आता तक्रारीसाठी पायपीट नको! ‘महिला सन्मान’ पोर्टलद्वारे अन्यायाविरुद्ध लढा होणार हायटेक

0

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यातील भगिनींसाठी सुरक्षेचे एक अभेद्य कवच तयार केले आहे. येत्या शनिवारी, ७ मार्च रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ‘महिला सन्मान’ या हायटेक पोर्टलचे अनावरण होणार असून, यासोबतच महिलांच्या डिजिटल सुरक्षेसाठी देशातील पहिला ‘सायबर वेलनेस कक्ष’ कार्यान्वित केला जाणार आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या विशेष सोहळ्याची माहिती देताना सांगितले की, आता पीडित महिलांना तक्रार करण्यासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत, तर घरबसल्या ऑनलाइन तक्रार करता येईल आणि पोलिसांच्या मदतीने त्यावर तत्काळ कारवाईची यंत्रणाही या पोर्टलशी जोडली गेली आहे.

तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून महिलांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी आयोगाने ‘सायबर वेलनेस कक्ष’ सुरू करून एक मोठा पायंडा पाडला आहे. असा कक्ष स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, या माध्यमातून कायदेशीर मार्गदर्शन आणि तांत्रिक सहाय्य थेट उपलब्ध होणार आहे.

या सोहळ्यात महिलांच्या यशोगाथा सांगणाऱ्या ‘आत्मसन्मानाच्या वाटा’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि ‘एक तिची गोष्ट’ या नृत्य-संगीत नाटकाचा अविष्कारही पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, ४ ते ८ मार्च या काळात स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारे ‘उजेडाच्या वाटेवर’ हे विशेष छायाचित्र प्रदर्शनही नागरिकांसाठी खुले असणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणाचा हा सोहळा केवळ औपचारिकता न राहता, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तंत्रज्ञानाची ताकद देणारा ठरणार आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech