‘भोंदू’गिरीचा मंत्रालयाला विळखा; अघोरी पूजेच्या फाईलने सरकारची झोप उडवली!

0

राज्यातील राजकारणात सध्या एका ‘भोंदू’ बाबाच्या अटकेने अभूतपूर्व खळबळ माजली असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्रालयातील बड्या मंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या एका स्फोटक ट्विटनंतर आता सत्ताधारी गोटात मोठी अस्वस्थता पसरली असून, या प्रकरणाची प्रामाणिक चौकशी झाल्यास सरकारमधील डझनभर मंत्री आणि दोन डझन वरिष्ठ अधिकारी तुरुंगाच्या उंबरठ्यावर उभे राहतील, असा दावा केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित भोंदू बाबा अशोक खरात याच्या इशानेश्वर मंदिराला २०१८ मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारकडून तब्बल १.५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, त्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असलेले आणि सध्या म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मिलिंद बोरीकर यांचे या बाबाशी अत्यंत निकटचे संबंध असल्याचे समोर येत आहे. इतकेच नव्हे तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचे या बाबाचे फोटोही आता चर्चेचा विषय ठरत आहेत.

या प्रकरणात सर्वात खळबळजनक दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत केला जात आहे. पाटील यांनी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी या बाबाकडून ‘अघोरी’ पूजा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, या बाबाचे संशयास्पद कारनामे खुद्द देवेंद्र फडणवीस यांना गेल्या सहा महिन्यांपासून माहीत होते. परंतु, मंत्रिमंडळातील सहकारी आणि जवळच्या अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतलेले असल्याने ही फाईल दाबून ठेवण्यात आली होती, असा संशय व्यक्त केला जात आहे.

मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांच्याच मित्रपक्षातील काही नेत्यांनी त्यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी या बाबाच्या माध्यमातून तंत्र-मंत्र आणि अघोरी विद्येचा वापर केल्याचे समजताच, फडणवीसांनी थेट कारवाईचे आदेश दिले. आता या भोंदू बाबाच्या निमित्ताने फडणवीस आपल्याच पक्षातील ‘हितशत्रू’ आणि मित्रपक्षांना ‘ब्लॅकमेल’ करून राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech