कलांचे सशक्त माध्यम

0

भाषा आणि कला यांचा अनुबंध त्यांना एकमेकांपासून वेगळा न करणारा असा आहे. एकात एक ओवलेला आहे. भाषा मुकुटातील कोहिनूर आहे आणि त्याचा साचा कलांनी भक्कम ठेवला आहे. म्हणूनच भाषा संवर्धन म्हणजेच कलेचंही संवर्धन आहे आणि ते करणं हे आपलं कर्तव्य आहे.
………………

‘मराठी भाषा संवर्धन’ हे शब्द खरं तर त्रास देतात. इंग्रजीचे संवर्धन असं आपण म्हणतो का? पण आज मराठी भाषेवर ही वेळ आली आहे. आज संवर्धन करण्यासाठी विशेष संवर्धन पंधरवडा आखला जातो. मराठी भाषेतील अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. दोन महिने मराठीचा उदो उदो होतो बाकी मग आम्ही आपापसात जातीय दंगे, पक्षातील मतभेद यांच्याशी झुंजण्यास मुक्त. भाषा टिकली, वापरली, बोलली, लिहिली, वाचली पाहिजेच, पण जगलीही पाहिजे. म्हणजे भाषा जगेल जर आपण मराठी म्हणून जगलो तर आणि आपण मराठी म्हणून जगायचं असेल तर संस्कृती, कला ह्या गोष्टी मराठी माणसाचा गाभा असलेल्या गोष्टींचा अंतर्भाव महत्त्वाचा आहे. प्रत्येक माणसाने मग तो कलाकार असो, साहित्यिक असो किंवा रसिक पुढच्या पिढीसाठी आपली भाषा पोहोचवण्यासाठी सक्रिय भाग घ्यायला हवा.

मराठी भाषा प्राचीन आहे, ती अभिजात भाषा आहे. तिचं सौंदर्य आणि श्रीमंती पोहोचवण्यासाठी कलेचा सहभाग अनिवार्य आहे. नाट्यवेद हा पाचवा वेद का तयार केला गेला?  कृत युगात सगळं सुखमय होतं तेव्हा नाट्य नव्हतं. त्रेता युगात सुखं दु:ख निर्माण झाली. एकेरी सुखात किंवा एकेरी दु:खामध्ये नाट्य नसतं. सुखांच्या अपेक्षांचा रंग दु:खाला आणि दु:खाच्या धास्तीचा रंग सुखाला चढवण्यात नाट्य असतं. चार वेदांमधून अंश घेऊन नाट्याची निर्मिती झाली. ऋग्वेदातून पाठ्य, सामवेदातून गाणं, यजुर्वेदातून अभिनय व अथर्व वेदातून रस घेऊन पाचवा वेद नाट्यवेेद रचला आणि हे नाट्य साकारण्याचं साधन भाषा. संप्रेषणाचे माध्यम भाषा. नाटक ही जिवंत कला आहे. भाषेतील नाजूक गोष्टी, उच्चार, शब्दसंपदा, व्याकरण याची जाणीव नाटक सादर करणार्‍यांना असते असायला हवी आणि ती रसिकांपर्यंत पोहोचायला हवी.

मातृभाषेची गंमत अशी की, ती आपण बोलायला आधी शिकतो व त्यातील व्याकरण, भाषेचे नियम आपण नकळत शिकतो. पण ज्या वेळेला आपल्याला एखादी व्यक्तीरेखा, एखादा आशय पोहोचवायचा असतो, त्यावेळी भाषेचा समर्पक वापर महत्त्वाचा असतो. कुठला काळ, कुठला समाज, कुठली व्यक्तीरेखा आहे, त्यानुसार भाषा बदलत जाते.

माझी आई शिक्षिका आणि अभिनेत्री. तिने एक प्रयोग केला. एका शाळेतील एका वर्गाला नियमित पद्धतीने शिकवलं व एका वर्गाला नाट्यपद्धतीतून शालेय शिक्षणाचा भाग शिकवला. सहा महिन्यानंतर नाट्य पद्धतीने शिकवलेल्या वर्गातील मुलांची गुणसंख्या आणि महत्त्वाचं म्हणजे आकलन अधिक खोल होतं. एखादा गंभीर विषय देखील दृकश्राव्य माध्यमातून मांडला जातो तेव्हा तो कळण्यास पटण्यास आणि रुजण्यास सोपा जातो. हाच प्रत्यय मी सध्या घेत आहे ‘मधुराव बोरु ते ब्लॉग’ ह्या नाटकाच्या निमित्ताने. नाटकाचा विषय मराठी भाषेचा जन्म आणि दोन हजार वर्षांचा प्रवास हा आहे. आता हा विषय व्याख्यानाचा किंवा क्लिष्ट वाटेल असा असू शकतो, पण तो आम्ही नाट्य, नृत्य, अभिनय ह्या कलेच्या विविध अंगाने सादर करतो आणि हा अनुभव घेऊन मराठी भाषेचा अभिमान, मराठी भाषेविषयी आत्मियता निर्माण होते. सगळे भारावून जातात आणि उत्तेजित होतात भाषेचा अधिक वापर करण्यासाठी. करमणुकीच्या माध्यमातून विषय लवकर पोहोचतो, कळतो आणि मनात घर करून राहतो. एक आठवण म्हणून आपल्या मन:पटलावर छापला जातो. ज्याची क्षणचित्रं मध्येमध्ये डोकं वर काढतात. कितीतरी तरुण मुलंही ह्या नाटकानंतर भेटायला येतात आणि सांगतात ‘आता आम्ही मराठी वाचण्याचा प्रयत्न करू’ आणि फक्त रसिक प्रेक्षक नाही तर सादरकर्त्यांनाही अनेक गोष्टींचं भान येतं. भाषा वापरायची कशी? सादर कशी करायची? विरामचिन्हांचा उपयोग कसा करायचा? वाक्य कुठे ताणायचं, कुठे तोडायचं? कुठल्या शब्दावर जोर द्यायचा? कुठल्या शब्दाचा उच्चार कसा करायचा? शब्दफेक, शब्दांचं वजन, त्याला भावनेची जोड, ह्या सगळ्या गोष्टींमुळे वेगळा परिणाम साधला जातो. त्यामुळे भाषा हे कलेचं महत्त्वाचं साधन ठरतं. भाषेलाही शास्त्र आहे आणि कलेलाही शास्त्र आहे. म्हणूनच नाटक, चित्रपट संगीत, नृत्य, चित्रकला ह्या सर्व कलेतून भाषेचं सांस्कृतिक चित्रण होत असतं. ह्या कलेच्या माध्यमातून आपली नैसर्गिक ऊर्मी असते त्या पद्धतीने आपण व्यक्त होत असतो. एखादं शिल्प असो, चित्र असो किंवा आपल्या देवनागरी लिपीचं सुंदर अक्षरलेखन (कॅलिग्राफी) असो ही व्यक्त होण्याची आणि त्याचा अनुभव घेता येईल अशी कला असते. त्यातून आपली परंपरा झळकत असते. उदाहरणादाखल आपण जर राज्याभिषेकाचं चित्र घेतलं तर त्यातून आपला इतिहास आपल्याशी संवाद साधत असतो. ते प्रत्येक मराठी मनात ठसतं.

संगीत, लोककला ह्यांच्या माध्यमातूनही भाषा समृद्ध होत असते आणि तिचं जतन होत असतं. भारुड, कीर्तन, गोंधळ अशा लोककलेच्या माध्यमातून बोलीभाषा, भाषेचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचत असतो. भावगीते, भक्तिगीते ह्यातून भाषेची अभिव्यक्ती प्रतीत होत असते. शब्दांमुळे त्यांना अर्थ निर्माण होतो आणि अर्थाने भावना जागृत होतात.

खरंतर ह्या पारंपरिक गोष्टी जपायलाच हव्या, पण नव्या पिढीसाठी आधुनिक संगीत असेल, रॅप संगीत असेल, किंवा फ्युजन असेल ह्या वेगळ्या बाजातूनही मराठी भाषा ठरवलं तर जपता येऊ शकते. किंवा आजकाल आपण तंत्रज्ञानाचे नवीन पैलू पाहत आहोत, अनुभवत आहोत ते भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, त्यातही मागे न पडता डिजिटल माध्यमातून, सोशल मीडिया माध्यमातून मराठीचा प्रचार, प्रसार, वापर व्हायला हवा. तंत्रज्ञानाला नावं ठेवण्यापेक्षा त्याचा योग्य वापर करायला हवा. मराठीतून लिहून बोलून व्यक्त होणारी नवीन पिढी आहे, फक्त त्यांना दिशा मिळणं महत्त्वाचं आहे. नवं संशोधन व्हायला हवं तसंच नव्याचा स्वीकार स्वागतार्ह हवा. यूट्यूब, ब्लॉग, पॅाडकास्ट, इन्स्टा, फेसबुक ह्या माध्यमातून छोटेखानी छान कार्यक्रम करून भाषा पोहोचवता येते.

पुन्हा एकदा याचाही अनुभव आम्ही सध्या घेत आहोत. ‘इंटरनेबल मराठी’ हा कार्यक्रम आम्ही माझ्या यूट्यूब वाहिनीवर सादर करतो. मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी साहित्य याविषयी पटकन सापडणार नाही अशी माहिती आम्ही रंजक पद्धतीने मोजक्या वेळात सादर करतो. त्याला गोष्टरूप देऊन सादर केल्याने ते लोकांना आवडतं. वाचन, अभिवाचन, नाट्यवाचन ह्या माध्यमातून महत्त्वपूर्ण प्रभावी सादरीकरण करता येतं आणि फक्त मोठ्यांनाच नाहीतर लहान मुलांनासुद्धा हे आवडतं. ही पद्धत वापरल्याने आज अनेक शाळांमध्ये, महाराष्ट्रातच नव्हे तर भारताबाहेरही हे आमचे भाग दाखवत आहेत. याने भाषाविषयक माहिती आणि भाषेची महती रंजनाद्वारे पोहोचते.

मला नेहमी वाटतं, मातृभाषेत शिक्षण व्हायला हवं हा मुद्दा अगदीच पटणारा आहे. परंतु मराठी शाळांची परिस्थिती आणि मराठी शिक्षकांची परिस्थिती फार बरी नाही. मराठी शिकवणारे तेवढे कार्यक्षम नाहीत. त्यामुळे मला वाटतं, माध्यम कुठलंही असलं तरी शिकवणार्‍यांची क्षमता वाढवणं, त्याला आकार देणं महत्त्वाचं आहे. ह्या दृष्टीने त्यांना तयार करणे ही काळाची गरज आहे. मग ह्या कलापद्धतींचा वापर सहज आणि अभ्यासपूर्वक करणंही महत्त्वाचं ठरतं. मुलांना शिकवताना वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा नाट्यवाचन स्पर्धा किंवा वाचन गट तयार करणे, नाट्य शिबीर, व्यक्तिमत्त्वविकास शिबीर घेणे. चित्रकला स्पर्धा, कविता वाचन इत्यादी स्पर्धाच्या अनेकाविध उपक्रमांच्या सहाय्याने सणवार, महत्त्वाचे दिवस ह्यांच्या गोष्टी सांगून वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून शिकवलं तर भाषेची, वाचनाची रूची वाढेल. तसंच, त्यासाठी शिक्षकांना देखील सक्षम करण्यासाठी त्यांचेही वर्ग घ्यायला हवे. अशाने नवनिर्मिती होत राहील, नवीन संकल्पनांना वाव मिळेल, उत्साह, सकारात्मक ऊर्जा वाहत राहील. तसंच नवीन माध्यमांमध्येही मराठीला स्थान देणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता यातही आता मराठीचा समावेश केला पाहिजे आणि भाषा सर्वदूर पोहोचवली पाहिजे.

थोडक्यात काय, तर कला म्हणजे केवळ सृजनशीलता नसून ती मनातील भावना, विचार आणि अनुभवांची सुंदर अभिव्यक्ती असते. कला ही कोणत्याही बंधनात अडकणारी गोष्ट नाही तर ती मुक्त, स्वच्छंद आणि अंतर प्रेरणांनी वाहणारी असते. कला ही शब्दांमध्ये असते, रंगांमध्ये असते, संगीताच्या स्वरांमध्ये, नृत्यांमध्ये तालामध्ये, अभिनयाच्या भावांमध्ये, अगदी शांततेतही व्यक्त होऊ शकते. ती फक्त बाह्य अभिव्यक्ती नसून ती अंतर्मनाच्या खोल भागातून येणारी एक विलक्षण शक्ती असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये कला असतेच, फक्त तिला ओळखून, जोपासून मुक्तपणे व्यक्त करण्याची गरज असते. त्यामुळे कला म्हणजे जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि भाषा म्हणजे केवळ शब्दांचा समूह नाही तर ती विचारांची देवाण-घेवाण करण्याचं प्रभावी साधन आहे. संवाद असं माध्यम आहे जे माणसाच्या भावनांना, संकल्पनांना आणि संस्कृतीला अभिव्यक्त करते. भाषेच्या माध्यमातून इतिहास जपला जातो. साहित्य साकारले जाते आणि त्याचबरोबर समाजाची ओळख निर्माण होते. ती केवळ बोलण्यापुरती मर्यादित नसून लेखन, हावभाव कला आणि संगीत माध्यमातूनही व्यक्त होते. प्रत्येक भाषेचा स्वत:चा आत्मा असतो, लय असते आणि सौंदर्य असते. ती माणसाला एकत्र आणते. नात्याने बांधते आणि जगण्याला अर्थ देते. म्हणूनच भाषा केवळ संवाद नव्हे, तर संस्कृतीची शान आणि ओळख असते.
भाषा आणि कला यांचा अनुबंध त्यांना एकमेकांपासून वेगळा न करणारा असा आहे. एकात एक ओवलेला आहे. भाषा मुकुटातील कोहिनूर आहे आणि त्याचा साचा कलांनी भक्कम ठेवला आहे. म्हणूनच भाषासंवर्धन म्हणजेच कलेचंही संवर्धन आहे आणि ते करणं हे आपलं कर्तव्य आहे.

कलेविना भाषा न शोभते,
भाषाविना न कला प्रसिद्धा।
उभे हि संयोगवशात् प्रवर्धेते,
संस्कृतिरेषा सततं विराजते॥
साहित्य-संगीत-कलाविहीन:
साक्षात्पशु: पुच्छविषाणहीन:

ह्या सुप्रसिद्ध संस्कृत वचनात साहित्य आणि कला ह्या माणसाला पशु ह्या पातळीवरून वर आणून मनुष्यत्व देण्यासाठी तुल्यबळ सांगितल्या आहेत.

– मधुरा वेलणकर-साटम

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech