हरवलेला मायेचा विसावा

0

एकल अपत्य आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजच्या पिढीच्या शब्दकोशातून ’आजोळ’ हा शब्द आणि त्यातील जिव्हाळा हरवत चालला आहे. पूर्वी संस्कारांचे आणि आनंदाचे विद्यापीठ असलेले मामाचे घर आता डिजिटल गॅझेट्स, आत्मकेंद्रित जीवनशैली आणि पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणामुळे इतिहासजमा होत आहे. नात्यांमधील ओलावा ओसरल्याने पुढची पिढी कौटुंबिक ऊब आणि पारंपरिक मूल्यांना पारखी होत आहे.
…………………………….

श्रद्धा वझे

‘व्हेकेशनमध्ये तू कुठे जाणार?’ ‘मला नाही माहीत’ अद्याप भ्रमणध्वनी नामक यंत्र हातात न आलेली छोटी मुलं इमारतीच्या आवारात खेळत होती, खेळता-खेळता मध्येच घोळका करून एकमेकांशी बोलत होती. सगळीकडे आता परीक्षांचे वारे वाहू लागले आहेत, त्या पार्श्वभूमीवर परिक्षेनंतरच्या सुट्टीतले बेत करत छोट्या मुलांचं शेअरिंग सुरू होतं, पुन्हा दुसर्‍या मुलांनं विचारलं  ‘अरे, म्हणजे तू गावाला जाणार की आऊटिंगला?’ ‘मोस्टली आऊटिंगलाच नेतील पप्पा’, ‘का? गावाला नाही जात तुम्ही सुट्टीत?’ ‘नाही रे’, ‘का?’ ‘कारण आम्हाला गावच नाही’, ‘अरे, तेरा ननिहाल तो होगा?’ एका चुणचुणीत मुलीनं विचारलं  ‘ननिहाल?, वो क्या होता है?’, ‘अरे, तुम्हारे मम्मी के पप्पा का घर, मिन्स तुम्हारे नाना के गाव?’ ‘अरे बाळा, म्हणजे तुझ्या मामाचं घर, तुझं आजोळ… आजोळी जाणार का तू?, असं विचारतेय पिंकी तुला’ आता वॉचमन काका सुद्धा त्यांच्यात सामील झाले आणि त्यांनी ननिहालचा अर्थ मुलांच्या भाषेत त्यांना समजावून दिला. ‘ओह फ्रेंड्स, मला ननिहाल नाही आणि आजोळचं गाव सुद्धा नाही, माझ्या पप्पांना गाव नाही आणि माझ्या मम्मीला पण गाव नाही.’ हिरमुसलेल्या चेहर्‍यानं चिंटू म्हणाला, ‘कोई बात नहीं, मुझे भी गाव नहीं, ननिहाल नहीं, छोडो उस बात को, हम छुट्टीयोंमें एक दुसरे के घर जाकर एक एक दिन रहेंगे’, ‘ओके. चलो लुपाछुपी का खेल स्टार्ट करो’ मग गलका करत ती मुलं पुन्हा खेळायला लागली निरागस मुलांचा तो आपापसातला संवाद ऐकल्यावर माझ्या मनात विचार आला, आत्ताच ही परिस्थिती आहे तर आणखी काही वर्षांनी ‘आजोळ’ हा शब्द शब्दकोशातूनच पुसला जाईल की काय?


आईचं माहेर म्हणजे आजोळ, हे आजच्या एकल अपत्याला कळेल तरी का? आजकाल आईसुद्धा तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी असते. तिचेच वयस्कर पालक, लेकीच्या घराजवळ किंवा तिच्याच घरात राहत असल्यानं, आजोळचा गोड अर्थ मुलांना कळेलच कसा? मामाचं गाव आणि मामाचं पत्र कधीच हरवलं आहे, तसंच आजोळचा वाडा, घरदार, अंगण, विहीर, अंगतपंगत कधीच इतिहासजमा झाली आहे.
एक काळ होता, शाळांना सुट्ट्या लागल्या रे लागल्या की, मुलांना आजोळी जाण्याचे वेध लागायचे, कधी एकदा आजीआजोबांकडे राहायला जातोय असं मुलांना व्हायचं. आजोळ म्हणजे काय असतं हो… नदीवर पोहणं, विहिरींमध्ये उड्या मारणं, अंगणातल्या-परसातल्या झाडाफुलांबरोबर बागडणं, म्हणजे आजोळ. आज्जीला पूजेसाठी पत्री आणि फुलं आणून देणं म्हणजे आजोळ. झाडांभोवती अळी करणं, मोरीतून बाहेर वाहणार्‍या पाण्यासाठी पाट करून पाणी वळवणं, झाडांवर चढणं, अंगण झाडून साफ करणं, आज्जीला पत्रावळी करून द्यायला पळसाची पानं आणून देणं, म्हणजे आजोळ. सकाळी नाश्त्याला मऊ गुरगुट्या भात खाणं, दुपारी झाडांच्या सावलीत बसून टीवल्याबावल्या करणं, आत्तेमामे भावंडांबरोबर पत्त्यांचे डाव मांडणं, नवा व्यापार खेळणं, आज्जीच्या जवळ झोपण्यासाठी रोज रात्री भावंडांबरोबर लटकं भांडण करणं, रात्री एका ओळीत अंथरूणं घालून गप्पांचा अड्डा करणं म्हणजे आजोळ… आज्जीच्या साडीचा मऊशार स्पर्श म्हणजे आजोळ, आज्जीच्या साडीचा वास म्हणजे आजोळ, आज्जीच्या साडीची गोधडी म्हणजे आजोळ, माझं सोनं, माझी मऊसाय म्हणत सगळ्या नातवंडांना सुती पातळाच्या पदरात घेणारी आज्जी ज्या घरात होती, ते आजोळ. उन्हात खेळू नका रे, माडीवर आवाज करू नका रे, पायर्‍यांवरून दणादण करत धावू नका रे, वाळवण घातलंय अंगणात नासवू नका रे’ असा अधूनमधून दरडावणं म्हणजे आजोळ. ‘चला मुलांनो रामरक्षा आणि शुभंकरोती म्हणा’ असं सांगत आराम खुर्चीभोवती बच्चेकंपनीला गोळा करून बसणारे आजोबा ज्या घरात असायचे ते आजोळ. लुटुपुटूची भांडणं सोडवणार्‍या आजी-आजोबांनी व्यापलेला वडिलोपार्जित वाडा म्हणजे आजोळ. कोनाडे, तावदानं असलेल्या मोठ्या खिडक्या, लोखंडी कुंडी असलेली-दिवसभर सताड उघडी असलेली लाकडी दारं आणि उंबरठे असलेलं ऊबदार कौलारू घर म्हणजे आजोळ. देवघराची खोली, बाळंतिणीची खोली असलेला चौपदरी वाडा म्हणजे आजोळ. ‘आजोळ’ हा शब्दच किती छान आहे, एक लय आहे ह्या शब्दात. काही काळापूर्वीपर्यंत आजोळ म्हणजे मुलांसाठी विसाव्याचं आणि धिंगाणा करण्याचं ठिकाण होतं.

आजोळी मस्ती करायला मिळायचीच, त्याबरोबर शिस्तीत काम करण्याची सवय सुद्धा लागायची. आजोळी काम करताना मुलांना मुळीच कंटाळा येत नसे, कारण सगळं कामं आटोपलं की आजीच्या गोष्टींची मेजवानी मुलांना मिळत असे. मधून मधून आजोबा पण जुन्या काळातल्या काही गोष्टी सांगत, हे सगळं मुलांना हवंहवंसं वाटत असे. आईबाबांनी काही काम सांगितलं की, चेहेरा त्रासिक करणारी ही नातवंडं आजोळी मात्र उत्साहानं कशी काय कामं करतात, ह्या गोष्टीचं आई-बाबांना सुद्धा आश्चर्यच वाटतं असे. म्हणजेच काय ‘आजोळ’ नावाची एक जादू होती.

आजोळ म्हणजे एक चालतं-बोलतं विद्यापीठ असायचं. घरादारातल्या विविध स्वभावाच्या, विविध वागणुकीच्या, सवयीच्या लोकांशी कसं वागावं, कसं बोलावं, सगळ्यांशी कसं जुळवून घ्यावं ह्याचा कळत नकळतपणे एक संस्कार होत असे. आजोळी राहायला गेल्यानं तिन्ही पिढ्यांमध्ये नात्यांची गुंफण होत असे, प्रेमाचे धागे विणले जायचे, एकमेकांची सुख-दु:ख वाटून घ्यायला मुलं आपसूकच शिकायची. गरजा थोड्या आणि मनं मोठी होती, त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी गुळतूप पोळी, शिकरण-पोळी सुद्धा नातवंडांना गोड लागायची. घराघरात माणसांचा राबता असायचा. रोजच्या जेवणात दोन-चार माणसं सहज जेवून जायची. मुलांसाठी तर आजोळ म्हणजे आठवणींचा एक हळवा कोपरा असायचा.


आज मात्र, निखळ आनंद देणारं हे आजोळ पूर्णपणे हरवलं आहे. एका घरातच माणसांचे स्वतंत्र कप्पे झाले आहेत, एका छताखालीच एकाच कुटुंबातल्या सदस्यांची तीन-चार खासगी बेटं झाली आहेत. आज ज्याला-त्याला स्वतंत्र ‘स्पेस’ हवी आहे. साधं कुटुंबातलेच इतर सदस्य आपल्या खोलीत आलेलेही हल्ली आवडत नाहीत, मग इतरांना तर एंट्रीचं नसते. घरातल्या घरात जर ‘डू नॉट डिस्टर्ब’चे बोर्ड लागत असतील तर इतक्या सार्‍या लोकांच्यात राहण्याची कल्पना सुद्धा नवी पिढी करू शकत नाही. आता लोकांकडे पैसा भरपूर आहे, घरं चांगली आहेत पण मनं कोती झाली आहेत म्हणून कोणी कोणाकडे कारणाशिवाय जात येत नाहीत. परदेशस्थ मुलांची तर वेगळीच गोष्ट आहे, वर्षादोन वर्षांतून भारतात येणार्‍या मुलांचीच मायदेशाशी असलेली नाळ हळूहळू विरत जाते. त्यामुळे त्यांच्या मुलांसाठी आज्जी-आजोबा हे केवळ ‘ग्रँडपॅरेंट्स’ असतात. आजोळचा ‘कोझी फ्लेव्हर’सुद्धा त्यांना कळणं कठीण असतं. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, आताशा आजोळ हरवलंच आहे.
कुटुंबांचे आक्रसत चाललेले आकार, विभक्त कुटुंब पद्धती, हम दो हमारे दो नंतर एकाच अपत्यावर आलेली कुटुंबं ह्यामुळे पुढच्या पिढीला नातीच राहिलेली नाहीत. विभक्त कुटुंब पद्धती आत्मसात होत असतानाच ‘एकल पालक’ ही समाजात वेगानं वाढत असलेली गंभीर समस्या आहे. त्यामुळे कोणाशीही जुळवून घेण्याची सवय न राहिलेल्या मुलांना चारचौघात एकत्रितपणे राहणं कठीणप्राय होत चाललं आहे. प्रसिद्ध कविवर्यांनी एका कार्यक्रमात किस्सा सांगितला होता, त्यांनी एका छोट्या मुलीला विचारलं, ‘जॉईंट फॅमिली म्हणजे काय गं?’ तेव्हा ती मुलगी म्हणाली की, ‘ज्या फॅमिलीत मम्मी-पप्पा एकत्र राहतात त्याला जॉईंट फॅमिली असं म्हणतात’ त्या निरागस बालिकेची ही बोलकी प्रतिक्रिया नक्कीच विचार करायला लावणारी आहे. एकत्र कुटुंब पद्धतीची इतकी संकुचित व्याख्या नव्या पिढीच्या मनात रुजत असेल तर कुटुंबकबिला, आजोळ, खटलं हे शब्द त्यांना कधी कळणारच नाहीत.
‘डिंक’ अर्थात ‘डबल इन्कम नो कीड’ची संकल्पना आळवणार्‍या नव्या विवाहसंस्थेत सख्खी भावंडं ही संज्ञा सुद्धा नष्ट होत चाललीय, मग कसलं आजोळ अन् कसलं काय… त्याचबरोबर वेगानं होत असलेलं स्थलांतर, विरलेले-शिथिल झालेले कौटुंबिक संबंध, ओस पडलेली खेडी, जुने वाडे पाडून तिथं उभ्या राहत असलेल्या इमारती, दुसर्‍यासाठी वेळ देण्याची उदासीनता, देश-विदेशात पर्यटन करण्याची ओढ, पारंपरिक जेवणाशी तुटलेली नाळ, समाजमाध्यमांचा अतिरेक, त्यामुळे संपुष्टात येत चाललेला संवाद, ओसरत चाललेलं अगत्य, आजी-आजोबा कधीच वजा झालेली सुक्ष्म कुटुंब, आत्मकेंद्रित माणसं, बदललेली जीवनशैली, पाश्चिमात्यांचं अंधानुकरण, गुंतागुंतीचे नातेसंबंध, चुकत असलेली आर्थिक गणितं ह्यामुळे आज आजोळच नाही; तर एकूण कुटुंबव्यवस्थाच खिळखिळी होत चालली आहे.
हाडामासांच्या मानवी, बुद्धिवादी कुटुंब सदस्यांशी ‘अ‍ॅडजेस्ट’ करण्यापेक्षा, त्यांच्याशी होणार्‍या विसंवाद किंवा मतभेदांपेक्षा काहीही विरोध किंवा ‘ऑर्ग्युमेंट’ न करणारे ‘पेट्स’ अर्थात मुके पाळीव प्राणी पाळणं नव्या पिढीला अधिक सोयीस्कर वाटत आहे. नुकतंच एका अभिनेत्रीनं एका मुलाखतीत सांगितलं, की त्या जोडप्यानं ठरवून मूल होऊ दिलं नाही, कारण त्यात त्यांना अडकायचं नाहीय. ह्या निर्णयामुळे तिला आयुष्यात काहीच कमतरता वाटत नाही, उलट ती तिचा विकएंड तिच्या डझनभर पाळीव कुत्र्यांबरोबर घालवते. पुढच्या पिढीतलेच काही जण विवाहाविना कायदेशीर मार्गानं सरोगसी किंवा दत्तक मूल घेऊन एकट्यानं पालकत्व स्वीकारत नवं कुटुंब ‘एन्जॉय’ करत आहेत. एकमेकांवरचं भावनिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक अवलंबित्व कमी होत असून त्यामुळेही नवी नाती काही दिवसातच दुभंगत आहेत. ह्यामुळे समाजातल्या पिढीजात कौटुंबिक संरचनेलाच सुरुंग लागत आहे. ‘सहकुटुंब-सहपरिवार’ ही संज्ञेची व्याख्याच इतिहासजमा होत असून नव्या ‘टायनी फॅमिलीत’ नातलगच उरलेले नाहीत. तर दुसरीकडे कळायला लागल्यापासूनच अनेक बालकं एकेकटी राहत असल्यानं स्वतंत्र अस्तित्वानं पछाडलेल्या ‘न्यु जनरेशनचा’ विवाहाची संकल्पनाच धुडकावण्याकडे कल वाढत आहे. ‘इट्स माय लाईफ’ म्हणत ‘झेन झी’ लिव्हइन सारख्या विविध तत्कालीन, कचकड्याच्या रिलेशनशिपमधल्या मुक्त जगतात विहरू पाहत आहे. मग कसले आजीआजोबा, कसलं आजोळ अन् कसलं काय… मामाचा चिरेबंदी वाडा कधीच जमीनदोस्त झालाय, त्यामुळे आजोळचं कवित्व, आजोळचं महात्म्य कधीच संपलं आहे.

निदान कोवळ्या वयात तरी मुलांना ही कौटुंबिक संरचना कळावी म्हणून मग हल्ली शाळांमध्ये आजी-आजोबा अर्थात ‘ग्रँड पॅरेंट्स डे’ साजरे केले जात आहेत. आजचे पालक बक्कळ पैसे भरून मुलांना एखाद्या टूर कंपनी बरोबर खोट्याखोट्या कृत्रिम, बनावट, देखाव्यासारख्या उभारलेल्या मामाच्या गावाला पाठवत आहेत. तसंच भरमसाठ शुल्क देऊन शिबिरांना पाठवत आहेत किंवा संस्कार केंद्रांमध्ये पाठवत आहेत.

गेल्या दोन दशकातल्या डिजिटल गॅझेट्सच्या अतिवापरामुळे तीन पिढ्यांमध्ये वाढलेली दरी देखील आजोळ संपायला कारणीभूत ठरत आहे. एक काळ होता, प्रत्येक पुढची पिढी मागच्या पिढीला ‘फोल्लो’ करायची, परंतु माहितीचं आंतरजाल अर्थात ‘गुगल बाबा’मुळे नव्या पिढीची श्रद्धास्थानं बदलली आहेत. आजी-आजोबांनी एक शब्द सुद्धा नातवंडांना बोललेलं मुलांनाच नाही तर हल्ली छोट्याछोट्या नातवंडांना सुद्धा चालत नाही, म्हणून कुटुंबातले एकेकाळचे ‘आधारवड’ आजकाल अलिप्तच राहू लागले आहेत. आजीआजोबांकडून दुधावरच्या सायीवरची माया काहीशी मोजूनमापून व्यक्त होऊ लागली आहे. ह्याचा परिणाम आजोळ हरवण्यापर्यंतच मर्यादित राहिला नसून त्याची व्याप्ती फार मोठी झाली आहे. आजोळ हरवल्यानं गावागावातल्या बोलीभाषा विरून जात आहेत. अनेक खास शैलीतले शब्द लुप्त होत आहेत, तिसर्‍या पिढीची काळ्या आईशी असलेली नाळ तुटू लागली आहे. साध्या राहणीमानापेक्षा पुढच्या पिढ्यांना शहरातली भौतिक सुखं अधिक हवीहवीशी वाटू लागली आहेत. गावाकडचा निसर्ग, हिरवाईतल्या प्रदूषणमुक्त वातावरणापेक्षा शहरातल्या प्रदूषित वातावरणातच ही पिढी वाढत असल्यानं दिवसागणिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. सण, समारंभ, कुळाचाराच्या पिढीजात रीतिभातीपासून नव्या पिढीची फारकत होऊ लागली आहे. संस्कार ह्या शब्दाचा सुद्धा अनेकांना आजकाल ‘नॉशिया’ येऊ लागला आहे. पारंपरिक आहार-विहार, घराण्यांच्या विशिष्ट पद्धती, रीतिरिवाज, खाद्यसंस्कृती, विचार, वेशभूषा, केशभूषा, आभूषणं, विशिष्ट प्रकारची भांडीकुंडी आदी गोष्टींची ‘खासियत’ सुद्धा हरवत असून सगळ्याचंच सपाटीकरण होत आहे. घरातल्या मुलानातवंडांचा राबताच कमी झाल्यानं आईवडील घरं ‘रिडेव्हलप’साठी विकासकांना देत आहेत. त्यामुळे पारंपरिक वाडे, घरं, अंगण, वाड्या भुईसपाट होत असून आजोळातल्या घरांची शोभा असलेली वास्तुकला, वास्तुरचना इतिहासजमा होऊ लागली आहे. आजीआजोबांच्या प्रेमळ छत्रछायेत वाढण्यापेक्षा पाळणाघरं किंवा मावशीबाईंची ‘पेड हेल्प’ घेत असल्यानं पुढच्या पिढीचा ‘भावनांक’ कमी होत आहे. ह्याचा आणखी एक परिणाम म्हणजे पुढच्या पिढ्यांची संस्कारांची शिदोरी हलकी होऊ लागली आहे.

एकूणच काय, तर काळ वेगानं बदलतोय. परिवर्तन होणं, काही जुन्या गोष्टी पुसल्या जाणं आणि नव्यानं सामील होणं हा निसर्गनियम आहे. त्यानुसार कौटुंबिक संकल्पना सुद्धा बदलत आहेत. ‘कालाय तस्मैं नम:’ म्हणत होणारे हे सामाजिक, कौटुंबिक बदल स्वीकारण्यावाचून पर्याय नाही. वास्तव हेच आहे, की, आई ज्या घराशी मायेनं, भावनेनं जोडलेली असते ते हक्काचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं आजोळ आज खरंच हरवलं आहे, हे नक्की!

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech