राज्याच्या राजकारणात सध्या एका ‘व्हायरल’ व्हिडीओने अभूतपूर्व खळबळ उडवून दिली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ मोठ्या कात्रीत सापडले आहेत. झिरवाळ यांच्या शासकीय निवासस्थानातील असल्याचा दावा केला जाणारा हा व्हिडीओ नेमका कोणी आणि कोणत्या हेतूने बाहेर काढला, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. व्हिडीओमध्ये झिरवाळ दोन व्यक्तींसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत असल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
संकटांची मालिका आणि पक्षांतर्गत कोंडी
झिरवाळ यांच्यासाठी गेल्या काही दिवसांपासून ग्रहनक्षत्र फिरल्याचे चित्र आहे. काही काळापूर्वीच त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एका कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्या प्रकरणावरून पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी झिरवाळ यांची कानउघाडणी केल्याची चर्चा असतानाच, आता या व्हिडीओ बॉम्बने त्यांची उरलीसुरली प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. हा व्हिडीओ सात-आठ महिने जुना असल्याचे म्हटले जात असले, तरी तो आताच बाहेर येण्यामागे पक्षांतर्गत गटबाजी किंवा विरोधकांचे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संजय राऊतांची सूचक टोलेबाजी
या प्रकरणावर बोलताना शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी अत्यंत सावध पण बोचरी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणाच्या बेडरूममध्ये डोकावून व्हिडीओ काढणे ही पत्रकारिता नाही, मात्र राज्यात सध्या नैतिक अध:पतन सुरू आहे,” असे म्हणत त्यांनी झिरवाळ यांच्यासह सत्ताधारी पक्षाला चिमटा काढला. ज्यांचे व्हिडीओ आले आहेत, त्यांच्या नेत्यांनी आधी बोलावे, मग आम्ही आमची भूमिका मांडू, असे म्हणत राऊतांनी चेंडू सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टोलवला आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची ‘हॅट्ट्रिक’?
जर या प्रकरणामुळे झिरवाळ यांना राजीनामा द्यावा लागला, तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) तिसरे बळी ठरतील. याआधी संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांना पद गमवावे लागले होते, तर नुकतेच अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांनाही महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा (राज्यमंत्री दर्जा) राजीनामा द्यावा लागला आहे. आता झिरवाळ यांच्यावर मुख्यमंत्री काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नाशिकच्या आदिवासी पट्ट्यातील हा बडा नेता या संकटातून कसा बाहेर पडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.