ड्रग्जमाफियांच्या साम्राज्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आक्रमक मोहीम हाती घेतली आहे. केवळ लहान-मोठे विक्रेतेच नव्हे, तर या संपूर्ण साखळीतील ‘मास्टरमाइंड’ आणि त्यांना कच्चा माल पुरवणाऱ्यांवर थेट ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यातील तब्बल १४ प्रकरणांमध्ये हा अत्यंत कठोर कायदा लागू करण्यात आला असून, गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची ही ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका स्पष्ट केली. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात उघडकीस आलेल्या अंमली पदार्थ निर्मितीच्या केंद्रावर झालेली कारवाई ही केवळ एक सुरुवात असून, त्यातील ११ आरोपींना कोठडीत धाडण्यात आले आहे. केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातील बंद कारखाने किंवा निर्जन ठिकाणच्या शेडमध्ये लपून-छपून चालणाऱ्या या ‘काळ्या’ व्यवसायाचा शोध घेण्यासाठी आता पोलीस आणि एमआयडीसी प्रशासन संयुक्तपणे मैदानात उतरले आहे.
राज्यात खास निर्माण करण्यात आलेला ‘अँटी-नार्कोटिक टास्क फोर्स’ आता केवळ गुन्हेगार पकडण्यापुरता मर्यादित नसून, अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा (Supply Chain) शेवटचा दुवा शोधून काढण्याचे काम करत आहे. अंमली पदार्थ रॅकेटमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड दमच राज्यमंत्र्यांनी यावेळी दिला. या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या छुप्या जगाला आता प्रशासनाने चहूबाजूंनी वेढल्याचे स्पष्ट झाले आहे.