मुंबईची सुरक्षा ‘आसमान’ गाठणार; चेन्नईचा विक्रम मोडीत काढत येणार देशातील सर्वात उंच शिडी!

0

मुंबईतील गगनचुंबी इमारतींची वाढती संख्या आणि तिथे उद्भवणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. मुंबईची अग्निशमन यंत्रणा आता केवळ आधुनिकच नाही, तर देशातील सर्वात प्रगत यंत्रणा बनणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात आगीच्या संकटाचा सामना करण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आणण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे.

आमदार प्रवीण दरेकर यांनी नियम ९२ अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना सामंत यांनी ही माहिती दिली. सध्या मुंबई अग्निशमन दलाकडे ९४ मीटर उंचीपर्यंत पोहोचणारी शिडी उपलब्ध आहे. मात्र, मुंबईतील इमारतींची उंची पाहता ही यंत्रणा अपुरी पडू शकते. विशेष म्हणजे, सध्या देशातील सर्वात उंच १०४ मीटरची शिडी चेन्नईमध्ये आहे. आता मुंबई महानगरपालिकेला चेन्नईपेक्षाही अधिक प्रगत आणि उंच शिडी खरेदी करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. यामुळे मुंबईच्या सुरक्षा ताफ्यात लवकरच एक ‘महाकाय’ यंत्र दाखल होणार आहे.

केवळ उंच शिडीच नाही, तर यापुढे मुंबईतील प्रत्येक उंच इमारतीसाठी ‘अग्निसुरक्षा नियमावली’ अधिक कठोर करण्यात आली आहे. नवीन इमारतींना परवानगी देताना फायर स्टेअरकेस, फायर लिफ्ट, अत्याधुनिक स्प्रिंकलर प्रणाली आणि आपत्कालीन अलार्म व्यवस्था असणे आता बंधनकारक असेल. या सर्व सुविधांची प्रत्यक्ष पडताळणी केल्याशिवाय महानगरपालिका किंवा अग्निशमन दल इमारतीला अंतिम भोगवटा प्रमाणपत्र (OC) देणार नाही.

मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आणि आंतरराष्ट्रीय शहर असल्याने, येथील रहिवाशांना आगीच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही, असा विश्वासही उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. या निर्णयामुळे मुंबईतील उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech