पाकिस्तान नष्ट करा!

0

ब्रिगेडियर सुधीर सावंत

आता भारताने हल्ला केला, त्याला पाक सैन्य प्रत्युत्तर दिल्ल्याशिवाय राहणार नाही. त्यालाही भारताला उत्तर द्यावे लागेल. रक्तपात होत राहील. सापाला जखमी करून चालत नाही. त्याला ठेचावेच लागते. पण हा हल्ला एक लुटुपुटुच्या लढाईचा भाग होता का, पाकचा कायमचा बंदोबस्त करण्याची सुरुवात होती, हे काळच ठरवेल. पाकचा बिमोड करण्याचे व भारताला कायमचे दहशतवादी हल्ल्यापासून वाचवणे हे उद्दीष्ट नसेल तर हा हल्ला एक स्टंट ठरू शकतो.

अखेरीस भारतीय सैन्य पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसलेच. जर ही माहिती सैन्याने दिली नसती तर मी खोटीच समजलो असतो. कारण सरकार जनतेला अनेकदा मूर्ख बनवत असते. जनरल सुहाग ह्यांनी पाकला आश्‍चर्यचकीत करून टाकले. आपल्या सैन्याच्या हल्ल्यात किती मारले गेले ह्याला महत्त्व नाही. पण सहा ठिकाणी आणि तेही एलओसीपार अनेक भागात एकाच वेळी हल्ले करणे ही सुहाग ह्यांच्या युद्धकौशल्याची निशाणी आहे. जनरल सुहाग स्वत: स्पेशल फोर्सेसचे प्रमुख राहिले आहेत.

म्हणूनच कधी केले नाही ते भारतीय सैन्याच्या कमांडो दलाने केले. त्यात प्रथमच गुप्त उपग्रहाचा वापर अत्यंत कौशल्याने करण्यात आला. शत्रूची सर्व माहिती अचूक मिळवली. सुहाग ह्यांनी कमांडो तुकड्या स्वत: निवडल्या. ह्या हल्ल्याची गुप्तता राखण्यात आली. सैन्य अशा हल्ल्यासाठी गेली अनेक वर्ष तयारी करून होते. दहशतवादी तळं निवडून ठेवण्यात आली होती. एलोसीपार घुसण्याचे आणि परत येण्याचे मार्ग निवडून ठेवण्यात आले होते. हेलिकॉप्टरमधून जाण्याचे मार्गही पारख्ाून घेण्यात आले होते. शस्त्रे, दारूगोळा, आहार, मेडिकल सर्व तयारी चोख होती. अल्पवेळात कूच करण्यासाठी पूर्ण तयारी झाली होती.

फक्त निवडक लोकांना युद्ध तंत्र व योजना माहीत होती. एकवेळ अशी येईल की आपल्याला अचानक पाकवर हल्ला करावा लागणार हे सैन्य दलाला माहीत होते. म्हणून ह्या हल्ल्याची पूर्ण तयारी करून ठेवण्यात आली होती. इतकेच नव्हे तर पाकचा प्रतिसाद काय असेल ह्याचा अंदाज बांधून त्याचा प्रतिकार करण्याची योजनादेखील तयार करण्यात आली.

हल्ला झाला व पहाटे चार वाजण्यापूर्वी सर्व सैनिक परत आले. हे हल्ल्याचे सर्वात मोठे यश होते. जनरल सुहाग आणि त्यांच्या सहकार्‍यांचे सर्वांनी अभिनंदन केले पाहिजे. त्याचबरोबर, स्पेशल फोर्सेसची बांधणी आणि तयारी अप्रतिम असल्याचे दर्शन झाले. अनेक वर्ष दहशतवाद्याविरुद्ध लढून भारतीय सैन्य अशा युद्धप्रणालीत सक्षम झाले आहे. त्यामुळे, पाकच्या एक हजार घावांनी भारताला रक्तबंबाळ करण्याच्या योजनेला तोडीस तोड प्रत्युतर देता येईल ही खात्री पटली.

29 सप्टेंबर हा दिवस भारताच्या इतिहासात एक पथदर्शक दिवस ठरला. एलओसीपार हल्ला पूर्वी कधीच झाला नव्हता. त्यामुळे, भारताची प्रत्युतर देण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. पुढे पाकने हल्ला केला तर काय होऊ शकते, हे आपण दाखवले आहे. फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. ती तात्पुरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवली. पण ते पुढे असेच आक्रमक राहतील की नाही, ह्यात शंका आहे. कारण अमेरिका भारतावर दबाव आणणार. मी काँग्रेसचा खासदार, आमदार होतो. मी असा हल्ला करण्याबद्दल अनेकदा काँग्रेस नेतृत्वाला विनंती केली होती. पण निराशा झाली. पण आता हे अतिकठीण काम सैन्याने सहजपणे केले. म्हणून जनरल सुहाग आणि सैन्याला मी सलाम करतो. ह्या हल्ल्यामुळे सैन्याचा आत्मविश्‍वास वाढला. पण पुढे काय? मी पाकिस्तान नष्ट करा, ही मागणी केली होती. पाक हे दहशतवादी राष्ट्र आहे. एव्हढेच नव्हे तर माफियांचे केंद्र आहे. इथूनच जगभर अफू आणि हेरॉईन अशा मादक पदार्थांची तस्करी होते. त्यातून पंजाबची युवा पिढी नष्ट झाली. मुंबई, दिल्ली, कोलकातासारख्या शहरात ह्या अमलीपदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढले. हा भारताला प्रचंड धोका तर आहेच, पण अंतिमत: युरोपच्या शहरात ड्रग्स पोहोचवणारे मुख्य केंद्र पाकिस्तान हेच आहे. तरीही युरोप आणि अमेरिका पाकलाच मदत करतात. हीच भारतातील आणि जगातील सामान्य माणसांच्या आकलनापलीकडील बाब आहे.

पाकने अनेक वर्षे भारतामध्ये गुप्त युद्ध सुरू ठेवले आहे. आतापर्यंत त्यात भारताचे 7 हजार सैनिक मारले गेले आहेत. उरीत 19 सैनिकांना मारण्यात आले व भारत चवताळला. खैबर भागात पठाण बंड करत आहेत. बलूची तसेच सिंधी बंड करत आहेत. भारताने युद्धाची धमकी जरी दिली तरी हे सर्व भाग पेटून उठतील. सैन्याने एलओसीपार हल्ला केल्याचे परिणाम लगेच आले. पश्‍चिम भागातून पाकने अनेक तुकड्या भारतीय सीमेवर आणल्या. परिणामत: तालिबान मोकळे झाले. त्यांचे पाकवर हल्ले आणखी तीव्र होतील. तसेच बलूच सिंध प्रांतात बंडाळी प्रचंड प्रमाणात वाढेल. भारताबरोबर युद्ध करताना आता पाकला दहशतवादापासून प्रचंड धोका आहे. पण भारतही काही मुक्त नाही. काश्मिरमध्ये आणि भारतात अनेक ठिकाणी दहशतवादी सेल पाकने पेरले आहेत. ते अचानक जागे होतील व सैन्यावर पाठीमागून वार करतील.

आता भारताने हल्ला केला, त्याला पाक सैन्य प्रत्युत्तर दिल्ल्याशिवाय राहणार नाही. त्यालाही भारताला उत्तर द्यावे लागेल. रक्तपात होत राहील. सापाला जखमी करून चालत नाही. त्याला ठेचावेच लागते. पण हा हल्ला एक लुटुपुटुच्या लढाईचा भाग होता का, पाकचा कायमचा बंदोबस्त करण्याची सुरुवात होती हे काळच ठरवेल. पाकचा बिमोड करण्याचे व भारताला कायमचे दहशतवादी हल्ल्यापासून वाचवणे हे उद्दीष्ट नसेल तर हा हल्ला एक स्टंट ठरू शकतो. राज्याच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून राजकारणासाठी मोदींनी हा हल्ला केला, असा काही लोक आरोप करत आहेत. पर्रीकर आणि त्यांची संघ परिवाराची फौज श्रेय उपटण्याची संधी सोडत नाहीत. पण राष्ट्रीय सुरक्षा विषयावर राजकारण नको, असे मी नेहमी म्हणतो. त्यामुळे मोंदीच्या ह्या भूमिकेला सर्वांनी पाठिंबाच दिला पाहिजे. पण हा डाव आपल्यावर उलटू नये. कारण मोदींचा हा स्टंट असेल तर पाक गप्प बसणार नाही. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद अशा गटांना आता पाक आणखी फूस लावणार व भारतात हल्ले करायला लावणार. इतके दिवस हेच चालले आहे. पाकला नष्ट करणे ह्या एकमेव उद्दीष्टाने आपण पुढे गेलो नाही, तर पाकला आयती लुटुपुटुची लढाई खेळायला संधी देत आहोत. 1979 पासून हेच सुरू आहे.

पाकचे शक्तीस्त्रोत अमेरिका आहे. ह्या हल्ल्याला युनोसकट पूर्ण गोरे जगत महत्त्व देत नाहीत. उलट हा हल्ला झालाच नाही, असा अपप्रचार केला जात आहे. दुर्दैवाने भारतातील काही राजकीय नेते ह्याला दुजोरा देत आहेत आणि मोदी व मीडिया असे भासवत आहे की पूर्ण जग आपल्याबरोबर आहे. ह्या शहामृगी स्वभावाने भारत बरबादीच्या दिशेने गटांगळ्या खात वाटचाल करत आहे. मोदींनी जरी सैन्याला खोटी माहिती देेण्याचा आदेश दिला, तरी सैन्य कदापी ऐकणार नाही. त्यामुळे हल्ला झालाच नाही, असे म्हणणारे कारण नसताना जनतेची दिशाभूल करत आहेत. वस्तुस्थिती ही आहे की अमेरिका आणि नाटो देश पाकच्या बाजूनेच कायम राहिले व कायम राहतील. कारण 1959 पासून पाक अमेरिकन सुरक्षा करारात अमेरिकेची भागीदार आहेत.

म्हणूनच मी नेहमी मांडणी केली आहे की जोपर्यंत पाकिस्तान आहे तोपर्यंत अमेरिका आणि सौदी अरेबिया पाकला शक्ती देत राहणार व पाक भारताला त्रास देत राहणार. म्हणून पाकचा कायमचा निकाल लावला पाहिजे. ते युद्ध न करता झाले तर ठीकच. नाहीतर इंदिरा गांधी ह्यांनी ज्याप्रमाणे बांगलादेश निर्माण केला त्याप्रमाणेच पुढे जावे लागेल. पाकच्या शेजारील सर्व देश पाकविरोधी आहेत. इराण, अफगाणीस्तान, तालिबान सर्व पाकाला शत्रू मानतात. विशेष म्हणजे ते सर्व मुस्लीम देश आहेत. म्हणून हा लढा हिंदू, मुस्लीम असा करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. चीन शक्यतो पाकला मत करणार नाही. म्हणून त्यांनाही डिवचायचा प्रयत्न करू नये. भारताने चीनविरुद्ध अमेरिकेला साथ देण्याचा प्रयत्न करू नये. अमेरिका एकीकडे भारताला चीनविरुद्ध भूमिका घेण्यास भाग पाडत आहे व दुसरीकडे चीनबरोबर प्रचंड व्यापार वाढवत आहे. बहुतेक अमेरिकन कंपन्या आज चीनमध्ये प्रचंड गुंतवणूक करून बसल्या आहेत. म्हणून अमेरिका कधीच आपल्या बाजूने येणार नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे, काश्मीरमधील भाजप, पी.डी.पी. आघाडी ही सुरुवातीपासून दूषित आहे. दहशतवादाला पोषक आहे. ज्यावेळी हे सरकार अस्तित्वात आले तेव्हा श्रीनगरमध्ये समारंभ झाला. त्यावेळी मोदींच्या उपस्थितीत मुफ्ती सय्यद ह्यांनी निवडणूक शांततेने पार पाडू दिल्ल्याबद्दल पाकिस्तानचे आणि दहशतवाद्यांचे आभार मानले होते. मोदींनी तेव्हा चकार शब्दसुद्धा उच्चाराला नाही. तरी सर्व पक्षांना विनंती राहील की देशहितासाठी राजकीय वाद बाजूला एकदा तरी ठेवा. हा प्रश्‍न कायमचा कसा सोडवता येईल ते पाहिले पाहिजे. काश्मीरची आम जनता ही मोठ्या संख्येने भारताबरोबर आहे. त्यांच्यावर प्रचंड अन्याय झाला आहे. विकासाचे नावच नाही. आहे तो फक्त भ्रष्टाचार. शेवटी काश्मीरच्या जनतेला आपल्यासोबत आणावेच लागेल. त्यासाठी काश्मिरचा खरा विकास झाला पाहिजे. खरा विकास करा. मग कोण कशाला बंदूक हातात घेतो. अंतिमत: हे एक सत्य आहे. हा प्रश्‍न कायमचा सोडवण्याचा मार्ग काय? ह्याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी आजची परिस्थिती निर्माण कशी झाली ते पाहू.

दहशतवाद हे कमजोरांचे हत्यार असते, असे म्हटले जाते. संख्येने कमी असलेले लोक लहान सहान टोळ्यांनी वावरतात. दोन-चार लोक अचानक हल्ला करतात आणि असा हल्ला करतात की त्यातून संपूर्ण देशात दहशत पसरली पाहिजे. पंपोरेचा हल्ला तसाच आहे. सर्जिकल स्ट्राइकनंतर पाक असेच लहान हल्ले करत राहणार. काही ठिकाणी कमी लोक मारले जातील तर काही ठिकाणी 100 – 200 मारले जातील. ही पाकची नीती पूर्वीपासूनच आहे. प्रत्यक्ष युद्ध न करता, भारतावर हजार घाव घालायचे. भारताला रक्तबंबाळ करायचे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइक भारताने केले तरीपण त्यावर समाधान मानून चालणार नाही. तसे झाले तर भारताला आणखी घाव झेलावे लागतील आणि आणखी अनेक सैनिक व नागरिक मारले जातील. अमेरिकेने ओसामा बिन लादेनला पाकमध्ये घुसून मारले. पण त्यानंतर पाकच्या अफगाण सीमेवरून अनेक हल्ले होत आहेत. तात्पर्य हेच आहे की सर्जिकल स्ट्राइकनंतर सातत्याने पाकविरुद्ध हल्ले करत

राहावे लागतील. वेळप्रसंगी पाकमधील बंडाळीचा उपयोग करून युद्धाचा मार्गसुद्धा पत्करावा लागेल.
1980 पासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी टोळ्या निर्माण करण्यास अमेरिका आणि सौदी अरेबियाने सुरुवात केली. वर अफगाणिस्तानमध्ये घुसलेल्या सोव्हिएत (रशियन) सैन्याविरुद्ध जिहाद जाहीर करण्यात आला; तरी भारताविरुद्धसुद्धा अमेरिकेने दहशतवादी टोळ्या निर्माण केल्या. सौदीनी वाहबी इस्लामच्या प्रसारासाठी ह्या संघर्षाचा वापर केला. सर्व दहशतवादी टोळ्यांना वाहबी इस्लाम स्वीकारायला लावले. पाकने लेखी वाहबी इस्लाम हा राष्ट्रीय इस्लाम 1987 ला बनवला. लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद सौदी अरबियाने वाहबबी इस्लामवर निर्माण केला. हफीज सय्येदच्या सर्व कुटुंबियांना हिमाचलमध्ये कंठस्नान घालण्यात आले होते. म्हणून भारताविरुद्ध सूडभावनेने तो पेटला आहे. त्याला सौदी अरेबियातून पाकमध्ये पाठवण्यात आले. लाहोरजवळ मुरिडके येथे त्याला जमीन देण्यात आली. आज ते एक आंतरराष्ट्रीयस्तरीय दहशतवादाचे केंद्र आहे. हे केंद्र आयएसआय आणि पाक सैन्याच्या आदेशावर चालते. जैश ए मोहम्मदसुद्धा असेच आहे. आज फार कमी काश्मिरी युवक दहशतवादी गटात आहेत. मुख्यत: आयएसआयने लश्कर आणि जैश ह्या गटांनाच शक्ती दिली. हे गट काश्मीरपुरते मर्यादित नाहीत तर पूर्ण भारतभर उद्रेक करण्याची त्यांची तयारी आहे. हे गट अमेरिकेविरुद्ध कारवाई करत नाहीत. म्हणून अमेरिका त्यांच्याविरुद्ध काहीच करत नाही व भारताकडून तालिबान, पठान व त्यांच्या शत्रूविरुद्ध सहकार्याची अपेक्षा ठेवते.

पाकने खलिस्तान, आसाम कश्मीर, तामिळ वाघ ह्यांचा भारताविरुद्ध भरपूर उपयोग केला. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर पाकने हिंदू मुस्लीम दंगे घडवण्याची एकही संधी सोडली नाही. त्याला भारतातील मनुवादी शक्तींनीदेखील समर्थ साथ दिली. हाच सर्वात मोठा धोका आहे. कारण आज ईसीसचे आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे नवीन स्वरूप निर्माण झाले आहे. लष्कर आणि ईसीस हे सहयोगी दल होऊ शकतात. भारतात ईसीसचा मोठा प्रभाव निर्माण होऊ शकतो. कारण ईसीस सर्व दहशतवादी गटांप्रमाणे वाहबबी इस्लामचा प्रसार करतो व इतर मुस्लीम जमातींना मारून टाकण्याची भाषा करतो. त्याने खलीफत जाहीर केली आणि जगातील मुसलमानांना आपले हुकूमत स्वीकारण्याचा आदेश दिला आहे. सर्जिकल स्ट्राइकचे उत्तर पाक स्वत: न देता दहशतवादी गटांकडून देणार आहे.
म्हणूनच माझा आग्रह आहे की पाकला नष्ट करा. कारण जोपर्यंत पाक आहे तोवर आणखी हजार घाव भारताला झेलावे लागणार. मोदींनी जर हे केले नाही तर आताचा सर्जिकल स्ट्राइक हा एक राजकीय स्टंट ठरेल. भाजपने ह्या घटनेचा पूर्ण राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. लाखो पोस्टर मोदींना रामाच्या रूपात आणि पाकला रावणाच्या रूपात प्रदर्शित करत आहेत. तिथे राहुल गांधीसुद्धा लहान मुलासारखे रडू लागले की मोदींनी माझे चॉकलेट घेतले. आज वेळ आहे ती सर्व राजकीय नेत्यांनी भारतासाठी एक होण्याची. कारण भारतासमोर खरे आव्हान अमेरिकेचेच आहे. अमेरिकेचे अधिकृत आंतरराष्ट्रीय धोरण आहे ते ‘एकसंध आणि मजबूत पकिस्तान हे अमेरिकेच्या सुरक्षेला अनिवार्य आहे’. त्याला पुष्टी अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंह आणि मोदींनी दिली आहे. कारगील युद्धात वाजपेयींनी सैन्याला सीमा पार करू दिली नाही व नवाज शरीफला मिठी मारायला मोदी पाकला गेले. पर्रीकर आणि मोदींनी अमेरिकेला आपल्या सुरक्षा उत्पादन व्यवस्थेत शंभर टक्के सूट दिली. भारताची बंदरे आणि विमानतळे, अमेरिकेच्या सैन्याला वापरायला दिली. त्यातून भारताला घोर संकटात टाकले आहे. अमेरिका हे पाकला मदतच करत राहणार. पाकला एकसंध आणि शक्तिशाली बनवणार, मग तुम्ही पाकला नष्ट कसे करणार?

पाकला मी कधी मुख्य शत्रू मानलेच नाही. तो तर अमेरिका आणि सौदीच्या तुकड्यावर गुजराण करणारा एक भिकारी देश आहे. पाकमधील एकाही राज्याला पाकमध्ये राहायचे नाही. शेजारची मुस्लीम राष्ट्र, इराण, इराक, अफगानिस्तान पाकच्या पूर्णपणे विरोधात आहेत. तालिबान हा वाहबबी इस्लामविरुद्ध आहे. तोदेखील पाकवर हल्ला करतो. एकंदरीत वाहबबी इस्लामविरुद्ध अनेक इस्लामिक पंथ संघर्ष करत आहेत. भारतात हा संघर्ष अनेक वर्षे चालला आहे. राज्यकर्त्यांना हे समजलेच नाही. पाक आणि सौदी अरबीयांनी भारतात वाहबी इस्लामच्या प्रसारासाठी प्रचंड पैसा पेरला आहे. भारतीय आणि विशेषत: मराठी मुसलमानांवर आक्रमणच आहे. दहशतीमुळे कोणी बोलत नाहीत. वाहबबी इस्लामला विरोध करण्यासारखे तसे काही कारण नाही. पण हा इस्लाम दहशतवादी आणि पाकिस्तान वापरतात म्हणून भारताला अंतर्गत धोका मुख्यत: वाहबबी दहशतवाद्यांकडून आहे. त्यात ईसीसची जगावर कब्जा करायची मनीषा भारतात आग लावू शकते.

ह्या सर्व परिस्थितीचा विचार भारत सरकार करत नाही, हाच देशाला खरा धोका आहे. इंदिरा गांधींनी पाकचे दोन तुकडे केले. त्यात त्यांचे धाडस, दूरदृष्टी आणि राजकीय कौशल्य दिसले. आजदेखील तीच गरज आहे. पाकला नष्ट करणे हे फक्त युद्ध करून होणार नाही, तर राजकीय, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीपणा पणाला लावावा लागेल. सर्वांत प्रथम अमेरिकेला इशारा दिला पाहिजे की तुम्ही एकतर भारताबरोबर राहा किंवा पाकबरोबर राहा.

पाकला दहशतवादी राष्ट्र घोषित करा नाहीतर आम्ही तुम्हाला दहशतवााविरोधात लढण्यास साथ देणार नाही. दुसरे म्हणजे, काश्मीरला चांगले शासन व प्रशासन केंद्राने द्यावे. लोकांना नोकर्‍या, रस्ते, शाळा, पाणी, आरोग्याच्या सर्व सुविधा सैन्याच्या सद्भावना कार्यक्रमातून द्याव्यात. राज्य सरकार पैसे खाण्याचे काम करते. तिसरे, भारतातील मुस्लीमअंतर्गत संघर्षावर भारतीय मुसलमानांना पूर्ण संरक्षण दिले पाहिजे.

त्यांचे प्रश्‍न समजून घ्यावेत. मुसलमानांमध्ये असुरक्षिततेची भावना राहू नये. हिंदू- मुस्लीम द्वेष निर्माण करणार्‍यांना ठेचून काढावे. गाय-बैलांचे राजकारण बंद करावे. दहशतवादी लोक मग ते हिंदू असू द्यात किंवा मुसलमान, त्यांना निवडून नष्ट करावे. मुळात सरकारला अंतर्गत सुरक्षा, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण नव्याने बनवून पाकचा कायमचा तोडगा काढावा. नाहीतर मोदींसाहेबांना एक वर्षाने स्टंटमन म्हणून ओळखले जाऊ लागेल हे आताच सांगतो.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech