“सध्या देशात आणि राज्यात कोण कुणासोबत आहे, हेच कळेनासे झाले आहे. क्रिकेटच्या आयपीएलमध्ये जसे खेळाडू संघ बदलतात, तशीच आता ‘इंडियन पॉलिटिकल लीग’ सुरू झाली आहे की काय?” असा बोचरा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला लगावला. विधान परिषदेतील ९ आमदारांच्या निरोप समारंभाप्रसंगी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय फोडाफोडीच्या राजकारणावर नाव न घेता जोरदार प्रहार केला.
एकच संघ मजबूत, पण लोकशाहीचे काय?
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या विस्तारवादी भूमिकेवर निशाणा साधताना म्हटले की, सध्या एकच संघ प्रचंड मजबूत होत चालला आहे. “तुम्ही सर्वच खेळाडू आपल्या संघात घेतले, तर मॅच कुणासोबत खेळणार? सुदृढ लोकशाहीसाठी मैदानात प्रतिस्पर्धी संघही शिल्लक असायला हवेत. जर तुम्ही बाकीचे सर्व संघच संपवून टाकले, तर एकटा संघ काय करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राजकारणातील या संभ्रमावस्थेमुळे जनतेचा नेत्यांवरील विश्वास डळमळीत होत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जनतेच्या मनातील विश्वासाचा मुद्दा
राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकतात, अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. ही स्थिती बदलण्याची गरज असल्याचे सांगत ठाकरे म्हणाले, “जनतेला आपल्याबद्दल वाटणारा संशय दूर करून, ‘हे लोक आपल्यासाठी काहीतरी करू शकतात’ हा विश्वास आपण पुन्हा निर्माण केला पाहिजे.” लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही संभ्रमावस्था संपवणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
भावुक निरोप आणि राजकीय टोले
उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे. या निरोप समारंभात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला, मात्र त्याच वेळी राज्याच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करण्याची संधी सोडली नाही. फोडाफोडीचे राजकारण आणि तपास यंत्रणांचा वापर करून नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याच्या भाजपच्या कथित धोरणावर त्यांनी ‘आयपीएल’च्या उदाहरणातून केलेली टीका सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.