चैत्र म्हणजे सृष्टीच्या नाना रंगांचा, स्वर्गीय सुगंधाचा आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाचा एक अक्षय्य चैतन्यसोहळा आहे. उन्हाच्या लाहीलाहीमध्येही नानाविध रानफुले, फळे आणि पालवीने नटलेला हा चैत्रमास मनावर गारूड करतो. मात्र, आजच्या शहरीकरणामुळे आणि हव्यासामुळे निसर्गाची ही श्रीमंती लोपत चालली आहे. सिमेंटच्या जंगलात चैत्र पोरका होत असून, ह्या ऋतुचक्राचा ढासळता तोल मानवी अस्तित्वासाठी विषण्ण करणारा आहे.
………………………..विवेक तेंडुलकर
चैत्राशी मैत्री नाही, असा माणूस शोधून सापडायचा नाही! आकाशतून दिनमणि आग ओकू लागलेला असतो, पण हा सारा दाह सहन करत चैत्र आपल्या मस्तीत फुलत असतो! आपल्या नाना रंगांनी, अनेकविध मिश्र दरवळांनी अस्मानीच्या सुलतानीला सुसह्य करण्याची क्लृप्ती चैत्र सहजसुंदर पद्धतीने लढवीत असतो. कित्येकदा वर्णनासाठी समर्पक शब्द सापडू नयेत, अशा त्याच्या रंगच्छटा, कळ्या-फुलं-मोहरातून अक्षरश: उतू जाणारं मनमोहक अत्तर, सभोवताल मंतरून टाकणारं त्याचं ललित्य… अशा अनेकानेक कारणांनी चैत्र माझ्यावर गारूड करत असतो. तो मला, कधी आणि कसं संमोहित करून स्वत:च्या कह्यात घेतो आणि मी त्याचा गुलाम होऊन जातो, ते माझं मलाही कळत नाही.
आठवणीत आल्यापासून चैत्राचा आणि माझा स्नेहबंध जुळलेला आहे. निसर्गसौंदर्याचं भरभरून दान मिळालेल्या अलिबागसारख्या परिसरात आणि अवतीभवती शेती, रान पसरलेल्या दैवदुर्लभ वातावरणात जन्माला येण्याचं आणि वास्तव्य करण्याचं भाग्य माझ्या लेखी आलं आणि चैत्र माझा सखा झाला.

मला आठवतं, अगदी पाचव्या इयत्तेपासून पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईस्तोवर सुट्टीच्या दिवसांत गुरं चरायला घेऊन जायचं आणि अभ्यास करायचा, असा माझा आणि माझा सख्या मित्र, राजू गुरवचा दिनक्रम असायचा. सुरुवातीच्या काळात माझं लेखन-वाचन ह्याच पद्धतीने झालं आहे. त्यामुळे निसर्गाचे वेगवेगळे विभ्रम मला निसर्गातलाच एक होऊन पाहता-अनुभवता आले आणि चैत्राशी आपलं जरा जास्तीच सूत जुळतंय, ह्याचा रंगसुगंधी साक्षात्कारही झाला! ह्या चैत्राने पानाफुलांत जसे रंग भरले, तसेच कित्येकदा माझ्या शब्दांमध्ये भरले! त्यांना अर्थाचा निर्व्याज सुगंध बहाल केला!!
करवंदी, जांभूळ, काजू, अठोरणी, चारोळी, रानजाई, कुसुम, कुडया अशा अगणित रानवृक्ष आणि रानवेलींना स्वर्गीय गंधाने घमघमणारा चैत्रमोहोर येऊ लागतो. तशातच, फाल्गुनात मोहोरायचं विसरलेला एखाददुसरा आंबा सरसरून मोहोरतो आणि आपल्या मोहोरगंधाची त्या गंधयात्रेत भर घालतो. रातराणी, मधुमालती, कामिनीसारख्या फुलझाडांच्या सुगंधाची नशा करावी तर ती चैत्र चांदण्यातच! असली नशिली रात्र जगाच्या पाठीवर दुसरी शोधूनही सापडणार नाही! सोनमोहोर, गुलमोहोर रंगफुलांचं राजबिंडं देखणेपण पांघरतात. सावरीवर अजूनही कुठेकुठे चुकार फुलं दिसत असतात आणि पाखरं त्या फुलातलं मधमिश्रित दंव टिपण्यासाठी भांडणं करत असतात. बहाव्याच्या सोनकेशरी झिरमिळ्यांनी अवघं झाडंच पुष्पाभिषिक्त होतं. ह्या फुलांत मधमाश्या आणि भुंगे कोणता मंत्रघोष करत तीर्थप्राषन करत असतात कोण जाणे! पिंपळ सुद्धा पोपटी, हिरव्या, कोकम्बी रंगाच्या तलम पालवीने सजून जातो आणि नव्याने मनात भक्तिभाव रुजून येतो. एरवी मगरीसारख्या त्वचेचा आणि तसाच आळसावून पसरलेला पांगाराही भगव्या फुलांनी आपली काटेकांती झाकू पाहतो. जणूकही वीरक्तीचा रंग लेवून चैत्रदिंडीत सामील होतो. तशातच कुठल्या ना कुठल्या झाडाच्या आधाराने वर झेपावलेला उक्षीचा वेलही पांढर्या फुलांनी डवरून जातो आणि वार्याच्या झुळकीसोबत आपल्याला आधार दिलेल्या झाडावर सुमनांजली करून कृतज्ञता व्यक्त करत राहतो. फारशी कुणाच्या खिजगणतीत नसलेल्या कुंभीला देखील चैत्रात फुलबहर येतो. पावसाळ्याच्या प्रारंभी झाडावरून गळणारं फळ जेवढं मजबूत, त्याच्या हजारपट नाजूक मात्र फुल. गुंजीच्या वेलीवर सुकलेल्या शेंगाही ह्याच काळात फुटतात आणि लाल मण्यांच्या त्या अनोख्या दागिन्यांनी वेलीसह आधाराचं झाडही रूपगर्व भासू लागतं.
चैत्र म्हणजे फळाफुलांचा, मधाचा बहर. भुंगे, मधमाश्या आणि असंख्य पक्ष्यांसाठी मेजवानीची पर्वणी! चैत्रागमात झाडावेलींवर ह्या निसर्गजीवांची गर्दी उसळते. त्यांचं कलसंगीत, दंगामस्ती, भांडणं, प्रणयाराधन, कोकीलकूजन ऐकता-पाहतांना मनातली दु:खं, ताणतणाव पिसासारखे हवेवर तरंगत नाहीसे होतात.

चैत्राचं प्रेम एखाद्याला किती असावं बरं? ह्या चैत्रप्रीतीपोटीच असावं बहुतेक, प्रभू रामचंद्रांनी चैत्रमासातच भूलोकी अवतार घेतला. एकाअर्थी दुर्भाग्य म्हणावं अन दुसर्या अर्थी सौभाग्य म्हणावं ते असं की, पुढे चौदा वर्षं त्यांच्या नशिबी ‘चैत्रवास’ आला!
असा हा नितांतसुंदर चैत्र पाहायचा, अंगाखांद्यावर घ्यायचा, तनामनावर गोंदवून ठेवायचा तर त्यासाठी गांव हवं, गांवाभोवती रान हवं आणि ते रान जपायचं भान हवं. पण आज मात्र शहरीकरणाच्या हव्यासापायी आणि भौतिक विकासाच्या वेडापायी वनांचाच घास घेतला जातोय आणि चैत्र पोरका होतोय. चैत्र पोरका होतोय की, चैत्राशी मैत्र जपणारे कोट्यावधी चैत्रासक्त जीव पोरके होतायत? काहीशे वर्षांची गगनचुंबी झाडं नकोशी व्हायला लागली आणि सिमेंटकाँक्रिटची गगनचुंबी खुराडी उभी राहू लागली. ह्या खुराड्यांमध्ये चैत्र फुलत नाही म्हणून छताला, भिंतींवर, अगदी स्वच्छतागृहाच्या दरवाज्यांवरही पानंफुलं, वेलबुट्टी रंगवून घेतात. त्यांना चैत्राचा सुगंध कुठून येणार! त्यांना येतो तो रोगकारक रसायनांचा वास! चैत्र शुद्ध वातावरणात रमतो. म्हणूनच तर चैत्राच्या वेलझुल्यावर विराजमान होऊन चैत्रगौरी झोके घेतात, कोडकौतुक पुरवून घेतात. चैत्र हरवत चालल्यामुळे चैत्रगौरीसुद्धा रुसल्यागत झाल्यात. कित्येक गृहगौरींना नोकरीच्या पळापळीतून वेळ नाही, तर कित्येक गृहगौरींना आता त्या प्रथा जुन्या वाटू लागल्यात. म्हणूनच, चैत्राचं ठसठशीत मानलं जाणारं सौभाग्यलेणं बदलत्या काळासोबत रंगहीन, आस्थाहीन होऊ लागलंय.
‘मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलंच नाही;
झाडांची पोपटी पालवी
मला अधिक विश्वासार्ह वाटली’
चैत्राभिमानाने कवी द. भा. धामणस्करांनी असं लिहिलंय खरं, पण तोच चैत्र आता केवळ पंचागांतील उल्लेखापुरताच उरतो की काय, अशी विषण्ण भीती मनाच्या झाडाला पोखरू लागली आहे.
प्रत्येक नवपिढीने उन्मुक्त मनाने चैत्र आस्वादावा तर कित्येक गावांत असलेल्या मोकळ्या जागाजमिनी, गुरचरणी, देवराया, वनराया नोकरशाहांच्या संगनमताने आधुनिक विकासाचे तारणहार एकगठ्ठा मतांचा वसंतोत्सव साजरा करण्यासाठी तथाकथित गोरगरिबांना फुकटात वाटत आहेत आणि हे तथाकथित गोरगरीब फुकटात मिळालेले भूखंड धनिकांना लाखो रुपयांत विकून चैत्राचा सौदा करत आहेत. जिथे उभी राहताहेत सिमेंटकाँक्रिटची जंगलं; तिथे चैत्र उरावा कसा, जगावा कसा आणि फुलावा तरी कसा!
‘चैत्राचाही वैशाख करण्याचा विडाच जणू ह्या विकासवाद्यांनी उचललेला दिसत आहे. किंबहुना, सुपारी घेतलेली आहे’ असं म्हणणं समर्पक व्हावं.
बीजं अंकुरल्यावर ज्या भूमीला ‘रान’ किंवा ‘जंगल’ म्हणून ओळख प्राप्त व्हायला शेकडो वर्षं लागतात, ती वृक्षसंपदा सपासप कापली जात आहे. ना मुक्या कळ्यांचा विचार, ना घरट्यांमधल्या पक्ष्यांबद्दल करुणा! निमंत्रणाविना येणार्या चैत्रानं मग यावं तरी कुठे? निर्ममतेने हे चैत्रांगण पुसून टाकणार्या आयुष्यांचा तेरडा व्हावा, असं तितक्याच निर्ममतेने मला सतत वाटत राहतं. मात्र, अशा ह्या स्वार्थलोलुप वृत्तीमुळे निसर्गाचा तोल पुरता ढासळत चाललाय, हे अव्हेरता येत नाही. परिणामी ऋतुचक्र बाधीत होऊन वनस्पती, पक्षी सुद्धा संभ्रमात पडू लागलेत, असं पर्यावरणतज्ज्ञ आणि वनस्पतीशास्त्रज्ञ सप्रमाण सिद्ध करू लागलेत. ह्या सार्याचा परिपाक म्हणजे रानोवनीच्या चैत्रमहोत्सवाचा रंग फिका होऊ लागलेला आहे.
वसंतगामी
तव नयनीची
रानपांखरे
नाही बोलली
तर उमगावे
मनास माझ्या
पानेझडल्या
कसे खोडकर
चैत्रफुलांचे
हिरवे कोडे!
कवी सदानंद रेगेंच्या कवितेत व्यक्त झालेलं हे चैत्रफुलांचं हिरवेपण आता चैत्रालाही आणि चैत्रसख्यांनाही शब्दातीत हळवं करू लागलंय, हेही तितकंच खरं.
…पुढल्या जन्मी मला नक्की चैत्र व्हायला आवडेल!
(लेखक ज्येष्ठ जाहिरात लेखक, कवी, संहिता लेखक, दिग्दर्शक आणि राजकीय सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.)