कौशल्यपूर्ण सुगरणींच्या हातांची ही खास चव

0

स्त्री कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो आणि तिची कौटुंबिक परिस्थिती कशीही असो… स्वयंपाक करण्यात आणि तो इतरांना अन्नपूर्णच्या हातांनी खाऊ घालण्यात तिला विलक्षण समाधान लाभते. कीत्येकांच्या घरात खानसामा असतो. म्हणजे दैनंदीन स्वयंपाकपाणी करायलाच लागते अशी परिस्थिती असतेच असे नाही, मात्र प्रत्येक स्त्रीला कीचनची स्त्रीसूलभ आवड असते आणि ती ते शिकून घेते. आपल्या कार्यक्षेत्रात त्या कीतीही बिझी असल्या तरीही त्या खास एवढ्यासाठी वेळ काढतात आणि आपले कौशल्य दाखवून देतात. अशाच कौशल्यपूर्ण सुगरणींच्या हातांची ही खास चव ‘ऋतुगंध’च्या वाचकांसाठी…

सासूबाईंनी शिकवले

निलिमा कोठारे (कॉश्‍च्यूम डिझायनर)

सांगून विश्‍वास नाही बसणार पण चक्क 35 जणांचे कुटुंब होते माझ्या माहेरी. आजी-आजोबा, काका, काकी, चुलत भावंडे, आई-बाबा. मस्त गोकुळात असल्यासारखे वाटायचे. दररोज 35 जणांचा स्वयंपाक. दिवाळी, दसरा, गणपती असे सणवार आले की मोठी मौज येई. दसरा, पाडवा आला की साखरभात व मटण, श्रावणी सोमवार सांजापोळी, काजूपोळी, केळीपोळी, दिवाळीला बेसनाचे लाडू, इतकी धम्माल असायची खाण्यापिण्याची की बस्स! माहेरी पुष्कळ बायका असल्याने आम्हा मुलींना फारशी वेळ आली नाही किचनमध्ये डोकावयाची. लग्नानंतर कोठारेंकडे आले आणि खरी परीक्षा सुरू झाली किचनमधली. सांगायला अभिमान वाटतो मला की, अगदी साधे कुकर लावण्यापासून ते पाठारे-प्रभूंच्या एकेक खासियतीपर्यंत सारे सारे मला त्यांनी मनापासून शिकवले, अशी समजूतदार सासू मिळणे म्हणजे केवढे भाग्य. माझ्या सासूबाईंच्या हाताला तर अफलातून चव आहे. इंचाचे हिशोब नसतात त्यांच्या डिक्शनरीत. सारी अनुभवाने आलेली अचूक जजमेंट! चटणी भरलेले पापलेट, कोलंबीचं खडखडलं, बोबिलांचं भुजणं करावे तर त्यांनीच. मला निरनिराळे केक्स करायला आवडतात. आदिनाथ कूकच्या बाबतीत चुझी आहे. कोणताही पदार्थ व्यवस्थित केला तर तो आवडीने खातो. महेशजी फॅन आहेत ते माझ्या हातच्या घोळीच्या माशाच्या भुजण्याचे.

रेसिपिज : मटण चॉप्स

Mutton-Chops

साहित्य : 1 किलो मटणाचे चॉप्स, अर्धा किलो दही, चार चमचे लसूण-आले पेस्ट, एक चमचा हळद, एक चमचा तिखट, चिमूटभर हिंग, दोन चमचे पाठारे-प्रभूंचा सांबर मसाला, तीन अंडी, चमचाभर काळीमिरी, एक वाटी ब्रेडक्रम्स, तेल, मीठ चवीप्रमाणे

कृती: मटणाचे चॉप्स स्वच्छ धुवून दही, आले-लसूण पेस्ट लावून तासभर मॅरीनेट करावयास ठेवावे. नंतर त्यात हळद, तिखट, हिंग, पाठारे-प्रभूंचा सांबर मसाला, तेल व किंचीत पाणी घालून  एका भांड्यात शिजावयास ठेवावे. वाफेवर पाणी घालावे. जेणेकरून चॉप्स चांगले लवकर शिजतील. शिजायला आले की पुदीना-कोंथिबीर पेरून एक वाफ येऊ द्यावी.

थंड झाल्यावर ते चॉप्स ब्रेड क्रम्समध्ये घोळवून नंतर फेटलेल्या अंड्यात काळीमिरी मिसळून डिप करावे. आवडीप्रमाणे शॅलोफ्राय किंवा डीपफ्राय करावे. गरमागरम सर्व्ह करावे.


आईने आवड निर्माण केली

लीना मोगरे (डायरेक्टर, लीना मोगरे फिटनेस)

‘बीएस्सी, बीकॉमकरण्यापेक्षा तू होम सायन्सला जा. स्पेशलायझेशन कर डाएटीशियनच्या कोर्समध्ये.’ आई सतत मला सांगायची आणि तिच्या आग्रहामुळे मी कोर्स केला. नंतर न्युट्रीशिअन्समध्ये मास्टर्ससुद्धा केले. आज मागे वळून पाहताना, मला माझ्या आईचा निर्णय किती अचूक होता हे पटतेय. काळाची बदलणारी पावले तिने तेव्हाच ओळखली होती. अभिमान वाटतो मला माझ्या आईचा. गंमतीचा भाग म्हणजे, आई स्वयंपाक करत असताना मी डोकावले अन् म्हटले की ‘अगं किती तेल घातलेस!’, तर माझे वाक्य संपायच्या आतच ती म्हणते, ‘मग तू खाऊ नकोस’ अर्थात गंमतीने.थालिपीठ, दडपे पोहे, गोड वरण, मोदक इथपासून ते साध्या खिचडी, कढीपर्यंत सारे सारे एकदम फक्कड करते ती.

लग्नानंतर तर आणखीनच मजा. दर रविवारी आमच्याकडे डोशांचा बेत असतो. साधा डोसा, मसाला डोसा, चायनिझ डोसा, चीझ डोसा, पावभाजी डोसा असे अनेक प्रकार असतात आलटून-पालटून. कौतुकाची बाब म्हणजे हे सारे माझे मिस्टर करतात. माझा मुलगा अर्जुनही पक्का फूडी आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे पराठे, सॅण्डविचेस बनवते मी. माझ्या हातची बिर्याणी व वाटाण्याची उसळ त्याची एकदम फेव्हरेट. माझ्या मते ब्रेकफास्ट एकदम मस्ट आहे. शरीराने दिलेली भुकेची हाक वेळच्या वेळीच ओळखायला हवी. घरातून बाहेर पडण्याअगोदर एकदम हेल्दी ब्रेकफास्ट करूनच घराबाहेर पडावे. फळे खाताना शक्यतो रिकाम्या पोटीच खावीत. एकदाच भाराभर खाण्यापेक्षा छोट्या छोट्या मिल्सवर भर द्यावा, म्हणजे अनावश्यक चरबीचा साठा होण्याची शक्यता कमी होते. आपली भारतीय भोजनाची थाळी इज मोस्ट हेल्दीएस्ट मिल इन द वर्ल्ड!

रेसिपिज : नुट्री वडी

Nutri-wadi

साहित्य : उदीड डाळ, चणा डाळ, तांदूळ,मूग डाळ प्रत्येकी एक वाटी, चमचाभर तिखट, वाटीभर उकडलेले बटाटे व वाटाणे (मटार), मीठ चवीप्रमाणे, चमचाभर तेल.

कृती: प्रथम उडीद डाळ, चणा डाळ, मूग डाळ व तांदूळ वाटून घ्यावे. त्यात उकडलेले बटाटे व वाटाणे, मीठ घालून त्यात प्रमाणात पाणी घालून एकजीव करावे. केकच्या मिश्रणाइतपत ते भिजवावे.
बेकींग ट्रेला तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओतावे व 20 मिनिटे बेक करून घ्यावे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech