मुंबई ‘टार्गेट’वर! आंतरराष्ट्रीय तणावाचा संबंध आहे का? गृहविभागाकडे स्पष्टीकरणाची मागणी

0

विधानभवन, मुंबई उच्च न्यायालय, शेअर बाजार (BSE) आणि मेट्रो यांसारख्या मुंबईच्या हृदयस्थळांना बॉम्बने उडवून देण्याच्या आलेल्या निनावी धमकीने गुरूवारी राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली. या प्रकरणाची सरकारने तात्काळ दखल घेऊन सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच अशी गंभीर धमकी मिळणे ही चिंतेची बाब असून, हे आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे का? असा रोखठोक सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. औचित्याच्या मुद्द्याद्वारे या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधताना वडेट्टीवार म्हणाले की, हा ईमेल ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’कडून आल्याची चर्चा सुरू आहे, परंतु त्यामागील खरा सूत्रधार कोण आहे, हे शोधणे गरजेचे आहे.

सध्या जागतिक स्तरावर अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा या धमकीशी काही संबंध आहे का, याचीही कसून चौकशी झाली पाहिजे. आंतरराष्ट्रीय तणावाचा फायदा घेऊन भारतात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असू शकतो, अशी शंकाही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

‘मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे लक्ष्य केली जात असताना सरकार गप्प का?’ असा सवाल करत गृहविभागाने या ईमेलचा मूळ उगम तातडीने शोधून काढावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. ही धमकी केवळ अफवा आहे की एखादे मोठे संकट, याबाबत सरकारने अधिकृत खुलासा करावा, यासाठी विरोधकांनी सभागृहात रान पेटवले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech