वैशाली भैसने-माडे
काम मिळवण्यासाठी संघर्ष केला. तुम्हाला सर्वच चांगलीच माणसे मिळतात असे नसते. पण माझ्या सुदैवाने सहकार्य करणारी माणसे भेटली. छोटे छोटे कार्यक्रम मिळू लागले. इथले मॉडर्न कल्चर, माझी गावाकडची खेडुत संस्कृती, ह्या सर्वांचा सुरुवातीला मेळ घालणे थोडे कठीण होते. पण ‘असाध्य ते साध्य, करिता सायास…’ ह्या संतवचनांप्रमाणे सर्व जुळवीत गेले.
माझ्या गाण्याचा पाया घातला गेला तो अमरावती जिल्ह्यातल्या खारतळ ह्या आमच्या छोट्याशा खेडेगावात. संगीताचा वारसा मला लाभला तो वडिलांकडून. गावात होणार्या भजनांमधून ते गात. माझ्या लहानपणी मी त्यांच्यासोबत जायचे. अशाच एका भजनात मी गायले. माझ्या गाण्याला श्रोत्यांकडून दाद मिळाली. अनेकांनी मार्गदर्शन केले. मला क्लासिकल शिकवले पाहिजे, अशी चर्चा झाली.
पण घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यामुळे गाण्याची स्वतंत्र शिकवणी, त्यासाठी रोज अमरावतीला जा, ये करणे परवडणारे नव्हते. परिणामी, शिक्षणाला प्राधान्य द्यायला हवे, असेच घरच्यांचेही मत होते. त्यामुळे बारावीपर्यंतचे माझे शिक्षण तिकडेच झालेले आहे. पण पाचवी, सहावीपासूनच माझे गाण्याचे छोटे छोटे कार्यक्रम सुरू झाले.
छोट्या स्पर्धा, ऑकेस्ट्रा, लग्नसमारंभ, ह्यामध्ये मी गात होते. पण घरची परिस्थिती, शालेय शिक्षण, ह्यामध्ये विधिवत गाणे शिकायचे त्यावेळी तरी राहून गेलेले. अमरावतीला ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर मी मुंबईला आले. अर्थात, इथे यायचे काही ठरवलेले नव्हते, मुंबईत कुणी नातेवाइक नव्हते किंवा ओळखी-पाळखीचे नव्हते. मुंबईत आमच्या स्थानिक आमदारांच्या आमदार निवासातील कक्षबंधात मी तीन महिने राहिले आणि इथल्या ऑर्गनायझर्सना भेटले. काम मिळवण्यासाठी संघर्ष केला. तुम्हाला सर्वच चांगलीच माणसे मिळतात असे नसते. पण माझ्या सुदैवाने सहकार्य करणारी माणसे भेटली. छोटे छोटे कार्यक्रम मिळू लागले. इथले मॉडर्न कल्चर, माझी गावाकडची खेडुत संस्कृती, ह्या सर्वांचा सुरुवातीला मेळ घालणे थोडे कठीण होते. पण ‘असाध्य ते साध्य, करिता सायास…’ ह्या संतवचनांप्रमाणे सर्व जुळवीत गेले.
सारेगमाच्या सुरुवातीच्या दोनतीन ऑडिशनमध्ये अपयश पदरी आले. पुन्हा नव्याने तयारी करून ऑडिशन दिली आणि निवड झाली. पुढचा प्रवास सुरू झाला. काहींनी तर, मी शास्त्रीय संगीत शिकलेली नसल्याने मला पुढे जाण्याचा काही अधिकार नाही अशी हेटाळणीसुद्धा केली. पण प्रत्येक वेळी मन घट्ट केले.
अपयश अपमान पचवायला आणि त्यातून नवीन काहीतरी करायला मी ह्याच काळात शिकले. इथेच सुरेश वाडकरांसारखे गुरू लाभले. माझ्याकडे तर रियाजाला तानपुरासुद्धा नव्हता अशा परिस्थितीत त्यांनी मला गाणे शिकवायची जबाबदारी घेतली, हा माझ्यासाठी सुवर्णक्षणच होता. विरोधात बोलणारे बोलत होते ते बोलतच असतात.
त्यातून पुढे जायची कला अवगत हवी. त्यावेळी अनेक संकटे येत होती, त्यातून मार्ग काढून पुढे जात होते. मनाचा संयम राखत होते. सारेगमच्या यशानंतर परिस्थिती बदलली. पण झाले काय की, काळोखातल्या एखाद्या माणसाला भर मध्यान्हीच्या उन्हात आणून उभे केल्यावर त्याची जशी परिस्थिती होईल, तसे झाले.
गोंधळल्याप्रमाणे स्थिती झाली. नव्याने येणार्या कार्यक्रमांचे व्यवस्थापन कसे करावे, हा प्रश्नसुद्धा उभा ठाकला. हे आव्हानसुद्धा पेलले. पुढे हिंदी सारेगमपची संधी आली तेव्हा मी पाच महिन्यांची गर्भवती होते. मी थोडी सूट मिळण्याची विनंती केली. पण ती सुरुवातीला नाकारण्यात आली.
मग हो ना करता करता आयोजकांनी मान्यता दिली. माझी मुलगी आठ दिवसांची असताना मी हिंदी सारगमपमध्ये सामील झाले. सेटवर मुलीला घेऊन जायचे, गायचे. मधल्या काळात मुलीकडे पाहायचे. अशी तारेवरची कसरत करत पुढे पुढे जात होते. हे केले नसत, तर कदाचित कायमची मागे राहिले असते. एकीकडे गाणे आणि दुसरीकडे आईपण, ह्या दोन्हींना न्याय द्यायची वेळ आलेली. त्या परिस्थितीलासुद्धा सामोरी गेले.
मात्र तेव्हाची मनाची घालमेल जीवघेणी होती, हेही खरेच. हिंदी पर्व जिंकल्यावर चित्रपट, मालिका वगैरेसाठी गाणे सुरू होतेे. काही गाणी हिरावली गेली. तेव्हा मन खिन्न झाले. पण संघर्ष करणे रक्तातच असल्याने मन घट्ट करून पुढे पुढे चालत राहिले. आता आमदार निवास, मग सांताक्रूजला भाड्याने, तिथून वांद्रे येथील एसआरए प्रकल्पात भाड्याने, असे करत करत आता स्वत:च्या छोट्याशा घरात स्थिरावले आहे.
नव्या प्रतिभावंतांनी संघर्षाची तयारी ठेवायला हवी. पाय खेचणारे खूप असतातच. स्पर्धेला सामोरे जावे लागतेच. यश सहज साध्य नसते. ते खेचून आणायची तयारी हवी. अशा यशाची चव, त्याचा सुगंध नक्कीच दैवी असतो.