अखेर पेच सुटला! ई-चलानच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक, ट्रान्सपोर्ट संप स्थगित

0

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अर्थचक्राला ब्रेक लावण्याची टांगती तलवार अखेर दूर झाली आहे. ‘अन्यायकारक’ ई-चलान आणि विविध जाचक अटींविरोधात राज्यव्यापी संपाचे हत्यार उपसणाऱ्या वाहतूकदार संघटनांनी आपला संप मागे घेण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेली तत्परता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यशस्वीपणे केलेली शिष्टाई यामुळे हा पेच सुटला असून, राज्यातील वाहतूक व्यवस्था आता पुन्हा पूर्वपदावर येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ‘महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी’ने नरमाईची भूमिका घेत आंदोलनातून माघार घेतली.

गुरुवारी पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण घडामोडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधला. “वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत शासन पूर्णपणे संवेदनशील असून, ई-चलानच्या मुद्द्यावर सकारात्मक मार्ग काढला जाईल,” असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. तसेच, या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पोलीस प्रशासन आणि परिवहन विभागाची तातडीने संयुक्त बैठक बोलावण्याचे आदेशही त्यांनी दिले. मंत्र्यांच्या या शब्दावर विश्वास ठेवून वाहतूकदारांनी आपला संप स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या यशस्वी वाटाघाटींची माहिती देताना सांगितले की, शासन केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीवर भर देणार आहे, ज्यामुळे वाहतूक क्षेत्रातील तणाव कमी होईल.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech