अशोक खरातचे ‘रक्तलांछित’ साम्राज्य: नरबळी, अत्याचार आणि वन्यजीवांची शिकार; नाशिक हादरले!

0

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर आता एकामागून एक अंगावर शहारे आणणारे खुलासे समोर येत आहेत. नाशिक न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान, सरकारी वकिलांनी खरातने ‘नरबळी’ दिल्याचा खळबळजनक संशय व्यक्त केला असून, त्याच्यावर आता थेट हत्येचे कलम लावण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. खरातच्या कृष्णकृत्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी २९ मार्चपर्यंत वाढवली आहे.

मंदिरात चालत होता रक्ताचा खेळ?

मिरगाव येथील शंकराच्या मंदिरात खरात केवळ जादूटोणाच करत नव्हता, तर तिथेच त्याने नरबळी दिल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या विशेष पूजेसाठी तो मानवी जीवनाशी खेळण्यासोबतच वन्यजीवांचाही बळी देत असल्याचे समोर आले आहे. वकिलांनी कोर्टाला सांगितले की, खरातकडे वाघाची कातडी आणि नागांचा वापर होत होता, ज्यामुळे त्याच्यावर आता ‘वन्यजीव संरक्षण कायद्या’ अंतर्गतही नवीन गुन्हे दाखल होऊ शकतात.

अत्याचाराचा विळखा आणि जादूटोणा

६७ वर्षीय खरातवर केवळ फसवणुकीचेच नव्हे, तर एका ३० वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचेही गंभीर आरोप आहेत. त्याच्यावर आतापर्यंत सहा गुन्हे दाखल असून, जादूटोणा विरोधी कायद्यानुसार नरबळीच्या कलमाची त्यात भर पडणार आहे. सरकारी वकिलांनी कोर्टासमोर स्पष्ट केले की, खरातच्या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असून अनेक गुप्त गोष्टी अजूनही बाहेर येणे बाकी आहे.

कोठडीत पाच दिवसांची वाढ

खरातच्या वकिलांनी कोठडीला विरोध केला असला तरी, पुराव्यांची साखळी जोडण्यासाठी आणि नरबळीच्या संशयाची सखोल चौकशी करण्यासाठी नाशिक न्यायालयाने त्याला ५ दिवसांची अतिरिक्त पोलीस कोठडी सुनावली आहे. या वाढीव कोठडीत खरातच्या डायरीतील आणखी कोणती ‘काळी पाने’ उघड होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech