ना अर्थ, ना संकल्प; फक्त कंत्राटदारांचेच कल्याण, जयंत पाटलांची फटकेबाजी

0

या अर्थसंकल्पात ना कोणता ‘अर्थ’ आहे, ना कोणता ‘संकल्प’; हे सरकार म्हणजे ‘काम कमी आणि जाहिरात जास्त’ या धोरणाने चालले आहे, अशा कडक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाची चिरफाड केली. विधानसभेत बोलताना त्यांनी शेती, शिक्षण, आरोग्य आणि राज्याच्या वाढत्या कर्जावरून सरकारची पिसं काढली. विशेषतः भाषणाच्या शेवटी त्यांनी एक शेर सादर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला सूचक इशारा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

जयंत पाटील यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना महात्मा फुलेंच्या विचारांचा दाखला दिला. “राज्यावर ११ लाख २ हजार कोटींचे कर्ज आहे आणि आपण दिवसाला १९२ कोटी रुपये फक्त व्याजापोटी भरतोय. मुख्यमंत्र्यांनी दीड तास भाषण केले, तोवर राज्याने १२ कोटींचे व्याज भरले होते,” असे आकडेवारीसह त्यांनी मांडले. केवळ मोठे रस्ते आणि पुलांचे कंत्राट देऊन कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम सुरू असून, सामान्य जनतेच्या पदरात काहीच पडत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारने २०४७ पर्यंत कृषी जीडीपी ५०० अब्ज डॉलरवर नेण्याचे स्वप्न दाखवले असले, तरी सध्याचा कृषी विकासदर केवळ ३.४ टक्के आहे, याकडे पाटलांनी लक्ष वेधले. “एककीकडे आपण दुर्गम भागातील मराठी शाळा बंद करत आहोत आणि दुसरीकडे मागणी नसलेल्या रस्त्यांसाठी भरमसाठ कर्ज घेत आहोत,” असे म्हणत त्यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, एआय (AI) मुळे भविष्यात रोजगारावर येणाऱ्या संकटाबद्दल अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

‘मोठ्या लोकांशी अंतर राखा’

भाषणाच्या शेवटी जयंत पाटील यांनी एक शेर वाचून खळबळ उडवून दिली. “ज्यावेळी नदी समुद्राला मिळते, तेव्हा ती नदी राहत नाही, तिचे अस्तित्व संपते,” असे म्हणत त्यांनी महायुतीमधील मित्रपक्षांना (शिवसेना आणि राष्ट्रवादी – अजित पवार गट) भाजपसोबतच्या युतीवरून टोला लगावला. अर्थसंकल्पात भाजपच्या खात्यांना ५८% निधी, तर इतर दोन पक्षांना मिळून ४१% निधी मिळाल्याचे आकडेवारीसह मांडत त्यांनी सत्तेतील असमान वाटपावर बोट ठेवले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech