बोलू आनंदे…!

0

जन्मदात्री, जन्मभूमी, मातृभाषा ह्या गोष्टींचा प्रत्येकालाच अभिमान असावा. नि:स्वार्थ वृत्तीने आपला उत्कर्ष साधण्यात ह्या सर्वांचा महत्त्वाचा वाटा असतो. भाषेचा अभिमान सर्जनशीलता, उत्पादकता, परोपकार वाढवतो.
……………………….

महिला मंडळाच्या वार्षिक सभेच्या निकालाचा दिवस. मनमिळावू, सर्वांच्या मदतीला तत्पर अशा शुभा शर्मांची अध्यक्ष म्हणून झालेली नेमणूक. सगळेजण ’काँग्रॅच्युलेशन्स’, ’काँग्रॅट्स’म्हणत असलेले. त्याबरोबरच हातात हात घेत अभिनंदन करत असलेले. अशात मी अचानकच हात जोडून नमस्कार करून, ‘मन:पूर्वक अभिनंदन, शुभाताई’ म्हणून गेले. झालं! सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे नुसत्या वळल्याच नाहीत तर त्यातून, ‘किती मध्यमवर्गीय गरीब मागासलेपण?’ असे काहीसे भाव डोकावून गेले. मी तिकडे लक्षही दिले नाही. माझ्या मराठीचा गोडवा ह्यांना कुठून समजणार? त्याचं काय आहे, इमारतीचे मजले जितके जास्त म्हणजे, गगनचुंबी इमारतींना हल्ली वीसएक मजले तरी असतातंच ना. त्यातील रहिवासी हवेतंच तरंगू लागतात. जमिनीशी नातं जवळजवळ उरतच नाही.तोच प्रकार मग मातृभाषेसंबंधी होऊ लागतो. जितके जास्त इंग्रजी शब्द बोलण्यात, तितका माणूस पुढारलेला, यशस्वी! खरंतर पुढारलेले विचार असणं अपेक्षित आहे. त्याचा भाषा बदलाशी काडीइतकाही संबंध नाही. सुशिक्षित आणि सुसंस्कृतमध्ये हाच तर फरक नाही का?
परप्रांतीय लोक पुण्या-मुंबईकडे आले ते, त्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी. व्यापारासाठी, मुलांना चांगलं शिक्षण मिळेल म्हणून. त्यांनी त्यांची हिंदी भाषा बोलायची सोडली नाही. पण आपण स्थानिक मराठी लोकांनी मात्र त्यांच्याशी हिंदी-इंग्रजीमध्ये बोलायला सुरुवात केली. उलट आपल्या इथे काहीतरी अधिक आहे, ज्यामुळे हे लोक त्यांचा प्रांत सोडून इथे आले, याचा अभिमान आपण का बाळगू नये? 700 वर्षांपासून वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत अपभ्रंश-उत्क्रांत होत, मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ इथे शिलालेखावर शके 983 मधील, श्री चामुंडेराये करविले, असे आहे. इतका प्राचीन इतिहास असलेल्या माझ्या मायबोलीचा मला अभिमान का असू नये? ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’, असे मीसुद्धा का म्हणू नये? ’वाढदिवसानिमित्त शुभेच्छा’, ’अनेक आशिर्वाद’ असे मी का म्हणू नये? अर्थात मला भाषाभिमान आहे, गर्व नव्हे. माझा भाषाभिमान प्रशंसा, आत्मचिंतन आणि आपलेपणाच्या भावनेतून उत्पन्न झाला आहे. माझ्या भाषेला उत्तम ठरवताना मी कधीच इतर भाषांचा तिरस्कार अथवा अपमान करता कामा नये याचं भानंही मला आहे. उलट, सर्व भाषांमधील साहित्याची देवाणघेवाण ही समस्त मानव संस्कृतीला समृद्धच करत असते.

घर, वाडा, बंगला तसे पाहिले तर माणसांच्या निवासस्थानांची नावं. तसं एका दृष्टीने समानार्थीच. पण घर म्हंटले की आपसुकच डोळ्यांपुढे येतात कुटुंबातील माणसे. म्हातारे आई-वडील, मग त्यांची तरुण मुलं, मग लहान नातवंड असं एक चित्र. ’वाडा’म्हंटलं की डोळ्यांपुढे उभा राहतो दिंडी दरवाजा, संरक्षक दगडी भिंत, पण जरा पडकी बरं का! अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेली. अनेक कुटुंब राहत असलेले, मध्ये प्राजक्त अथवा वडाचे झाड मिरवणारे अंगण असलेले असे गृहसंकुल. बंगल्याचा वेगळाच रुबाब. थोडासा अलिप्त, पुसटसा अहंभाव मिरवणारा, भोवताली गर्द म्हणता येईल अशी झाडांची झूल धरून काही नाजुक उठावदार रंगांची परदेशी फुलझाडे दारात स्वागत करणारी. काही अगदी आपलीशी वाटावी अशी फळझाडे. त्यात नंबर एक वर आंबा. मग पेरू-नारळ. खरं की नाही? आपल्या मराठी शब्दांशी निगडित असे चित्रमय जगंच आपल्या मनःपटलावर उमटते. तसंच जर मी ’हाऊस’ म्हणाले तर होतं का? आपल्या जन्मापासून जशी आपली आई आपल्या धमन्यांमधून आपल्याबरोबर प्रवाही असते, तशीच मातृभाषा. तिचा अव्हेर करण्याचा कपाळकरंटेपणा हल्ली ’फॅशन’ म्हणून लोक मिरवू लागले आहेत हे खेदजनक आहे. माझ्या मराठी भाषेच्या वापराला कधी कधी टिंगल टवाळीलाही सामोर जावं लागलं आहे. म्हणजे पहा मी म्हणते, ‘हा माझा नवरा.’ बाकीचे ओळख करून देताना म्हणतात, ‘हे माझे मिस्टर.’ मी म्हणते, ‘वीज गेली.’ सगळे म्हणतात, ‘लाईट गेले.’ सगळे म्हणतात ‘सॉरी’, मी म्हणते, ‘क्षमा करा हं. जरा चूक झाली.’ तसंही ’सॉरी’ मनापासून नाही म्हणलेलं चालतं. ’क्षमस्व’ मात्र वरवर म्हणता येत नाही. असं आपलं माझं मत. अशी छोटीशी मराठी वाक्यं आपसूक येतात आणि आजूबाजूच्या लोकांसाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण करतात. तरी बरं, मी ‘आसनस्थ व्हा’ न म्हणता, ‘या बसा’ म्हणते. नाहीतर नवरा घरी येणार्‍यांशी मला बोलायला बंदी करेल, अशी मला भीती वाटते कधीतरी. त्याचं काय आहे, मी शिकले मराठी भाषेतून. माझ्या शाळेचे नाव ’बाल शिक्षण मंदिर’ तो मात्र शिकला कॉन्व्हेंट मध्ये. सध्या म्हणाल तर दोघेही वैद्यकीय व्यावसायिक. मी भूलतज्ज्ञ. पण मला रुग्णाला भूल देताना भाषेचा काही प्रश्न उद्भवत नाही. ‘एक छोटी सुई टोचेल, मुंगी चावल्यासारखं वाटेल.घाबरू नका.’ ह्यात कशाला इतर भाषांची लुडबुड हवी? तसंही बेशुद्ध करायला लागतात फक्त आठ सेकंद. परवाच मी थोड्याशा परखड शब्दात इंग्रजाळलेल्या चाळीशीतल्या रुग्णाला जरासं सुनावलं. त्याचं काय झालं, शस्त्रक्रियेसाठी आल्यापासूनच तो सारखा, ‘ओ शीट्, ओ शीट्’ म्हणत होता. त्यातून त्याचा रक्तदाब होता 180 /100. म्हणजे जरा जास्तच. वजनही शहाण्णव किलो, म्हणजे तेही नको इतकं जास्त. वर त्याला मधुमेह. मी विचारलं, ‘दादा, तुला इतके सगळे शत्रू असतांना मी तुझा जीव सांभाळणार.’ तर मी ’ओ शीट्’ म्हणू की, ‘अरे देवा?’ वेळी मदतीला ‘शीट्’ येईल की ‘देव’? ह्यावर तो जरा ओशाळल्यासारखा झाला आणि मग मात्र मी शुद्ध मराठीमध्ये त्याला धीराचे चार शब्द ऐकवले की, हे माझं रोजचं काम आहे. घाबरू नका. काही दुखणार नाही. शांत झोपा. बास! मग काय शस्त्रक्रिया तर चांगली झाली. त्याचा रक्तदाबही ताळ्यावर राहिला. अर्थात ह्यात औषधांचीही मदत घ्यावीच लागली. अशीच गंमत झाली, एकदा माझ्या सहकार्‍यांनी रूग्ण स्त्रीला विचारलं, ‘सांस की कुछ तकलीफ है क्या?’ त्यावर ती म्हणाली, ‘हां, सांस बहुत तकलीफ देती है.’ म्हणजे सासू छळते. आता घ्या! मराठीमध्ये, ‘श्वासाला काही त्रास आहे का?’ आणि ‘सासू छळते का?’ ह्यांत गफलत झाली असती का?

माझा मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान हल्ली वाढत चाललेल्या रहदारीतही कधी कधी डोकं वर काढतो. त्यातून मी पुणेरी! मग काय विचारता? रस्त्यात मध्येच बेशिस्त ठिय्या देऊन उभ्या केलेल्या वाहनाला कितीही शंख करून, जर तो प्रतिसाद देत नसेल, तर मी विचारून मोकळी होते, ‘अरे मूर्खा, वाजतो का बघायला वाजवतेय का? आज काय रस्त्यातंच मुक्काम?, वरचा मजला रिकामा का? निघण्याचा मुहूर्त कधीचा धरलाय?’ दहापैकी नऊ वेळा तरी ’किती तिरसट बाई’ म्हणत का होईना समोरचा हलतो. ह्याला पर्यायी इंग्रजी वाक्यं मला तरी सुचतच नाहीत. समोरच्याला बेसावध गाठत शालजोडीतले द्यावेत तर पुणेरी माणसाने मराठीतूनंच! माझा मराठी बाणा वेळी दयाळू, प्रेमळही असतो. आजारी माणसाला भेटायला गेल्यावर, ‘रात्री बेरात्री कधीही हाक मार, गरज लागली तर मी येईन.’ हे बोलण्यात जो आपलेपणाचा सुगंध आहे तो ‘कॉल मी एनी टाईम’ म्हणताना येत नाही. वैद्यकीय शिक्षण अपरिहार्यपणे इंग्रजी मधूनच घ्यावे लागले तरी, घरात माझ्या मातृभाषेतूनच सतत बोलण्याचा फायदा मुलालाही झालाच. तो जन्मल्यापासून मी त्याच्याशी भरपूर बोलत असे. गोष्टी सांगत भरवत असे. त्यातून नकळत अनेक मराठी शब्द त्याच्या कानांवर पडत. त्यामुळेच एकदा शाळेत ’अनवाणी’ शब्दाचा अर्थ विचारल्यावर, तो माहीत असलेल्या हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतपत मुलांमध्ये माझा मुलगाही होता. घरी येतांना रोज तो काही ना काही विसरून येई. माझा ठरलेला प्रश्न असे, ‘आज काय दानधर्माचं?’ माझं सभासदत्व असलेलं ’शब्दस्नेह’ नावाचं ग्रंथालय सततच मला ह्या मराठीच्या अमृतकुंभातून नवनवीन निपजणारे साहित्यिक मोती पुरवत असते. माझा हा खजिना कधीच रीता होणार नसतो आणि चोरीलाही जाणार नसतो. त्यामुळे मी निश्चिंत राहतेच, वर जगण्याचे नवनवे पैलूही उलगडत जातात. कधीच एकटेपण येत नाही. आतातर सातासमुद्रापार आपली मराठीची पताका अभिमानाने फडकते आहे. जगाच्या कानाकोपर्‍यात मराठी मंडंळं आहेत.

आपली मराठी तशी शिकायलाही सोपीच बरं का. मूल ’आई’ जितक्या पट्कन म्हणू शकतं, तितकं काहीच नाही. इतरंही शब्द बघा. बाबा, काका, मामा, काऊ, चिऊ, माऊ त्यातून एक नादही जाणवतो. मग बाळाला म्हणायलाही हुरूप येतो, गंमतही वाटते. मला अभिमान वाटण्यासारखीच माझी मराठी इतकी समृद्ध आहे. आता हेच पाहा, समानार्थी शब्दांतूनही किती वेगळे विचार देते ती. पडून झालं की ‘घसरडं.’ सावरता येतं ते ‘निसरडं.’ विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर मानवनिर्मित होतो तो ‘अंधार’ आणि निसर्गात जाणवतो तो ‘काळोख.’ मूल चालायला शिकतं ते पडंत पडंत. म्हणजे ’पडणं’ हे चालण्याचे शिक्षण घेण्यात येणारं अनिवार्य असं क्रियापद. पण धडपडणं हे मात्र टाळता येणारं आहे. नियमात बांधून होतं ते ’खेळणं’. म्हणजे ’अभ्यासातून एक तास तू आता खेळू शकतोस’ आणि जे मुक्तपणे असतं, स्वच्छंद ते बागडणं. जे आपण उद्यानात बघतो. ’रिकामा’ असतो तो काही काम न होणारा, मग तो वेळ असो की खिसा आणि ’मोकळा’ असतो तो काही सत्कारणी लागू शकणारा वेळ अथवा भरू शकणारा असा खिसा. एक नकारात्मक, एक सकारात्मक. कृत्रिमरित्या बांधलेला बागेतला, घरातला तो ‘झोका’ आणि वडाच्या पारंब्यांवर, झाडांच्या फांद्यांना बांधून मुक्तपणे खेळतात तो ’हिंदोळा’. आपलं मन भूतकाळातल्या चांगल्या आठवणींचा हिंदोळा घेतं. झोका घेत नाही. तसंच आहे आभाळ आणि आकाश. निरभ्र असतं ते आकाश. जे आपल्यावर छत्र धरून असतंच, पण जे पाण्यानं ओथंबून भरून येतं ते ’आभाळ’. जसं की आईची-आजीची माया, ’आभाळमाया’. मगच होते प्रेमाची जीवन बरसात. जो हवाहवासा यावा वाटतो तो ’अतिथी’ आणि जो नावडता अगंतुक तो ’पाहुणा’. आहे की नाही शब्दार्थाच्या श्लेषाची गंमत?

जन्मदात्री, जन्मभूमी, मातृभाषा ह्या गोष्टींचा प्रत्येकालाच अभिमान असावा. नि:स्वार्थ वृत्तीने आपला उत्कर्ष साधण्यात ह्या सर्वांचा महत्त्वाचा वाटा असतो. भाषेचा अभिमान सर्जनशीलता, उत्पादकता, परोपकार वाढवतो. जिथे ज्ञानदेव माऊली म्हणतात, ‘माझा मराठीची बोलु कवतुके, परी अमृतातेही पैजसि जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळविन.’ कुसुमाग्रज म्हणतात, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्‍याखोर्‍यातील शिळा.’ इतक्या समृद्ध कवींनी, साहित्यिकांनी लिहिलेल्या मराठी भाषेपुढे म्या पामराची काय जागा? नशिबाने गवसलेल्या ह्या ठेव्याचा मी सार्थ अभिमानच तर बाळगते.

मराठी भाषेने इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरव म्हणून, तसेच अभिजात भाषेचे निकष पूर्ण केल्याने, जसे की ’भाषा प्राचीन असावी. तिचे साहित्य श्रेष्ठ असावे. भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे, भाषेची स्वत:ची मूळ प्राचीन साहित्यिक परंपरा असावी, पण प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा. मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. भारतात तिसर्‍या क्रमांकाची ही भाषा आता महाराष्ट्रात सर्वं शासकीय कामकाजासाठीही वापरली जाते. भारतात एकूण बाराशे तेवीस बोलीभाषा. दोनशे चौतीस मातृभाषा. फक्त मराठीच्या बेचाळीस बोलीभाषा. इतका ठेवा असताना आपण भाषेचा प्राधान्यक्रमच बदलणे चुकीचे ठरत नाही का? माझ्या दिवसाची सुरुवात लताबाईंच्या स्वर्गीय स्वरात नाहलेल्या ’अजि सोनियाचा दिनु’ ऐकत व्हावी आणि दिवसाची सांगता ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे’ ऐकत व्हावी. याहून अधिक माझ्या तरी काही निर्भेळ आनंदाच्या अपेक्षा नाहीत.शेवटी मी माझ्या जन्मदात्रीला आणि माझ्या मराठी भाषेला उद्देशून म्हणते,माझ्या आयुष्याच्या हिर्‍याला धग सोसून दिलंस तू कोंदण,माझं अस्तित्वंच आई तू दिलेलं आंदण!

– डॉ. मोनाली हर्षे

( माझा भाषा अभिमान)

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech