नोकरशाहीला ही शेवटची संधी; सनदी अधिकाऱ्यांच्या दांडीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कडाडले

0

राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सभागृहात संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने विधानसभेत आज जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी नोकरशाहीच्या या अनुपस्थितीवर बोट ठेवताच, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. ‘राज्याच्या ब्युरोक्रसीला ही शेवटची संधी आहे; यापुढे वरिष्ठ अधिकारी हजर नसतील, तर हे सभागृह कठोर कारवाई करण्यास सक्षम आहे,’ अशा कडक शब्दांत नार्वेकरांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावले.

वळसे पाटलांनी टोचले सरकारचे कान

अर्थसंकल्पासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना अर्थमंत्री, राज्यमंत्री किंवा संबंधित विभागाचे सचिव गॅलरीमध्ये उपस्थित नसल्याबद्दल दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात जनतेच्या पैशांवर चर्चा होत असताना अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नोंदी घेणे बंधनकारक आहे. मात्र, या शिस्तीचा भंग होत असल्याचे पाहून वळसे पाटलांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांच्या या भूमिकेला सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी पाठिंबा मिळाला.

अध्यक्षांचा ‘अंतिम’ इशारा

वळसे पाटलांच्या मुद्द्याशी पूर्णतः सहमत असल्याचे सांगत राहुल नार्वेकर म्हणाले की, ‘अदृश्य गॅलरीमध्ये संबंधित विभागाचे सर्व वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक आहे. यापूर्वीही पत्राद्वारे त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही दुर्लक्ष होत असेल, तर ही शेवटची ताकीद समजावी.’ यापुढे महत्त्वाच्या चर्चेच्या वेळी एसीएस दर्जाचे अधिकारी उपस्थित नसतील, तर त्यांच्यावर योग्य उपाययोजना केल्या जातील, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, सभागृहात चार कॅबिनेट मंत्री उपस्थित असून ते नोंदी घेत असल्याचे स्पष्ट करत त्यांनी कामकाज पुढे चालू ठेवले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech