जागतिक पातळीवर इंधन दरवाढ आणि पुरवठ्याचा तुटवडा जाणवत असताना, सायबर भामट्यांनी आता सर्वसामान्यांच्या भीतीचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. गॅस कनेक्शन कापले जाईल, असा धमकीचा मेसेज पाठवून लोकांची फसवणूक करण्याचे सत्र सुरू झाले आहे.मुंबईतील एकाच पोलीस ठाण्यात महिनाभरात चार तक्रारी दाखल झाल्या आहेत. या चारही प्रकरणांत फसवणूक करणाऱ्यांनी ७० लाख रुपयांहून अधिक रकमेवर डल्ला मारला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर भामटे प्रामुख्याने महानगर गॅस लिमिटेड (MGL)च्या नावाचा वापर करून ग्राहकांना लक्ष्य करत आहेत. ग्राहकांना टेक्स्ट मेसेज पाठवला जातो की, “तुमचे गॅस बिल थकीत असल्याने आज रात्री कनेक्शन कापले जाईल.मेसेजमध्ये एका कथित अधिकाऱ्याचे नाव आणि मोबाईल नंबर दिलेला असतो. जेव्हा ग्राहक घाबरून फोन करतो, तेव्हा त्याला ‘CA नंबर’ ब्लॉक झाल्याचे सांगून एक बनावट ‘APK’ फाईल पाठवली जाते.
ही फाईल डाऊनलोड करून त्यात बँक खात्याचा तपशील किंवा डेबिट कार्डची माहिती भरताच, आरोपी ग्राहकाच्या मोबाईलचा ताबा मिळवतात आणि खात्यातून पैसे लंपास करतात. एका प्रकरणात, विमा कंपनीतील ६४ वर्षीय निवृत्त महिला कर्मचाऱ्याला गॅस कापला जाईल असा मेसेज आला. आरोपीने त्यांना एक ‘APK’ फाईल पाठवली. महिलेचा आयफोन असल्याने ती फाईल डाऊनलोड झाली नाही, म्हणून भामट्याने त्यांच्या पतीच्या अँड्रॉइड फोनवर फाईल पाठवून केवळ ७ रुपये भरण्यास सांगितले. डेबिट कार्डची माहिती भरताच, दुसऱ्या दिवशी त्यांच्या खात्यातून २६.५३ लाख रुपये आणि पतीच्या खात्यातून ४५,००० रुपये चोरीला गेले.
इतर दोन प्रकरणांतही अशाच प्रकारे ‘MGL’च्या नावाखाली बनावट फाईल्स पाठवून अनुक्रमे २०.२७ लाख आणि १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
“गॅस एजन्सीचे अधिकृत प्रतिनिधी फोनवर तुमच्या बँक खात्याचा तपशील, ओटीपी किंवा डेबिट कार्डची माहिती कधीही मागत नाहीत. अनोळखी व्यक्तीने पाठवलेली कोणतीही फाईल किंवा लिंक डाऊनलोड करू नका.”