चंद्रपूर शहराचे आराध्य दैवत आणि तब्बल ८०० वर्षांचा वैभवशाली इतिहास लाभलेल्या श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाचा कायापालट होण्याचे संकेत मिळाले आहेत. राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, या प्राचीन मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेने आता कमालीचा वेग घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत, येत्या १५ दिवसांत सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून मान्यता देण्याचे खडक निर्देश नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले आहेत.
गोंड राजवटीपासून भोसलेकालीन परंपरेपर्यंत चंद्रपूरच्या सांस्कृतिक जीवनाचा कणा असलेल्या या मंदिराला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला निघणारी भव्य रथयात्रा हे विदर्भातील आकर्षणाचे केंद्र असते. मात्र, भाविकांची वाढती संख्या पाहता येथे मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत होता. आता ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यास, शासन स्तरावरून मोठा निधी उपलब्ध होणार असून स्वच्छता, पाणीपुरवठा, भक्तनिवास आणि कायदा-सुव्यवस्थेचे जाळे अधिक सक्षमपणे विणले जाणार आहे.
आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात या मंदिराचा ‘भावनिक ठेवा’ म्हणून उल्लेख केला होता. जिल्हा नियोजन समितीनेही यापूर्वीच यासंदर्भात ठराव मंजूर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘१५ दिवसांच्या अल्टिमेटम’मुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, चंद्रपूरच्या वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे चंद्रपूरच्या ऐतिहासिक वैभवात भर पडणार असून, हे मंदिर भविष्यात विदर्भातील एक प्रमुख धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येण्याची शक्यता आहे.