मुंबई लोकलचा कायापालट: ३३ हजार कोटींचा मास्टरप्लॅन

0

मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांची जीवघेणी गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवासाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने आता ‘सुपरफास्ट’ पावले उचलली आहेत. खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईच्या रेल्वे विकासाचा ३३ हजार कोटींचा मास्टरप्लॅन मांडला. यात प्रामुख्याने १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी ३४ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांची लांबी वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची घोषणा त्यांनी केली.

मुंबईत एम.यु.टी.पी (MUTP) अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे केवळ स्थानकेच मोठी होणार नाहीत, तर २३८ उपनगरीय गाड्यांना स्वयंचलित दरवाजे (Automatic Doors) लावण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. यामुळे लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांना लगाम बसणार आहे. खासदार वायकर यांनी लोकसभेत २०१५ ते मे २०२५ दरम्यान झालेल्या २६,५४७ प्रवाशांच्या मृत्यूंबाबत चिंता व्यक्त करत रेल्वे मंत्रालयाचे यावरील धोरण विचारले होते. त्यावर मंत्र्यांनी बांद्रा, मुंबई सेंट्रल, जोगेश्वरी, दादर, वसई, परेल, विरार यांसह अनेक स्थानकांवर रेल्वे मार्ग वाढवण्याचे आणि पायाभूत सुविधांच्या विस्ताराचे काम सुरू असल्याचे सांगितले.

कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठीही मंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी ‘डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट’ (DPR) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पात महाराष्ट्र आणि गोव्याची मंजुरी मिळाली असून कर्नाटक आणि केरळची मंजुरी मिळताच कामाला अधिक गती मिळणार आहे. मुंबईकरांसाठी डबलडेकर लोकल आणि वाढीव डब्यांच्या गाड्यांच्या माध्यमातून गर्दीचे विभाजन करून सुरक्षित प्रवासाचे उद्दिष्ट रेल्वे मंत्रालयाने समोर ठेवले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech