प्रणिता खंडकर
नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही ना काही संकल्प करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. चला तर ह्या गुढीपाडव्यापासून, आपल्या मुलांवर, समाजातील युवकांवर श्रमप्रतिष्ठा आणि आर्थिक स्वावलंबनाचा संस्कार करण्यासाठी कटिबद्ध होऊ या. नवीन विचारांची गुढी उभारून, खर्या अर्थाने नवीन वर्ष साजरे करू या!
कुह्हु ईई कुह्हु! असा कोकिळस्वर, वसंताच्या आगमनाची ललकारी देतो. वातावरणात आंब्याचा मोहोर दरवळत असतो आणि मग वेध लागतात ते हिंदू नववर्षाचे – गुढीपाडव्याचे! शालिवाहन शकाची सुरुवात, ब्रह्माद्वारे विश्वनिर्मिती, आदिशक्तीचे प्रकटीकरण, श्रीरामाचा विजयदिन, भास्कराचार्यांची पंचांग निर्मिती, कापणीच्या हंगामाची सुरुवात अशा विविध कथा आणि परंपरा ह्या दिवसाशी जोडलेल्या आहेत.तसेच हा सण आपल्या आरोग्याशीही जोडलेला आहे. गुढी उभारण्यामुळे, विशिष्ट प्रकाशलहरी धातूच्या कलशात एकत्रित झाल्याने, सकारात्मक उर्जेचा लाभ होतो असे मानतात. ह्या दिवशी कडुनिंबाची चटणी खाण्याची प्रथादेखील, अति उष्णतेने होणार्या विकारांपासून संरक्षण करण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी, यासाठी आहे.
हे झाले व्यक्तिगत शारीरिक आरोग्याबद्दल! पण आपल्या सामाजिक आरोग्याचे काय? आजूबाजूला नजर टाकली तर दिसणारी अस्वच्छता, बेकारी, गुन्हेगारी, घटस्फोट, आत्महत्या यांची वाढती आकडेवारी ही समाजाच्या अनारोग्याचीच लक्षणे आहेत. मग हे आरोग्य कसे सुधारता येईल, याचा विचारही आपण करायला हवा ना? शिक्षण आणि आर्थिक स्वयंपूर्णता हे सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय महत्त्वाचे घटक आहेत.
आता तुम्ही म्हणाल, अहो आजकाल मोफत शिक्षणासाठी तर सरकारी सुविधा देखील मोठ्या प्रमाणात आहेत. मुले -मुली वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध पदव्या, पदविका मिळवत आहेत. साध्या शिपायाच्या पदासाठी द्विपदवीधर उमेदवारांचे शेकडो अर्ज येतात. मंडळी, यातच काहीतरी मोठ्ठी समस्या आहे, असे नाही का वाटत? ज्या शिक्षणाने स्वतःचे पोट भरण्याचीही सोय होत नाही, ते काय कामाचे? ह्या सर्व तथाकथित शिक्षित लोकांना शिपायाची का होईना, पण नोकरीच हवी आहे.
यांना इतर काही उद्योग करून रोजीरोटी कमावता येणार नाही का? आपण मुलांची जडणघडण करण्यात कुठेतरी चुकतोय का? याचा विचार नक्कीच करायला हवा आहे. आपल्या घरात उच्च शिक्षण घेत असणारी मुले, जणू पालकांवर उपकार करत आहोत, अशा थाटात जगतात. कॉलेजात घालायला विविध फॅशनचे कपडे, फिरायला स्कूटर, मोटरसायकल, हॉटेलिंगसाठी पॉकेटमनी हा त्यांना, त्यांचा, जन्मसिद्ध अधिकार वाटतो. पालक म्हणजे पैसे पुरवणारे यंत्रच जणू! शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, नोकरी मिळेपर्यंतही, ही मुले आई-वडिलांच्या जीवावरच निश्चिंत जगत असतात.
मान्य आहे की त्यांना योग्य मोबदला देणारी नोकरी लगेच मिळत नाही. पण मिळेल ते काम करून थोडेफार अर्थार्जन करायला काय हरकत आहे? अगदीच वाईट आर्थिक परिस्थिती असलेली मुले-मुलीच अशी कामे करून पैसे कमावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण मध्यमवर्गीय मराठी मुले मात्र खुशालचेंडूचे आयुष्य जगतात. काहीजण नैराश्यग्रस्त होऊन व्यसनांच्या आहारी जातात, तर काही आत्महत्या करण्याचे आत्मघातकी पाऊलही उचलतात.
त्यांना श्रमप्रतिष्ठेचा संस्कार देण्यात आपली तर काही चूक होत नाही ना, हे तपासून बघण्याची गरज आहे. कारण ती शाळेत शिकत असताना, ‘तू फक्त अभ्यास कर, तुला जे जे हवे ते मी आणून देईन’, ही सवय पालकच लावत नाही का? किंवा ‘नापास झालास तर बघ हं, मजुरी, हमाली करण्याची वेळ येईल’, हे आपले उद्गार, ह्या मुलांच्या मनात, या कामांबाबत तिटकारा निर्माण करत नसतील का? आपल्याकडून उच्च शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशात जाणारी असंख्य मुले आहेत.
ती परदेशात जी मिळेल ती नोकरी करतात, वृद्धांना मदतनीस, दुकानात सेल्सगर्ल, अगदी हॉटेलात वेटर किंवा भांडी धुण्याचे कामही करतात. मग यासारखी कामे आपल्या देशातही करता येणार नाहीत का? त्यात आपल्या मुलांना कमीपणा का वाटावा? परप्रांतीय लोकांच्या घुसखोरीमुळे, स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाही, असा ओरडा आपण नेहमीच करतो, ऐकतो. काहीअंशी हे सत्य असले, तरी इथे पाय रोवून उभे राहण्यासाठी, ते करत असलेली मेहनत, प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांनी केलेली तडजोड, याकडे मात्र आपण सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करतो.आपण बाबूगिरीला अवास्तव महत्त्व देत आहोत का? इंग्रजी अंमलाचा हा मोठाच दुष्परिणाम! आपले दैनंदिन जीवन सुरळीत चालण्यासाठी शिक्षक, सोनार, शिंपी, सुतार, लोहार अशा विविध व्यावसायिकांची गरज असते.
पण आपले परंपरागत व्यवसाय करण्यापेक्षा, नोकरी करण्यातच धन्यता मानणार्यांची संख्या जास्त आहे. कारण आपण, आपला समाज, ह्या व्यवसायांना कमी दर्जाचे समजतो. आज सधन शेतकरी मुलाशीही लग्न करायला, मुली तयार नाहीत. त्यांनाही महिन्याला ठरावीक रक्कम घरी आणणारा नोकरदार मुलगाच हवा असतो. आपण अनेक परदेशी गोष्टींचे निव्वळ अंधानुकरण करतो. वाढदिवसापासून, रोझ डे, चॉकलेट डे, मदर्स डे असे विविध दिवस, त्यांच्या पद्धतीने साजरे करतो. मग त्यांच्या चांगल्या पद्धतींचे अनुकरण का नाही करायचं? सामाजिक स्वच्छता, नियम, कायदे कटाक्षाने पाळणे, शालेय शिक्षण संपल्यावर आर्थिकदृष्टया स्वावलंबी होणे, हे अंगिकारले तर व्यक्ती, समाज आणि पर्यायाने देशहिताचेही आहे. नुकतीच मी मध्यप्रदेशातील लेपानगरच्या, नर्मदालयाला भेट दिली. आदरणीय भारतीताई ठाकूर यांनी सुरू केलेली ही निवासी शाळा आहे.
तिथल्या अशिक्षित, गरीब समाजाची गरज ओळखून, जीवनावश्यक शिक्षण देणारी ही संस्था त्यांनी स्थापन केली. इथले विद्यार्थी शाळा सुटली की त्यांना आवडणार्या कामात सहभागी होतात. मग ते शिवणकाम असो, बागकाम असो, गोपालन असो अथवा एखादे तांत्रिक काम असो. लहानशा पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झालेल्या या शाळेचे रूपांतर आज नर्मदालय ह्या मोठ्या संस्थेत झाले आहे. इथल्या शाळेसाठी लागणारे सर्व फर्निचर म्हणजे खुर्च्या, टेबल, बाकडी, कपाटे इत्यादी, ह्या विद्यार्थ्यांनीच तयार केलेले आहे. सकाळच्या चहा-नाश्त्यापासून, रात्रीच्या जेवणापर्यंतचा सर्व स्वयंपाक इथली मुलेच बनवतात. रोज लागणारी भाजी इथेच पिकवली जाते. एकमेकांचे केस कापण्याचे कामही मुले आवडीने करतात. याच मुलांनी संगिताची आवड जोपासत स्वतंत्र वाद्यवृंदही निर्माण केला आहे.
आपल्या शालेय अभ्यासक्रमात अशा विविध व्यवसायांची, किमान तोंडळख करून देणारे उपक्रम समाविष्ट करता येतील का? आपण मुलांच्या मोठ्या सुट्ट्यांचा उपयोग यासाठी करून घेऊ शकतो ना! पूर्वी एकत्र कुटुंबात कामाची विभागणी होत असे. आपण राहात असलेल्या गृहसंकुलाला एक कुटुंब समजून, हा प्रयोग करून बघता येईल का? मोठ्या मुलांनी, लहान मुलांचा अभ्यास घ्यायचा, त्यांना एकत्र करून खेळ शिकवायचे, कधी एकत्र सहभोजन करायचे.
त्याचे नियोजन करणे, भेळ, सॅन्डविच यासारखे पदार्थ सगळ्यांनी मिळून बनवणे, हे जमण्यासारखे नाही का? सोसायटीतील वृद्ध व्यक्तींना पेपर वाचून दाखवणे, औषधे, भाजीपाला अशा गरजेच्या वस्तू आणून देणे हे करता येईल ना! आजची पिढी टेक्नोसॅव्ही आहे, म्हणजे तंत्रज्ञान सहज वापरू शकते. मग ह्या तंत्रज्ञानाच्या मदतीने घरपोच सामान मागवणे, औषधे मागवणे, डॉक्टरांची अपाँइंटमेंट ठरवणे ही कामे घरबसल्या करून इतरांना मदत करू शकतात की! यामुळे एकमेकांशी संवाद साधला जाईल, एकटेपणाची भावना दूर होईल,
एकमेकांना समजून घेण्याची सवयही लागेल. त्यांच्या भावी आयुष्यासाठी देखील याचा खूप चांगला उपयोग होईल. नैराश्य, आततायीपणा, हिंसक वृत्ती यांना थोडा आळा बसेल. कौटुंबिक आणि पर्यायाने सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हा बदल नक्कीच सकारात्मक असेल. आपल्या महाराष्ट्राच्या उद्योग जगतात, आजवर अनेक नामवंत मराठी उद्योजकांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे.
काही नवीन तरूण उद्योजकही, नवीन व्यवसायाच्या कल्पना आणि उमेद घेऊन, पुढे येत आहेत. त्यांना प्रोत्साहित करणे, त्यांच्या उद्योग-व्यवसाय वाढीला पोषक सामाजिक वातावरण निर्माण करणे, ही देखील आपली जबाबदारी आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही ना काही संकल्प करण्याची परंपरा आपल्याकडेही आहेच की! चला तर ह्या गुढीपाडव्यापासून, आपल्या मुलांवर, समाजातील युवकांवर श्रमप्रतिष्ठा आणि आर्थिक स्वावलंबनाचा संस्कार करण्यासाठी कटिबद्ध होऊ या. नवीन विचारांची गुढी उभारून, खर्या अर्थाने नवीन वर्ष साजरे करू या! आपले शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य, निरामय राहावे, यासाठी मनापासून प्रयत्न करू या!