शत्रू राष्ट्रांना खुश करण्यासाठी देशाची बदनामी थांबवा; शिंदेंचा राहुल गांधींना थेट इशारा

0

‘ संसद सुरू असताना राहुल गांधी नेहमी परदेशात का असतात? देशात चर्चा करण्याऐवजी सातासमुद्रापार जाऊन भारताची बदनामी करण्याची त्यांना सवयच लागली आहे,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला. भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेची काही लोकांना ‘पोटदुखी’ होत असून, ही मंडळी पाकिस्तानसारख्या देशांना मथळे मिळवून देण्याचे काम करत असल्याची गंभीर टीकाही त्यांनी यावेळी केली.

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील इराण-इस्रायल तणावावर भाष्य केले. या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात इंधन किंवा गॅसचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. केंद्र आणि राज्य सरकार यावर समन्वयाने काम करत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आश्वासन त्यांनी दिले. राहुल गांधींच्या कार्यशैलीवर निशाणा साधताना शिंदे पुढे म्हणाले की, जेव्हा जेव्हा संसदेचे अधिवेशन येते, तेव्हा राहुल गांधी भारताबाहेर जाऊन देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या जवानांनी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या शौर्याच्या कारवायांबद्दल त्यांना अभिमान वाटण्याऐवजी, ते देशाच्या विरोधात विधाने करतात. “देशात राहून देशासाठी काम करा, शत्रू राष्ट्रांना खुश करण्यासाठी नाही,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.

भारताची अर्थव्यवस्था लवकरच जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे, मात्र हे यश विरोधकांना पचत नाहीये. देशाची बदनामी करून राजकारण करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जागतिक संकट काळातही भारत सुरक्षित राहावा यासाठी मोदी सरकार सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech