देशाच्या संरक्षणासाठी सज्ज होणाऱ्या महाराष्ट्रातील सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठी खूशखबर दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता आता १५ हजारांवरून थेट ५० हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत शासन आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानपरिषदेत या प्रस्तावावर सकारात्मक मोहोर उमटवली असून, यामुळे ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांच्या लष्करी प्रशिक्षणाला मोठे बळ मिळणार आहे.
विधानपरिषदेत आमदार शिवाजीराव गर्जे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सैनिकी शाळांमधील तुटपुंज्या भत्त्याचा आणि विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टांचा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. या चर्चेत सदाभाऊ खोत यांनीही सहभाग घेऊन या शाळांच्या सक्षमीकरणाची मागणी केली. त्यावर उत्तर देताना शिरसाट यांनी स्पष्ट केले की, शालेय शिक्षण विभागाकडून भत्ता वाढीचा प्रस्ताव आधीच प्राप्त झाला असून, तांत्रिक समितीचा अहवाल येताच त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल.
विशेष म्हणजे, चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी या योजनेकरिता ७.१५ कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली असून, पात्र विद्यार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या शाळांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत, त्यांना तातडीने त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी भत्त्याचे वितरण पूर्ण झाले असून, उर्वरित ठिकाणी लवकरच निधी पोहोचवला जाणार आहे.
भत्ता वाढीच्या या ‘मास्टरस्ट्रोक’मुळे विद्यार्थ्यांच्या निवासाचा आणि आहाराचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात लवकरच संबंधित संस्थाचालकांसोबत विशेष बैठक घेऊन पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातून सैन्यदलात भरती होणाऱ्या तरुणांच्या संख्येत मोठी वाढ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.