतील किंवा अनुपस्थित राहत असतील, तर ते मुळीच सहन केले जाणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. यापुढे कोणत्याही समितीने तक्रार केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देशही अध्यक्षांनी दिले आहेत. या निमित्ताने मंत्रालयातील ‘बाबू’गिरी आणि लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांची पायमल्ली पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.