सई ताम्हणकर
मी जेव्हा पेइंग गेस्ट म्हणून राहू लागले, किंवा आता स्वतंत्रपणे राहू लागल्यानंतर शूटिंग, प्रयोग संपल्यावर घरी मनाचा एकटेपणा जाणवू लागला. मी त्याकडेही पॉझिटिव्हली पाहिले आणि त्याला प्रॉडक्टिव्ह केले. भूमिकांचा अभ्यास करू लागले. त्या एकटेपणातही त्रास न देणारी सोबत झाली. अभिनय ही माझी भक्ती आहे, श्रद्धा आहे. प्रेक्षक, माध्यमांची स्तुती आणि टीका, दोन्हीकडे तटस्थपणे पाहायला शिकले तर मग मानसिक त्रास वाट्याला येत नाही.
मी मूळची सांगलीची. माझे शालेय शिक्षण आणि कॉलेज सांगलीतच झालेले आहे. म्हणून मुंबई मला अनभिज्ञ होती, अशातला भाग नाही. कारण, माझे मामा मामी मुंबईत राहत़ त्यामुळे मे महिन्याच्या सुट्टीत मी त्यांच्याकडे महिना दीड महिना राहायला यायचीच. सांगली आणि मुंबईच्या संस्कृतीमध्ये खूप फरक आहे, ह्यात काहीच वाद नाही. इथला चकाचौंध, वेग, जीवनशैली. सर्व काही औरच आहे.
कुणालाही त्याची भुरळ पडू शकते. सुट्टीच्या काळात मुंबईला यायचे तेव्हापासून ह्या मायानगरीचे अप्रूप होतेच. कॉलेजमध्ये असतानाच कल्चरल अॅक्टिव्हिटिजमधला माझा सहभाग वाढला. कॉलेजच्या एकांकिकांमधून माझा अभिनय सहभाग वाढला. माझे आई बाबा ह्या क्षेत्रातील नसले, तरीही माझे आजी आजोबा पूर्वी नाटकांमध्ये अभिनय करायचे.
कुटुंबातील तो गुरू माझ्यात उतरला आहे. मी कॉलेजात असतानाच अल्फा करंडक एकांकिका स्पर्धा व्हायच्या तोपर्यंत अल्फाचे झी झाले नव्हते. त्या स्पर्धेत मी सहभागी झाले आणि मला उत्कृष्ट अभिनेत्रीचे प्रथम पारितोषिक मिळाले. त्यामुळे मला माझ्या पहिल्या टीव्ही सीरियलची ऑफर आली आणि मी व्यवसाय म्हणून ह्या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहू लागले.
आई बाबांनी विरोध केला नाही. पण बाबांनी निक्षून सांगितले की, तुझ्या ब्रेकसाठी मी डोनेशन देणार नाही आणि कोणताही फॉर्म भरून त्यावर सही करणार नाही. तुला जे करायचेय ते स्वत:च्या कलागुणांच्या बळावरच कर. ते पाठीशी होते, पण ह्या क्षेत्रातील चढ उतार, संघर्ष तर मला एकटीलाच करावा लागणार होता.
मी मनाने खंबीर असल्यामुळे त्यासाठी तयार होते. पहिली मालिका स्वीकारल्यामुळे मी मुंबईला आले आणि माझ्या मावशीकडे राहू लागले. शाळेत असताना मुंबईत सुट्टीसाठी यायचे तो प्रसंग आणि प्रोफेशनसाठी येण्याचा प्रसंग खूपच वेगळा होता. कारण तेव्हा मी ठराविक काळानंतर गावी परतायचे आता मात्र तसे होणार नव्हते. त्यामुळे थोडीफार मानसिक आंदोलने झालीच, जरी मी होमसिक पूर्वीपासून नसले तरीही.
इथल्या धावपळीत मी मिसळून गेले. ही इंडस्ट्री खूपच अस्थिर असल्यामुळे आपल्याला प्लान बी तयार ठेवायची गरज असते. इथे आल्यावर पेशन्स हवेत. जिद्द हवी. मेहनती आणि समर्पणकृती हवी. चढ उताराचे निराशेचे क्षण येतात. त्यातून बाहेर पडता यायलाच हवे. नकार पचवायची तयारी हवी. थोड्याशा नकाराने कोलमडून जायला नको.
स्ट्रगल करत असताना मला फिल्मच्या एका रोलसाठी नाकारले होते. माझ्या डोळ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे असे कारण देत. विचार करा, माझ्या मनाला काय वाटले असेल. पण मनाने खंबीर असल्यामुळे हे क्षेत्र किंवा मुंबई सोडून जाण्याचा विचार अजिबात मनात आला नाही. ‘यहां आयें हैं, तो अच्छा करके दिखाएंगेही.’ ही जिद्द मनात होती.
करिअरच्या संघर्षाचा एक भाग म्हणूनही त्याकडे पाहयला हवे. मी जेव्हा पेइंग गेस्ट म्हणून राहू लागले, किंवा आता स्वतंत्रपणे राहू लागल्यानंतर शूटिंग, प्रयोग संपल्यावर घरी मनाचा एकटेपणा जाणवू लागला. मी त्याकडेही पॉझिटिव्हली पाहिले आणि त्याला प्रॉडक्टिव्ह केले. भूमिकांचा अभ्यास करू लागले. त्या एकटेपणातही त्रास न देणारी सोबत झाली. अभिनय ही माझी भक्ती आहे, श्रद्धा आहे. प्रेक्षक, माध्यमांची स्तुती आणि टीका, दोन्हीकडे तटस्थपणे पाहायला शिकले तर मग मानसिक त्रास वाट्याला येत नाही. स्वत:तला विद्यार्थी जागा ठेवून त्याकडे पाहावे म्हणजे स्ट्रगलसुद्धा सुसह्य होते.
ह्या क्षेत्रात आल्यावर घड्याळाच्या काट्याला बांधून घ्यावे लागते. मित्र-मैत्रिणी, नातेवाइक ह्यांना वेळ देता येत नाही. घरगुती कार्यक्रमांनासुद्धा जाणे जमतेच असे नाही. मन खंतावत नाही असे नाही. पण मित्र मैत्रिणी, नातेवाइक समजून घेणारे असतात. ते तुमच्या मनाचा विचार करतात. अशावेळी आपला प्रवास सुखाचा होतो.
स्ट्रगलर्सनी आपल्या कलेशी इमान राखावे, जिद्द आणि मेहनत अंगी बाणवली, प्लान बी रेडी ठेवला तर त्यांना कोलमडून जाण्याचे प्रसंग कमी येतात. आलेच तर सुसह्य होतात. महत्त्वाचे म्हणजे घरच्यांच्या विरोधात जाऊन शक्यतो काही करू नये, कारण आपल्या निव्यार्ज विसाव्याची ठिकाणे तीच तर आहेत.