भोंदूबाबा प्रकरणावरून भाजपचा पलटवार; “मग उद्धव ठाकरेंनाही सहआरोपी का करू नये?

0

नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असून, आता या वादात थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव ओढले गेल्याने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. “जर मंत्र्यांचे फोटो आहेत म्हणून त्यांना सहआरोपी करायचे असेल, तर मग भोंदूबाबाला राजाश्रय देणाऱ्या उद्धव ठाकरेंनाही सहआरोपी का करू नये?” असा जळजळीत सवाल भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी उपस्थित केला. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

भोंदूबाबाचे काळे कारनामे २००३ पासून सुरू होते. मात्र, काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारने त्याला अभय दिले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या बाबाच्या आश्रमाला सर्व सुविधा पुरवल्या गेल्या, असा खळबळजनक आरोप बन यांनी केला. “राऊत ज्या न्यायाने महायुतीच्या मंत्र्यांना सहआरोपी करण्याची मागणी करत आहेत, तोच न्याय उद्धव ठाकरेंनाही लागू होतो,” असेही ते म्हणाले. अवघ्या चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारे संजय राऊत आज अचानक त्यांच्यावरच टीका करत आहेत, हा राजकीय विनोद असल्याची टीका बन यांनी केली. खोटे आरोप करून तपास भरकटवण्याचे काम राऊत करत असून, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांचेच खासदार-आमदार नाराज आहेत. “४० आमदार सोडून गेले तरी यांना शहाणपण सुचलेले नाही. मातोश्रीबाहेर न पडणाऱ्या नेत्यांमुळेच हा गट विखुरला जात आहे,” असा टोला बन यांनी लगावला. दिल्लीत झालेल्या संजय राऊत यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला निमंत्रण असूनही उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. हा ठाकरे आणि राऊत यांच्यातील वाढत्या संघर्षाचा पुरावा असून, आगामी काळात हा वाद आणखी तीव्र होईल, अशी शक्यताही भाजप प्रवक्त्यांनी वर्तवली. पंतप्रधान मोदींच्या कृपेने आमदार झालेल्या उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या हिताचा एकही प्रश्न विधान परिषदेत विचारला नाही. अडीच वर्षात जेमतेम मंत्रालयात जाणारे ते एक ‘कर्तृत्वशून्य’ मुख्यमंत्री होते, अशी बोचरी टीका करत त्यांनी शरद पवारांनी केलेल्या जुन्या विधानाची आठवणही करून दिली. भोंदूबाबा प्रकरणावरून सुरू झालेला हा ‘आरोप-प्रत्यारोपांचा’ कलगीतुरा आता कोणत्या वळणावर जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech