मुंबई, 26 जुलै। हिंदी, मराठी आणि तेलुगू चित्रपटांत आपल्या ताकदीच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री सैयामी खेर आता मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तिच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरली असून, या नव्या सुरुवातीची माहिती सैयामीने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सैयामी खेर लवकरच अभिनेता रोशन मैथ्यू यांच्या आगामी मलयाळम चित्रपटात झळकणार आहे. सध्या ती या चित्रपटात एक कॅमिओ रोल करत असून, भविष्यात लीड भूमिकेतही दिसण्याची तिची इच्छा आहे.
सैयामी म्हणते, “मी रोशन मैथ्यूची खूप मोठी चाहती आहे. ते केवळ उत्तम अभिनेता नाहीत, तर एक उत्कृष्ट चित्रपट निर्माताही आहेत.”
तसेच, ” मल्याळम सिनेमा मला नेहमीच आकर्षक वाटला आहे. एक दिवस या सिनेसृष्टीत प्रमुख भूमिका करायची माझी खूप इच्छा आहे,” असंही तिने सांगितलं.
सैयामी खेर सध्या नीरज पांडे दिग्दर्शित ‘स्पेशल ऑप्स 2’ या वेबसीरिजमध्ये झळकत आहे. यापूर्वी ती सनी देओलसोबत ‘जाट’ या चित्रपटात दिसली होती. सध्या ती आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, या चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
सैयामीच्या या नव्या सिनेमाई प्रवासाबाबत तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे आणि ती मल्याळम भाषेत स्क्रीनवर केव्हा झळकणार, याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.