अंकित जैन
पावसाने स्वच्छ धुऊन गेलेल्या रस्त्यांवर, दोन्ही बाजूला हिरवळ लेवून नागमोडी सौंदर्याचा देखणा आविष्कार दाखविणार्या मातीच्या वाटांवरून, फेसाळणार्या दर्याचे तुषार झेलत सागर किनार्याच्या रस्त्यांवरून, अंगावर झरे-धबधबे खेळवणार्या पर्वतराजीच्या कडेने, मातीचे चुंबन घेण्यासाठी खाली उतरलेल्या मेघ वलयांतून बाइक चालवण्याची मजा घेतलीय का तुम्ही कधी? नसेल तर जरूर घ्या.
फिरायला आवडत नाही; असे म्हणणारी माणसे तसं पाहिलं तर विरळाच सापडतील. आपल्या आवडीनुसार प्रत्येकजण फिरायला जातात. फिरणे म्हणजे दूर कुठेतरी परदेशात जाणे, परराज्यात जाणे किंवा खूप खर्च करून पर्यटन करणे असा काही फिरण्याचा अर्थ होऊ शकत नाही.
घराबाहेरचे असे कोणतेही ठिकाण असो की, जिथे गेल्यावर आपले तनमन प्रसन्न होते, त्या ठिकाणी जाणे आणि आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न करवून घेणे म्हणजे फिरणे असे म्हणायला हवे. मी तरी फिरण्याचा असाच अर्थ लावत आलेलो आहे. मला वेगवेगळ्या वाहनांतून प्रवास करायची सवयही आहे आणि आवडसुद्धा! हवाई प्रवास, रेल्वे, जलप्रवास, रस्तेमार्ग, रोप वे. खाण्याची आवड असणार्याला जसे ‘खवय्या’ म्हणतात तसे कुणी मला ‘फिरय्या’ म्हटले तर ते चूक ठरणार नाही.
हेतूपुरस्सर किंवा निर्हेतुकपणे फिरलो तरी मला पुन्हा पुन्हा माझे वय कमी झाल्याचा, मी अधिकाधिक उत्साही झाल्याचा अनुभव मला मिळतो. वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास करणे जरी मला आवडत असले तरीसुद्धा बाइक रायडिंगची मजा काही वेगळीच! पुन्हा पावसाळ्यात बाइकवरून भटकंती करणे म्हणजे तर क्या बात! मी रायगड जिल्ह्यातला असल्यामुळे तर गाडी काढावी आणि कुठेही फिरायला जावे अशी परिस्थिती. सगळीकडे निसर्ग स्वागताला उत्सुक असल्यासारखा. डोंगर रांगा, मोकळे रानमाळ, शेतीशिवार, निळेशार समुद्रकिनारे… कशाचीही वानवा नाही. आपण फक्त तयार असायला हवे. पावसाळी दिवसांत तर बाइकवरून भटकंती करताना आपण आपले राहत नाही, हेच खरे!
90 च्या दशकातले माझे पहिले प्रेम म्हणजे 500 किमी क्षमतेची आकर्षक, दणकट, सीआर इंजिन असलेली ब्रिटीश बनावटीची रॉयल एनफिल्ड! त्यावेळचे ते क्षण, त्या गाडीवरची पहिली रपेट आजही स्मरणातून जाता जाता नाही. किंबहुना कधीच जाणारसुद्धा नाही. ह्या बाइक प्रेमामुळे शाळा-कॉलेजात अनेक मित्र जोडले गेले. नवनव्या गाड्यांविषयी चर्चा व्हायच्या. केवळ चर्चाच होई असे नव्हे तर कॉलेज संपेपर्यंत महाराष्ट्रभर आमची भ्रमंतीसुद्धा झालेली होती. आमच्या ग्रुपने 45 हजार किमी, तर मी एकट्याने 10 हजार किमी प्रवासाचा पल्ला पार पाडला होता. ह्या बाइक प्रवासाने वेगळा आनंद तर दिलाच, पण खूप काही शिकायलासुद्धा मिळाले.
शालेय आयुष्य संपल्यावर एक व्यावसायिक म्हणून मी माझ्या व्यवसायात शिरकाव केला; तेव्हा कामाचा व्याप वाढत गेला. पण अशा परिस्थितीतसुद्धा बाइकिंगसाठी वेळ राखून ठेवणे ही माझी गरज बनलेली. पावसाळ्यात कामाचा ताण तुलनेने कमी असतो; जेवढा वर्षभरात असतो. त्यामुळे पावसाळ्यात उन्मुक्तपणे भटकंती करणे माझ्यासाठी काही फार कठीण नव्हते.
अनुभवी माणसे सल्ला द्यायची की, पावसाळ्यात बाइकप्रवास धोकादायक ठरू शकतो. हे खरे असले तरीही स्वत:ची आणि आपल्या गाडीची काळजी घेण्यासाठी जर तुम्ही सक्षम असलात, तर पावसाळ्यातला प्रवास आनंददायकच असतो. पावसाळ्यातले हे संभाव्य धोके मी मात्र माझ्यासाठी आव्हान म्हणून स्वीकारत आलो.
पुन्हा निसर्ग सभोवती पसरलेला असताना त्याचा अनादर करणे माझ्याच्याने होत नाही. पावसाळ्यात रस्ते निसरडे झालेले असतात हे खरे, पण ह्याच दिवसांत फिरस्त्यांच्या या मनाला नवे कोंब फुटतात. निसर्ग कधी कूस बदलेल; पाऊस कधी झोडपून काढील ह्याचा काही नेम नसतो. पण निसर्गाच्या ह्या लहरीपणाशी जुळवून घेण्यातच तर खरी मौज असते.
पावसाने स्वच्छ धुऊन गेलेल्या रस्त्यांवर, दोन्ही बाजूला हिरवळ लेवून नागमोडी सौंदर्याचा देखणा अविष्कार दाखविणार्या मातीच्या वाटांवरून, फेसाळणार्या दर्याचे तुषार झेलत सागर किनार्याच्या रस्त्यांवरून, अंगावर झरे-धबधबे खेळवणार्या पर्वतराजांच्या कडेने, मातीचे चुंबन घेण्यासाठी खाली उतरलेल्या मेध वलयांतून बाइक चालवण्याची मजा घेतलीय का तुम्ही कधी? नसेल तर जरूर घ्या.
रस्त्यावर साचलेल्या पाण्याला संथ लयीत उडवीत जाण्यातली बहार न्यारीच असते. मात्र, त्या पाण्यात खड्डा लपलेला नाही ह्याची खात्री मात्र जरूर असायला हवी अन्यथा अपघाताला निमंत्रण दिल्यासारखे व्हायचे. रस्त्याच्या कडेला बाइक लावून शेतात चाललेली कामे पाहणेसुद्धा एक सुखदानुभव असतो मित्रांनो! सुनसान रस्त्यांवरून पाऊस झेलत बाइक चालवताना अचानक एखादा भुट्टेवाला नजरेस पडावा किंवा चहाची टपरीवाला… निखार्यावर भाजलेले मक्याचे कणीस काय किंवा ग्लासातली कटींग चाय काय पावसाची चव आणखीनच वाढते. बाइकवरून केलेला असा पावसाळी प्रवास नक्कीच मनाला ताजेतवाने करून टाकतो. पावसाळी प्रवासात आपल्यासाठी, जसा हा पावसाळी प्रवासाचा आनंद महत्त्वाचा असतो, तसे आपल्या घरच्यांसाठी मित्र परिवारासाठी आपण महत्त्वाचे असतो. ते आपल्या सुखरूप परतीची चातकासारखी वाट पाहत असतात.
एवढी काळजी जरूर घ्या
- वेगावर नियत्रंण ठेवा, मजबूत पक्के रस्तेसुद्धा पावसाळ्यात दगा देऊ शकतात. कारण पाणी आणि चिखलामुळे ते निसरडे होतात. तुमचा सरासरी वेग नेहमीपेक्षा ताशी 20 कि. मी. ने कमी करा.
- तुमचे डोळे आणि हेल्मेटचा दर्शनी भाग कोरडा ठेवा. ओलाव्यामुळे आपली दृष्टी धुसर होत असते म्हणून जॅकेटच्या वरच्या खिशात कोरडे हातरूमाल असू द्या.
- ब्रेक्सचा अचूक वापर : वाहन थांबवण्यासाठी उन्हाळ्यात/हिवाळ्यात जी पद्धत वापरता ती थोडी बदला. निर्धारीत स्थळी थांबण्यासाठी काही मीटर आधीपासून रिअर ब्रेक दाबायला सुरुवात करा. अचानक ब्रेक दाबणे टाळा. योग्य वेळी गिअर बदलणेसुद्धा महत्त्वाचे आहे.
- पुढचे ब्रेक : फार काळजी घेऊनच वापर करा!
- अन्य वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवा. रस्ते चकवू शकतात; तसेच अन्य वाहनचालकसुद्धा! म्हणून खबरदार राहा.
पूर्वसूचना: इतर वाहनचालकांना तुमचे अस्तित्व जाणवू द्या. रिफ्लेटर्स, निऑन स्ट्रीप्सचा वापर करा. दृश्यमानता कमी असेल तर हेडलाईट्स चालू करा. - हेल्मेट, रायडिंग जॅकेट, प्रोटेक्टर्स, ग्लोव्हज्, क्नी पॅडस सोबत ठेवा.
(लेखक व्यावसायिक आणि निसर्गप्रेमी पर्यटक आहेत.)