शिंदेंचा ‘राजकीय सर्जिकल स्ट्राईक’; बड्या दिग्गजांचा पत्ता कट करत सामान्य शिवसैनिक थेट राज्यसभेवर!

0

मुंबईत राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुरुवारी एक असा राजकीय भूकंप झाला, ज्याने महायुतीसह विरोधकांचेही डोळे विस्फारले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रस्थापित समीकरणांना बाजूला सारून शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेल्या ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

संजय निरुपम, गजानन कीर्तीकर, राहुल शेवाळे आणि शायना एनसी यांसारख्या बड्या नावांची चर्चा असताना, उपमुख्यमंत्री शिंदेंनी सर्वांचा पत्ता कट करत एका सामान्य पार्श्वभूमीच्या, दलित समाजातील कडव्या शिवसैनिकाला थेट संसदेचे तिकीट दिले आहे. नंदनवन बंगल्यावर रात्रभर चाललेल्या खलबतांनंतर एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत यांनी घेतलेल्या या निर्णयाने शिवसेनेत ‘ग्राऊंड झिरो’वर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सत्तेत खरा वाटा मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या काळात ज्याप्रमाणे रणरागिणींची महिला आघाडी असायची, त्याच आक्रमकतेची पुनरावृत्ती वाघमारे यांच्या निवडीतून दिसून येत आहे. दोन उमेदवारांच्या चर्चेला पूर्णविराम देत मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधीमंडळात हजर राहून वाघमारे यांचा अर्ज भरला. यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याच्या आरोपांना एकनाथ शिंदेंनी आपल्या कृतीतून चोख उत्तर दिले आहे. राजकीय वारसा किंवा ग्लॅमर नसतानाही केवळ कामाच्या जोरावर राज्यसभेची लॉटरी लागलेल्या ज्योती वाघमारे यांची उमेदवारी म्हणजे आगामी निवडणुकांच्या तोंडावर शिंदेंनी टाकलेला एक मोठा सामाजिक आणि राजकीय ‘डाव’ मानला जात आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech