साहित्य म्हणजे बोलल्या-लिहिल्या गेलेल्या कलाकृतींचा एक साठाच असतो. वाचनामुळे वाचक, उत्तम कलाकृतींमुळे प्रेक्षक समृद्ध बनतो. अशाप्रकारची साहित्यं, माणसाला नवीन विचार करायला उद्युक्त करतात. साहित्यनिर्मिती ही मानवी जीवनव्यवहाराशी संबंधित आहे; जोडलेली आहे.
कोणत्याही भाषेला; अगदी आपल्या मायमराठीलासुद्धा समृद्ध करतं ते साहित्य. बोली भाषेचा, व्यावहारिक भाषेचा आपापला एक गोडवा असतोच. पण तो सर्वदूर पोहोचवण्याचं काम साहित्य करतं. वर्तमान कालापासून प्राचीन-अर्वाचीन काळाची इत्थंभूत माहिती साहित्यामुळे सर्वांसाठी खुली होते. साहित्याचा उगम कुठून झाला हे शोधून काढणं म्हणजे ॠषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधण्यासारखंच आहे. एखाद्याने विचारलं की, लताबाई आणि आशाबाईंचं पहिलं गाणं तुम्ही कधी ऐकलंत? तर आपल्या आठवणीतही ते नसेल, कदाचित जन्माच्या आधीपासूनच ऐकतोय मी, आईच्या पोटात असल्यापासून. साहित्य म्हणजे प्रवास – भाषेपासून भावनेपर्यंतचा.
तसं पाह्यला गेलं तर लिखीत साहित्य आपल्याकडे खूप उशिरा आलं. त्याआधी प्राचीन वेद, पुराणं, गीता , अनेक ऋषींनी मुखोद्गत करून पिढ्यान् पिढ्या पुढे पाठवलेले दुर्मिळ ग्रंथोपनिषद हे प्रकार प्राचीन साहित्याचे आहेत. पुढे लेखनकला उपलब्ध झाल्यावर हे सर्व ज्ञान लिखीत रूपात साठवता आले. साहित्य म्हणजे काय? असा विचार आपल्या मनात येण्यापूर्वीच आपण साहित्याच्या सुपंथाला लागतो, असं मला वाटतं. आपल्याला बोलताही येत नसतं; लिहिता-वाचता येत नसतं, तेव्हापासूनच आपली मौखिक साहित्याशी ओळख होते. काऊ-चिऊच्या गोष्टी, उत्तम अर्थाची पण म्हणायला सोपी अशी बालगीतं-बडबडगीतं, अशी प्रवासाची सुरूवात करत, पाठ्यपुस्तके, दैनिक वर्तमानपत्रे, यांच्याबरोबर आपल्या हाती एक मोठा खजिना लागतो; तो म्हणजे बालसाहित्याचा! आणि मग त्याचा हात धरून पुढे ललितसाहित्याच्या प्रांगणात आपण पोहोचतो.
साहित्य म्हणजे बोलल्या-लिहिल्या गेलेल्या कलाकृतींचा एक साठाच असतो. कादंबरी, निबंध, नाटक, चित्रपट, प्रहसन, काव्य, रहस्यपट, शोकांतिका वगैरे कितीतरी प्रकार त्याच्यात अंतर्भूत होतात. कादंबरी, नाटक, चित्रपट यांसारख्या माध्यमातून एखादी कल्पित कथा तयार करून पात्रनिर्मिती, घटनानिर्मिती, शोक-भय-रहस्यनिर्मिती केली जाते. याच भावना वापरून उत्तम काव्यनिर्मिती केली जाते. पुस्तकांतून लेखक-कवी; वाचकाशी बोलत असतो, संवादच साधत असतो. साहित्यात उपलब्ध असलेले सर्व प्रकार आपल्याला पदोपदी मदतीस येत असतात. पाककृती, औषधांवरची पुस्तकं खरंतर डिक्शनरी सुद्धा ही तर हातातलीच पुस्तकं असतात, पण कधी कुठला लेख, एखाद्या पुस्तकातील मजकुर नकळत होकारार्थी विचारांची प्रसन्न झुळूक देऊन जाईल, एखादी नवीन प्रेरणा निर्माण करेल काही सांगता येत नाही. कुटुंबाची माहिती आणि महती सांगणारं पुस्तक कुलवृत्तान्त, इतर जगाला कदाचित विशेष महत्त्वाचं नसेल पण आपल्या संपूर्ण कुलाची माहिती आणि जगभरात विखुरलेले नातेवाईक यांची माहिती यातूनच कळते. कवितेचे अखंड विश्वच साहित्यातून आपल्यापुढे उलगडते. एखादा विषय मिळाला की त्यावर सहजसुंदर कविता करणारे कितीतरी कवी आहेत. सहज, साधे शब्द जे आपण रोज वापरतो पण कवीच्या दृष्टीस ते पडले की उत्तम काव्य होऊन आपल्या समोर येतात. प्रेमभावना, मैत्री, नात्यांचा गोडवा, दुःख व्यक्त करणारी, विरह वेदना सोसणारी अगदी एखाद्यावरची नाराजी, राग देखील कवितेतून स्पष्ट मांडतात. सर्वात उल्लेखनीय म्हणजे गदिमांची काव्यप्रतिभा; रामायणामधील प्रत्येक प्रसंगावर उत्कृष्ट आणि बारीक तपशिलासह जणू स्वर्गीय काव्य त्यांनी करून ठेवलंय. जे बुद्धिचापल्य कवितेत, तेच चित्रपटलेखनातही दिसून येते. गीतरामायणातील दोन गाणी, ‘माता न तू, वैरिणी’ आणि ‘दाटला चोहीकडे अंधार’ एका गाण्यात क्रोधकारक भावना म्हणजे प्रिय बंधू श्रीरामाला वनात पाठवण्याची आणि दुःखदायक भावना म्हणजे त्यांच्याच सिंहासनावर बसून राज्य करण्याची आणि दुसरं गाणं दशरथ महाराजांचं, मरणसमयीचं; निव्वळ वेदना प्रकट करणारं, श्रीरामाच्या विरहाने व्याकूळ झाल्याचं, ही दोन गाणी उत्कट भावनांची अगदी उत्तम उदाहरणं वाटतात. ‘गीत गोपाळ’मधील राधेचं, देवकीचं दुःख व्यक्त करणारी तर कृष्ण जन्माचा आनंद, बालबलरामाची गोड तक्रार अशी गाणी कितीतरी गोष्टींचा आनंद देऊन जातात. बालकवींची ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ सारखी फुलराणीची नितांत सुंदर कविता, नातं कसं टिकवायचं हे गाण्यातून सहज सांगणारे ‘श्यामची आई’ चित्रपटातील गीत; द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. बहिणाबाईंची धोपट मार्गावरील संसारापासून मनोव्यापाराची गुंतागुंत सहज उकलून सांगणारी काव्यरचना, शांताबाई शेळके, ना. धों. महानोरांपासून आत्ताचे गुरू ठाकूर, आयुष्यावर काही बोलणारे संदीप खरे यांनी सर्वं भावना सुलभ शब्दांत मांडल्या.
ह्याशिवाय मौखिक साहित्य असेही एक वाङमय आहे. इतिहासाच्या एकेका प्रसंगातून घेतलेले; बारीक तपशीलासह पण उत्तम काव्यपंक्तीत गुंफलेले पोवाडे, दंतकथा, अख्ख्या महाराष्ट्राची लोकधारा सांगणारी लोकगीतं, समस्त सुगृहिणी ज्याच्या निर्मात्या आहेत; अशा घरा-घरांतून गायल्या जाणार्या अवीट गोडीच्या ओव्या, भूप रागात सृष्टीनिर्मात्यांची सुरेल आळवणी करून त्यांना जागवणार्या; पुढे पेशवाईत माणसांच्या शौर्याला जागवणार्या होनाजी बाळांच्या भूपाळ्या, थोड्याशा कटू वाटणार्या पण एखाद्या परिस्थितीची थोडक्यात पण चपखल मांडणी करणार्या म्हणी असं मौखिक साहित्य जे एका पिढीतून दुसर्या पिढीकडे हस्तांतरित होतं आलंय. ते आजही वरचेवर वापरलं जातं.
नाटकं, चित्रपट, पुस्तकं यांच्याखेरीज अजून एक नवीन वाट, जी खरंतर मला स्तुत्य वाटते ती म्हणजे ऑडिओ बुक्स. मोबाईल किंवा तत्सम साधनांवर जुनी-नवी सर्व पुस्तकं उपलब्ध होतात, हल्लीच्या घाईगर्दीच्या आयुष्यात, जिथे रोजचे वर्तमानपत्र वाचायलाही सवड काढावी लागते, तिथे प्रवासात; रात्री झोपायच्या आधी, चालताना, फिरताना एकीकडे पुस्तकं/नवे विचार ऐकता येतात आणि आपलं कामही करता येतं. नव्या पिढीला एवढंच सांगेन की, शेक्सपिअर आणि बरंच परदेशी साहित्य वाचनीय, श्रवणीय आहे. परंतु, आपल्या मायबोलीतलं आणि आदिम काळापासून चालत आलेलं साहित्य अमृतासारखे आहे जे नवसंजीवनी देतं. शिवाय ते सहज ऐकता येईल असं आहे, तर ते जरूर ऐका.
‘मराठी साहित्य आणि मी’ हा विषय मांडत असताना जे साहित्य वाचत मी मोठी होत गेले ते आणि असेही साहित्य जे अजून सर्वं चराचर व्यापून दशांगुळे राहिले आहे ते, इतकी मोठी व्याप्ती त्यात समाविष्ट होते. माझ्याकडील ज्ञानकलशातील पाणी आणि पुढ्यात पसरलेला अथांग साहित्यसागर अशी ‘अ’चल आणि ‘क्ष’चल यांची व्यस्त मांडणी करावी लागेल. लहानपणी मोबाईल किंवा इतर माध्यमं नव्हती, जी काही मोजकी होती, दूरचित्रवाणी, रेडिओ त्यांच्या समर्पक वापराबरोबर वाचनाचा संस्कार घरातून होत असताना पंचतंत्र, रामायण- महाभारत, फास्टर फेणे, राजा शिवछत्रपती अशी बाळगुटी पित माझ्या बालसाहित्य प्रवासाला सुरूवात झाली. बाबासाहेब पुरंदरेंच्या ओघवत्या भाषेने शिवकाळात फेरफटका मारून आणला, महाराजांच्या युद्धात, मसलतीत स्वतः तिथे हजर आहोत असं वाटावं, इतकी चित्तरंजक सफर घडवून आणली. ना. स. इनामदारांनी ‘राऊ’, ‘शिकस्त’ यातून पेशवाई दाखवून आणली. त्यानंतर प्रसिद्ध व्यक्तिचित्रे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आत्मचरित्र ‘माझी जन्मठेप’; एकाच आयुष्यात नानाविध दुःख भोगून तन- मन स्वतंत्रता देवीच्या चरणाशी अर्पण करणारे सावरकर, सर्कशीतले प्रसिद्ध वन्यप्राणी शिक्षक दामू धोत्रे यांचे ’वाघ सिंह माझे सखे सोबती’ ज्यांनी वन्यप्राण्यांना फक्त शिकवलेच नाही तर त्यांची काळजी घेतली, त्यांना जीव लावला. साधनाताई आमटे ’समिधा’ यांनी हेमलकसाला मुहूर्तमेढ रोवण्यापासून आनंदवनाची निर्मिती होईपर्यंतचे रोचक वर्णन केलं आहे. अशी आशयघन पुस्तकं वाचनात आली आणि त्यांच्या विचारांनी झपाटून टाकले. समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या बालकथांनी आणि मोठं झाल्यावर त्यांच्या ग्रंथांनी, त्यातल्या अमूल्य विचारांनी भारून टाकलं. त्यांनी त्यांच्या जीवनात ज्या गोष्टी सहज अनुभवल्या त्या सामान्यांच्या आयुष्यात फार मोठा धडा ठरतात. मुसलमान शासकाच्या दंडेलीला न घाबरता तीन दिवस ठामपणे रामनामाचा जप करत उभे राहणारे रामदास स्वामी, तत्कालीन जनतेलाच नाही तर आपल्याला याही काळात सद्विचार असेल तर ठामपणे स्वतःला सिद्ध करायची शक्ती देतात. विवेकानंदांसारखी एखादी प्रभृती सत्य आणि प्रखर विचार असतील तर तुमच्या जन्म ठिकाणापासून हजारो मैल दूर सुद्धा तुम्ही तुमचे विचार पोचवू शकता हे दाखवते. लहान वयात देखील आदर्श ठरणारे आणि आदर्श लिखाण करून, नम्रपणे सर्वं यातना सहन करणारी ज्ञानोबामाऊली. तत्कालीन समाजाचे हाल सोसून तरणारी आणि पूर्ण समाजाला तारणारी ग्रंथसंपदा करणारे तुकाराम महाराज.
यानंतर वाचनात आली पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, व. पु. काळे यांची सुगमसंगीतासारखी सरळ, सुबोध शैलीतील पुस्तके. हसता हसता एखादी करूण परिस्थिती समोर ठेवत त्यावर विचार करायला लावणारे पु. ल., खुसखुशीत पण आपल्या रोजच्या आयुष्यातलेच प्रसंग आहेत असे कथाकथन करणारे आणि अर्थातच लिहिणारे व. पु., श्रेष्ठ नाटकं आणि ‘विशाखा’ सारखे लेखन करणारे कुसुमाग्रज यांची ’कणा’ सारखी सुंदर कविता अभ्यासून (पाठ्यपुस्तकात होती.) एक नवीन दृष्टी मिळाली. नंतर रहस्य-शौर्य असणार्या कथा घेऊन सुहास शिरवळकर, विजय बेडेकर वाचनात आले. मग अनेक मासिकांतून ललित कथा, स्फुट लेखन, लेख ज्यामधे विज्ञान; मानसशास्त्र, पुराणकालीन पण विज्ञानावर आधारित प्रयोग वगैरे लेखांनी मनाचा आणि मेंदूचा ठाव घेतला. तनाबरोबर मनाचाही सांभाळ करावा लागतो, त्याला शिस्त लावावी लागते हे सांगणारे पुस्तक ‘स्वयंशिस्त’; लेखक द. पां. खांबेटे, विज्ञानाची कास धरून नाना प्रयोगांनी सिद्ध केलेली डॉ. प. वि. वर्तकांची ग्रंथसंपदा. कितीतरी लेखक/लेखिका जे कवी/कवयित्री आहेत, त्यांची नव्याने ओळख झाली. शांताबाई शेळके, त्या कवयित्री म्हणून माहिती होत्या पण त्यांनी लिहिलेल्या एका काल्पनिक कथेचे दोन भाग (औट घटकेचा राजा आणि गाठ पडली ठका ठका) वाचनात आले आणि त्यांच्याबद्दलचा आदर आणखीच द्विगुणित झाला. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या वि. स. खांडेकरांची ’ययाति आणि देवयानी’ कादंबरी म्हणजे अद्भुत गोष्टींचं दालन आहे. दुर्गाबाई भागवतांचे लेखन म्हणजे साहित्याचा मुकुटमणीच आहे. याशिवाय, व्यंकटेश माडगुळकर यांची पुस्तके, ‘मनोगते’ (हे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे.) व्यक्त करणारे य. गो. जोशी. घरगुती पदार्थांमधून औषधांची ओळख करून देणार्या मालतीबाई जोशींचे पुस्तक नव्हे, घरचा छोटेखानी दवाखाना; तुम्हाला औषध हवंय का? आणि घरगुती उदाहरणं देऊन औषध सांगण्याची युक्ती. कदाचित अतिशयोक्ति वाटेल पण पाकशास्त्रावरील कमलाबाई ओगले यांचं सहज, समोर कृती करता करता सांगावं इतक्या सरळ; साध्या भाषेत असलेलं पुस्तक ‘रूचिरा’, उत्तम खाद्ययात्रा करत असताना मालतीबाई कारवारकर, ऋतुजा दिवेकर यांच्या पुस्तकांनी व्यायामाशी मैत्री करून देत जीभेवर ताबा मिळवण्याचे; अतिखाणं टाळून, योग्य आहार घेण्याबद्दलची माहिती दिली. गो. नी. दांडेकरांनी जसा इतिहासावर प्रकाश पाडला तसेच ‘दुर्गभ्रमणगाथा’, ‘दास डोंगरी राहातो’ हे रामदासांचे व्यक्तीचित्र उलगडणारे पुस्तक याशिवाय त्यांची इतर पुस्तकं, प्रसिद्ध चित्रपट, स्थळ वर्णन. साहित्यकृती जरी कल्पना असली तरी ती वास्तवातील घडलेल्या एखाद्या घटना-प्रसंगातूनच घेतली जाते, जशी विनय आपटे यांनी मांडलेली कुसुम मनोहर लेलेची कथा. दलितांच्या व्यथा कथेतून उलगडून दाखवणारे ‘जागल्या’कार दया पवार.विचार करायला लावणार्या पुस्तकांबरोबर हलकीफुलकी पुस्तके ही मनात रेंगाळतात; द. मा. मिरासदारांचा विनोदी खजिना, टिव्ही मालिकांबरोबर ‘अभयारण्य’ सारखं लेखन करणार्या अभय परांजपे यांची पुस्तकं, दिलीप प्रभावळकर, सुधीर गाडगीळ यांची अनुक्रमे बोक्या सातबंडे, लाईफ स्टाईल. मला अभिमान आहे की माझ्या नातेवाईकांनीही ह्या साहित्यदिंडीला हातभार किंवा ग्रंथभार लावला, साहित्य म्हणजे काय हे कळायच्या आधीच त्यांची पुस्तकं उपलब्ध होती. जनार्दन ओक यांची ‘निष्पाप’ कादंबरी व त्यावर आधारित चित्रपट, मिलिंद आमडेकर यांची भ्रमंती, पक्षी ह्याखेरीज अन्य पुस्तकं, पद्मा खांबेटे यांनी स्वतः अभ्यास करून लिहिलेले आयुर्वेदातील औषधींबद्दलचे पुस्तक, श्रीकृष्ण टिळक यांचे मोडी लिपीवरील पुस्तक आणि इतर विषयांवरील पुस्तके. ही सर्व आणि अशीच बरीचशी यादी मी वाचलेल्या, अगदी आजही हाताशी, माझ्या जवळ असणार्या पुस्तकांची आहे.
मुद्रित साहित्य सोडून मौखिक साहित्य बघितलं तर त्यानेही माझं जीवन समृद्ध केलंय. अनेक चित्रपट, नाटकं, अगदी प्रहसनं सुद्धा नवीन काहीतरी सांगून जात असतात. काही कलाकृती परत परत जशा बघण्यात येतील तसे त्यांचे आणखी नवनवे अर्थ उलगडत जातात. एखाद्या कलाकृतीचा विषय भगवद्गीतेसारखा सर्व काळात उपयोगी ठरतो, कुठल्याही काळात त्याचं सारं/महत्त्व कमी होत नाही, ते तसंच टिकून राहतं. एखादी चित्रकृती मनाचा फक्त ठाव घेत नाही तर आपल्या व्यक्तिमत्त्वात अगदी विरघळून जाते. त्यातली काल्पनिक पात्रं आपल्या सभोवती आहेत असं वाटतं आणि मग आपल्या आजूबाजूच्या माणसांमध्ये आपण ती शोधायला लागतो. तेव्हा आपल्याच माणसांचे काही गुण नव्याने आपल्याला कळतात. मराठी भाषेत अनुवादित केलेली काही पुस्तकंदेखील आपली पताका साहित्यविश्वात फडकवत आहेत.जसे की, ‘द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड’ लेखक डॉ. जोसेफ मर्फी यांचे पुष्पाताई ठक्कर यांनी अनुवादित केलेले पुस्तक आपल्या अचेतन मनाची शक्ती, मनाचं कार्य कसं चालतं; चांगले परिणाम मिळवण्यासाठी विचारांमधे कसे बदल करता येतील याबद्दलची खूप छान माहिती बारीकसारीक तपशिलासह मिळते. याखेरीज परदेशातील व्यक्तिमत्त्वांची आपल्या भाषेत ओळख करून देणारे, वीणा गवाणकर यांचे ‘एक होता कार्व्हर’.
वाचनामुळे वाचक, उत्तम कलाकृतींमुळे प्रेक्षक समृद्ध बनतो. अशाप्रकारची साहित्यं, माणसाला नवीन विचार करायला उद्युक्त करतात. साहित्यनिर्मिती ही मानवी जीवनव्यवहाराशी संबंधित आहे; जोडलेली आहे. प्र. के. अत्रे, विं. दा. करंदीकर, जयंत नारळीकर, भालचंद्र नेमाडे, यांसारखे प्रतिभासंपन्न लेखक ज्यांनी आपल्याला नवा विचार; नवी दिशा दिली. काही साहित्यसम्राटांनी त्यांची कल्पित पात्रं कायमस्वरुपी जिवंत करून ठेवली; पु. ल. देशपांडेंच्या व्यक्ती आणि वल्ली, चि. वि. जोशांची चिमणराव- गुंड्याभाऊची जोडी, भा. रा. भागवतांचा फास्टर फेणे, द. मां. मिरासदारांच्या व्यंकू पासून रामदास पाद्यांचा अर्धवटराव- आवडाबाईंपर्यंत.
सर्व वयोगटाच्या व्यक्तींना पचेल, रूचेल असे साहित्य आपल्याकडे आहे. साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी चालना मिळावी आणि याबाबत एकत्र येऊन विचार- विनिमय करण्याच्या हेतूने गेली कित्येक वर्षं, दरवर्षी मराठी साहित्यसंमेलन अखिल भारतीय स्तरावर आणि या वर्षीपासून वैश्विक स्तरावर भरवलं जात आहे. नवसाहित्यिक नवीन नवीन, उत्कृष्ट निर्मिती करत आहेत. मराठी साहित्याचे पाऊल नेहमी पुढेच पडत आहे आणि पडत राहीलं, मग शिवकालीन आक्रमणांसारखी, इंग्रजी राजवटीसारखी कितीही परचक्रं येऊ देत. एवढे थोर कलाशिल्प, साहित्य शिलेदारांनी वर्षानुवर्ष साकार केले आहे की कोणीही त्याचा नायनाट करून शकणार नाही. साहित्याचा यज्ञ जो प्राचीन साहित्य-ऋषींनी आरंभ केला आहे, त्यात नित्य नव्या समिधा; नवसाहित्य पडत आहेत आणि त्याचा, सर्वांचा, सर्वांगीण विकास करणारा, कल्याण करणारा पवित्र धूर सर्वत्र पसरतो आहे. साहित्याचा पसारा हा ब्रम्हांडात पसरलेला आहे, त्यापैकी मी एवढंच सांगू शकते की जे माझ्या बाळमुठीत सामावले गेलं, तेवढंच मी दाखवू शकले, जेवढं माझ्या सामान्य दृष्टीला झेपलं, तेवढंच पाहू शकले. शेवटी साहीर लुधियानवींच्या शब्दांत सांगायचं तर एवढंच म्हणेन की ‘मैं पल दो पल की वाचक / प्रेक्षक हूँ।’, उद्या अजून येतील साहित्य सृष्टीतील गोडवा टिपणारे, नवनवीन चैतन्यमयी विचार ग्रहण करणारे, साहित्यरूपी चंद्राच्या नवरसांचे भुकेल्या चकोराप्रमाणे सेवन करणारे. शेवटी ही एक यात्रा आहे, परंपरा आहे, सृष्टीचा न संपणारा वसंत ऋतू आहे, चिरतारूण्याचे वरदान लाभलेला सदाहरित बगिचा आहे, आपण आपल्या परीने चार घटका साहित्याचा आस्वाद घेणार, साहित्य पालखीला खांद्यावर घेणार आणि चार पावलं पुढे चालत जाऊन दुसर्याच्या खांद्यावर देणार आणि हा साहित्यसोहळा पुढे असाच चालू राहणार. – शलाका श्री. ओक-परांजपे
(मराठी साहित्य आणि मी)