खरात प्रकरणाचा मास्टरप्लॅन उघड; अटकेपूर्वीच ‘LOC’ काढून पोलिसांनी आवळले होते पाश

0

गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने आज विधानसभेत अभूतपूर्व वादळ निर्माण केले. अघोरी कृत्ये, सापाची भीती दाखवून केलेली फसवणूक आणि धर्माच्या नावाखाली महिलांचे केलेले लैंगिक शोषण यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गदारोळात मुख्यमंत्री ,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या आक्रमकतेने उत्तर दिले, त्याने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले. “मी कुणालाही क्लीनचीट वाटत सुटत नाही, जो खरोखर ‘क्लीन’ असतो त्यालाच ती मिळते,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांच्या टोमण्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.

या प्रकरणाचे गांभीर्य मांडताना फडणवीस म्हणाले की, हा विषय केवळ एका भोंदू बाबाचा नाही, तर महिलांच्या अस्मितेचा आणि त्यांच्या ‘ब्रेन वॉशिंग’चा आहे. खरातने आपल्या तथाकथित शक्तींचा वापर करून अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक पीडित महिला समाजाच्या भीतीने समोर यायला तयार नव्हत्या. मात्र, पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेने त्यांना धीर दिला आणि त्यानंतरच तीन महिलांनी तक्रार धाडस दाखवले. आता आणखी काही महिला तक्रारीसाठी पुढे येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

तपासाच्या पदराआड दडलेली रणनीती उघड करताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, “अशोक खरातवर झालेली कारवाई ही अचानक झालेली नाही. या अटकेची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. १० तारखेलाच दुसऱ्या एका जिल्ह्यातील तक्रारीचा आधार घेऊन आम्ही त्याचा ‘LOC’ (Look Out Circular) काढून ठेवला होता, जेणेकरून त्याला देशाबाहेर पळता येऊ नये.” या प्रकरणाचा तपास आता ‘SIT’ (विशेष तपास पथक) करत असून, उद्या यावर सविस्तर निवेदन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

सभागृहात चर्चा रंगत असताना विरोधकांनी फडणवीसांना ‘क्लीनचीट’ देण्यावरून डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर फडणवीसांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले की, “माझ्याकडे क्लीनचीट वाटण्याचे यंत्र नाही. जो निर्दोष असतो त्यालाच ती मिळते. पण या खरात प्रकरणात मात्र ज्याचा दुरान्वये संबंध असेल, त्यालाही सोडले जाणार नाही.” त्यांच्या या विधानाने या प्रकरणात सामील असलेल्या पांढरपेशी लोकांचे धाबे दणाणले असून, उद्याच्या निवेदनात नेमकी कोणाची नावे समोर येतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech