काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, रफार, रूकार हा मराठी भाषेचा जणू साजशृंगार आहे. ह्या सर्व साजशृंगारात सजलेली आपली भाषा जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा तिचे सौंदर्य एखाद्या नववधूलाही लाजवेल असे असते.
……………………………….
बसमधून प्रवास करताना एकदा पाठीमागे बसलेल्या कॉलेज विद्यार्थ्यांचा संवाद कानावर आला, तो बहुधा मोबाईलवर बोलत असावा कारण दुसरा आवाज ऐकू येत नव्हता तर बोलणे असे होते… ’अरे यार, तुला त्या ऑथरचे इकॉनॉमिक्सचं बूक भेटलं का? तुला भेटलं तर मला एक दिवस रीड करायला दे…, अभ्यास करून फार बोअर होतंय रे उद्या एक पिक्चर टाकू या का, बोल…’ इत्यादी इत्यादी. मराठी भाषेचा खून करून तिचे तुकडे तुकडे करून हिंदी, इंग्रजी शब्द घालून पूर्ण वाट लावून झाली होती. धड मराठी नाही की धड हिंदी ना इंग्रजी. अगदी ऐकवत नव्हते ते बोलणे.
सध्या आपण आजूबाजूला पाहिले तर सर्वच मुलामुलींची भाषा अशी झाली आहे. यार, ऑथर, इकॉनॉमिक्स, बूक भेटलं, रीड, बोअर, पिक्चर टाकू या… कसली ही भाषा? आपल्या मराठी भाषेत यातील प्रत्येक शब्दाला समर्पक असे सुंदर शब्द आहेत. एक एक नव्हे तर एका-एका शब्दासाठी तीन-तीन चार-चार समानार्थी शब्द मराठी भाषेत आहेत, तरीही दुसर्या भाषांची घुसखोरी मराठी बोलताना सातत्याने होत असलेली आपण पाहतो, हे होत आहे फक्त आपल्या भाषेविषयी असणार्या अज्ञानामुळे, ती शिकण्यास असलेल्या उदासीनतेमुळे.ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची…
माझी मराठी, बोली मराठी, माय मराठी, माती मराठी, तू बोल मराठी. मराठी भाषा दिन. माझी मराठी, माय मराठी असे फक्त बोलताच नव्हे तर मनातही हे आले तरी ऊर भरून येतो, अशी आपली अवीट गोडीची, कानाला तृप्त करणारी मराठी भाषा आणि तिचा विशेष दिन ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा होत आहे. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित…असे जरी आपण ह्या भाषा दिनी गर्वाने छाती फुगवून म्हणत असलो तरी मराठी माध्यमाच्या शाळा दिवसेंदिवस ओस पडू लागल्या आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे मात्र पेव फुटले आहे. मराठी शाळेत विना शुल्क प्रवेश घ्यायला तयार नाहीत पण ह्या इंग्रजी शाळेत लाखो रुपये शुल्क भरून प्रवेश घेतला जातो. याचे मुख्य कारण मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून प्रगत केली गेली नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसायिक शिक्षण, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसारखे विषय मराठी भाषेत अनुवादित केले गेले नाहीत आणि एका मर्यादेपर्यंत लिहिलेही गेले नाहीत. त्यामुळे 10वी नंतर हे सर्वं विषय एकदम शिकण्यास अवघड जात असल्यामुळे पहिल्यापासूनच मराठीला फाटा देऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना प्रवेश घेण्याचा पालकांचा कल आहे. मायबोलीतच हे सर्व शिक्षण दिले गेले तर सर्वच मुलांना अजूनही सोपे झाले असते. कारण मायबोली वेगळी असल्यामुळे इंग्रजीत शिकले तरी प्रथम आपण याचे आकलन आपल्या मायबोलीतच करतो आणि पुन्हा इंग्रजीत. त्यामुळे ही खूपच मोठी तारेवरची कसरत मुलांच्या मेंदूत सुरू असते. हेच जर शिक्षण आपल्या मराठी भाषेत मिळाले तर महाराष्ट्रातील मुले जागतिक पातळीवर अजूनही पुढे गेली असती. महाराष्ट्राचा उत्कर्ष सर्व दुनियेच्या डोळ्यांत भरण्याइतका झाला असता. माझ्या मराठी मातीची खोलवर रूजे नाळ सळसळतो आतून माझ्या रक्तात पिंपळ… कविकल्पना किती सार्थ आहे! पण खरेच असे पाहायला मिळते का? फक्त खेड्यापाड्यातून हे दिसून येते. शहरांतून आपण पाहिले तर इंग्रजी बोलणे हा प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे. मराठीतून संवाद साधू लागलो तर अज्ञानाचे आणि अडाणीपणाचे लक्षण मानले जाते. हे फक्त महाराष्ट्रातच. दोन मराठी माणसे जरी समोर आली तरी बहुतेकवेळा हिंदी किंवा इंग्रजीतूनच संवाद होताना ऐकायला येतो. पण इतर राज्यात पाहिले तर पंजाबी, दाक्षिणात्य, गुजराती, मारवाडी, बंगाली हे आपापल्या बोलीभाषेतच बोलत असतात. मग आपल्यालाच मराठीचे एवढे वावडे का? आपल्यालाच मराठीची लाज का वाटावी?
मराठी भाषा ही मातृभाषा आहे तरी तिला शिक्षणाचे माध्यम न निवडता इंग्रजी माध्यम निवडून इंग्रजीला प्रथम भाषेचा दर्जा दिला जातो आणि मराठीला मात्र दुसर्या क्रमांकाचा दर्जा दिला जातो तर काही शाळांमध्ये तिसर्या तर काही शाळातून तो पर्यायी विषय असतो. अशी परवड आपल्याच महाराष्ट्रात मराठी भाषेची होत आहे. ज्येष्ठ कवी सुरेश भट यांनी खूप आधीच ही काळाची पावलं जणू ओळखली होती. ते म्हणतात… पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरात हाल सोसते मराठी इंग्रजीचे वर्चस्व वाढण्यास आपणच कारणीभूत आहोत. मराठी भाषा इतकी समृद्ध असतानाही ती ’ज्ञानभाषा’ झाली नाही. विज्ञान-तंत्रज्ञानाचे विषय आज मराठी भाषेतून शिक्षण देण्यास असमर्थ आहेत, कारण ह्या विषयांची पुस्तके मराठीतून लिहिलीच गेली नाहीत. अनेक मराठी लेखकांची प्रत्येक शाखेच्या विषयांची पुस्तके आहेत, पण ती त्यांनी मराठी भाषेत न लिहिता इंग्रजी भाषेतूनच लिहिली आहेत, इथेच पहिल्यांदा उदासिनता दिसून येते आणि इथूनच सुरुवात झाली मराठीची परवड होण्याची आणि इंग्रजी माध्यम निवडण्याची.
मराठी माध्यमातून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्र पुढील शिक्षणासाठी निवडल्यावर मुलांना ते सर्व विषय इंग्रजी भाषेत आल्यामुळे समजण्यास थोडे अवघड, कठीण होत जाते आणि त्याचा परिणाम त्यांच्या बारावीच्या गुणांवर व पर्यायाने पुढील क्षेत्र निवडीवर होतो. हेच पालकांनी जाणून किंवा स्वतःच्या अनुभवातून धडा घेऊन ते आपल्या मुलांसाठी पहिल्यापासूनच इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा पर्याय निवडतात. ह्या स्पर्धेत आपले पाल्य मागे पडू नये, हीच एक यामागे इच्छा असते. पण तीच आता घातक ठरत आहे. मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या खालावत जाऊन अनेक शाळा बंद पडत आहेत आणि याउलट इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता ह्या इंग्रजी माध्यम शाळेत मराठी भाषेचे स्थान अगदीच गरजेपुरते म्हणजे गुणांपुरते असते. बाकी इतर भाषिक मुलांकडून अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही, कारण मातृभाषा मराठी भाषा असणार्या मुलांचीच भाषा आज वर उल्लेख केल्याप्रमाणे तीनही भाषांची सरमिसळ केलेली असते. भेटले कधी म्हणायचे, मिळाले कधी म्हणायचे, सापडले कधी म्हणायचे यालाही काही नियम आहेत. माणसे भेटतात, वस्तू मिळतात किंवा हरवलेल्या वस्तू सापडतात. ’पिक्चर टाकू या का?’ हा शब्दप्रयोग ऐकून तर बसल्या जागेवरच मी उडाले होते. टाकायला ती काय एखादी वस्तू आहे का? पाहायला जाऊ या का वगैरे साधेसोपे मराठी असतांना भाषा अज्ञानामुळे काहीही तोडफोड करून बोलले जाते.
मुलींचे तर वेगळेच मराठी ऐकू येते, उदाहरणार्थ. ’मी आली होती तिकडे, मी थांबली होते मग निघाली तिथून, मी गेली तिकडून, मी जेवली… वगैरे वगैरे’. आले, गेले, खाल्ले, प्यायले, जेवले, निघाले अशी साधारण मुलींसाठी क्रियापदे वापरली जातात, पण सध्याची मराठी ऐकण्या नि समजण्या पलीकडची झाली आहे.
मराठी भाषेच्या अभ्यासाकडे केलेले दुर्लक्ष, दोन मराठी मित्र, मैत्रिणी असोत किंवा ग्राहक, दुकानदार असोत, ओळखीचे असोत आपसांत मराठी न बोलता हिंदी किंवा इंग्रजीतच बोलत असतात, अशी उदासीनता हे ह्या भाषेच्या अधोगतीचे एक कारण आहे. बाजारात किंवा बाहेर फिरतानाही काहीवेळा असे दिसून येते की लहान मुले आईवडिलांशी मराठीत बोलत असतात, त्यांना आपल्या मातृभाषेतून काहीतरी विचारत असतात, पण पालक मात्र अट्टाहासाने इंग्रजीतूनच त्याला उत्तरे देत असतात, हे ऐकतानाही त्यांची कीव करावी वाटते, ही अशी मराठीबद्दल अनास्था आहे आपल्याकडे.
बरे, माध्यम इंग्रजी निवडले असले तरी मराठी साहित्याचे अवांतर वाचन वगैरे करावे, पण तेही कोणी करत नाही. आपल्या मराठी भाषेइतके साहित्य अन्य कोणत्याही भाषेत लिहिले गेले नाही. कथा, कादंबरी, ललित, काव्य, नाट्य, भारूड, अभंग, आत्मचरित्र अशा अनेक साहित्यप्रकारांत विपुल साहित्य मराठी भाषेत आहे. इतकी समृद्धता कोणत्याही भाषेत नाही. तरीही मराठीची ही दुरवस्था आहे.
राज्य शासनाने गेल्या काही वर्षांत याबाबत काही ठोस पावलं उचलली आहेत. फक्त भाषेला अभिजात दर्जा मिळून चालणार नाही, तर आपणही वैयक्तिक पातळीवर मराठीचे अस्तित्व टिकविण्यास प्रयत्न करायला हवेत, ती ज्ञानभाषा होणे जरूरीचे आहे. मागे एकदा फक्त मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याविषयी घोषणा झाली होती, परंतु अजून तरी ती आमलात आलेली ऐकिवात नाही. मराठी राजभाषा दिन जवळ आला की राजकारणी नेते, शासन, नागरिक सगळे मराठीच्या अस्तित्वाबद्दल बोलत राहतात, चिंता व्यक्त केली जाते, घोषणाबाजी होते आणि मराठी राजभाषा दिन झाला की वर्षभर पुन्हा तिकडे दुर्लक्ष. परंतु, असे करून आता चालणार नाही तर गांभीर्याने काहीतरी विचार करून निर्णय घेऊन आचरणात आणावे लागतील.
मराठीच्या उदासीनतेबद्दल मुलांना विचारले तर उत्तर येते की खूप अवघड आहे भाषा, काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार असे बरंच काय काय द्यावं लागतं आणि ते लिहितानाच उशीर लागतो आणि चुकले तर गुण जातात. खरेतर आपल्या मराठी भाषेचे हेच तर सौंदर्य आहे काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, रफार, रूकार हा तिचा जणू साजशृंगार आहे. ह्या सर्व साजशृंगारात सजलेली आपली भाषा जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा तिचे सौंदर्य एखाद्या नववधूलाही लाजवेल असे असते. आणि नववधूला नटण्यासाठी थोडावेळ लागतोच ना? अशी ही आपली मराठी भाषा फक्त मराठी राजभाषा दिनासाठी अभिमानाने सांगण्यासाठी नसावी तर तिचा गौरव वर्षभर आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, कृतीतून जाणवायला हवा. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज-त्यांचाच जन्मदिन आपण ’मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करतो, ते म्हणतात… रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्णातुनी फिरे सरस्वतीची पालखी…पुढे ते म्हणतात… रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर येथे अहंता द्रवली झाले वसुधेचे घर…
मायबोली म्हणजे मातृभाषा. लहान मूल जन्मल्यापासून आईजवळच असते. तेव्हा ती ज्या भाषेत बोलते ती मुलाची भाषा होणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषा प्रत्येक प्रांताची निराळी. ती तेथील लोकांची होते आणि ती आवडते. आपली मराठी भाषा संस्कृत भाषेतून आली. तशा भारतातल्या बहुतेक सर्व भाषा संस्कृत भाषेपासून निर्माण झाल्या. आपण सर्वं मराठी भाषिक आहोत, याचा सार्थ अभिमान आहे. मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करताना देशातील आणि जगातील इतर सर्व भाषांचा सार्थ आदर करण्याचा मोठेपणा आपल्या भाषेने प्रदान केला आहे. मराठीचा निव्वळ अभिमान न बाळगता ह्या भाषेचे संगोपन व संवर्धन करा. इतर भाषांच्या साहित्यिक, कवी अशा सर्वांचा आदर करा. मराठी कविता, गीते, ललित साहित्य यांचे वाचन करणे हे मातृभाषेची भक्ती करण्यासारखेच आहे. मराठी भाषा हा शब्दांचा समृद्ध असा समुद्र आहे. इंग्रजी-हिंदी शब्दांचा मराठीबरोबर वापर करताना वेळोवेळी पर्यायी मराठी शब्दांचा शोध घ्या, त्यांचा वापर करा. कुठलीही भाषा, तिच्या मूळ स्वरुपात बोलणे हा त्या भाषेचा सन्मान आहे. व्यवहार व व्यवसाय करताना इतर जरुरीच्या भाषा आत्मसात करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे; पण म्हणून आपल्या भाषेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, याचे भान ठेवायला हवे. आपल्या मातृभाषेचे सामर्थ्य, सौंदर्य इतर भाषिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण जरूर करा. आपण सर्वं मराठी भाषेचा एक अविभाज्य भाग असून मातृभाषेचे ऋण फेडण्याची आपण प्रतिज्ञा करू या.
अस्मिता याचा अर्थ आपल्या सत्त्वाची जाणीव असणे. ’विज्ञान आणि तंत्रज्ञाना’त झालेल्या क्रांतीमुळे, आधुनिक मानवाला आपल्या ’संस्कृती’चा शोध घेताना इतरांकडून घेण्याची आपली क्षमता किती आहे, यावर ’अस्तित्व’ अवलंबून आहे. ’अस्तित्व’ टिकवल्यानंतरच ’अस्मिते’चा जन्म होतो. आजच्या संक्रमणकाळात त्याचबरोबर जागतिकीकरणातून जे घडू लागले आहे, त्यातून ’माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांती’ने जगभरातील अनेक बोलीभाषा मृत्युपंथाला लागतील, असे भाषा वैज्ञानिक सांगू लागले आहेत. ’भाषा-विज्ञान’ असे म्हणते की, मातृभाषेचा पाया उखडून कोणतीही इतर भाषा आत्मसात करणे चुकीचे आहे. ज्यांचे मातृभाषेवर प्रभुत्व असते, तेच इतरही भाषांवर प्रभुत्व मिळवू शकतात. आपल्या मातृभाषेतून भाषिक व्यवहार करणे कमीपणाचे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. मातृभाषा चांगली असल्याखेरीज जगातील कोणतीही भाषा चांगली येऊ शकत नाही. मानवाला प्रथम आपल्या ’अस्तित्वा’साठी संघर्ष करावा लागेल. जोवर आपण आपल्या मातृभाषेतून दैनंदिन भाषिक व्यवहार करीत राहू, तोवर ती भाषा जिवंत राहणार आहे.
– ज्योती हलगेकर-जाधव
( मायबोलीची थोरवी )