अध्यात्म आणि ‘जादुई पाणी’ देण्याचा बनाव रचणाऱ्या अशोक खरातने केवळ महिलांचे शोषणच केले नाही, तर त्याआडून अफाट काळी माया गोळा केल्याचे आता अधिकृतपणे समोर आले आहे. “आरोपी खरातचे साम्राज्य केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून, शिर्डी विमानतळापासून ते पुण्या-मुंबईपर्यंत त्याने जमिनींचे जाळे विणले आहे,” असा खळबळजनक गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला. खरातच्या संपत्तीचा पाढा वाचताना मुख्यमंत्र्यांनी त्याच्या परदेश दौऱ्यांची यादीच सभागृहासमोर सादर केली.
जमिनींचे अफाट साम्राज्य आणि ‘प्रॉपर्टी’ची यादी
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातच्या नावावर असलेल्या संपत्तीचे बाजारमूल्य साधारणपणे ४० कोटी ८७ लाख रुपये इतके आहे. मिरगाव (३३ एकर), पाथर्डी (१० एकर), नाशिक-सिन्नर (१० एकर), काकडी शिर्डी विमानतळ परिसर (५.५ एकर), पनवेल (४० गुंठे), राहता (४.५ एकर) आणि ओझरमध्ये ५ गुंठ्यांचा प्लॉट. नाशिकच्या कर्मयोगी नगरमध्ये टोलेजंग बंगला, कॅनडा कॉर्नर येथे १८० स्क्वेअर फुटांचे कार्यालय, शिर्डीत ‘साई सिल्व्हर ओक’ हे भव्य मंगल कार्यालय आणि मिरगाव येथे आलिशान फार्महाऊस. स्वतःकडे १२ तोळे आणि पत्नीकडे २० तोळे सोने, पत्नीच्या नावे डीमॅट खात्यात गुंतवणूक आणि पाच विविध बँकांमध्ये खाती.
१३ देशांची सफर आणि ‘सीए’ची चौकशी
खरातचा वावर केवळ भारतातच नव्हता, तर त्याने अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, यूएई, दक्षिण आफ्रिका, पेरू, केनिया, युगांडा आणि कंबोडियासह तब्बल १३ देशांचा प्रवास केला आहे. या परदेश दौऱ्यांसाठी पैसा कुठून आला आणि त्याचे ‘फंडिंग’ कोणी केले, याचा तपास आता सुरू आहे. खरातच्या सनदी लेखापालाची चौकशी केली जात असून, त्याने नातेवाईकांच्या नावे काही बेनामी संपत्ती घेतली आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
वरिष्ठ अधिकारी आणि संस्थांचे धाबे दणाणले
“खरातसोबत एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आर्थिक गैरव्यवहार केला आहे का, याची सखोल चौकशी सुरू आहे. तसेच शिवनिका संस्थानच्या कार्यकारी संचालक मंडळाचीही झाडाझडती घेतली जात आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जर खरातने करचुकवेगिरी केली असेल, तर प्राप्तिकर विभागाला कारवाईसाठी पत्रव्यवहार केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे खरातच्या पाठीशी उभे राहणाऱ्या अनेक बड्या धेंडांचे धाबे दणाणले असून, हे प्रकरण आता केवळ लैंगिक अत्याचारापुरते मर्यादित न राहता मोठ्या आर्थिक घोटाळ्याकडे वळले आहे.