अभिमानलेणे मायबोलीचे…

0

इतर भाषकांना ‘मराठीचा आदर बाळगा’ असं सांगण्याअगोदर खरी गरज होती ती मराठी माणसांच्या मनात मराठीचा अभिमान रुजवण्याची. मराठीला गरज होती एका अभिमानगीताची! ह्या एका गाण्याने माझं आयुष्य बदलून टाकलं होतं आणि माझा हा वसा एका गाण्यावर थांबणार नव्हता हेही माझ्या ध्यानात आलं होतं. मराठी माणूस एकत्र येत नाही ही दंतकथा आहे अशी खात्री मला पटली आणि माझ्या मातृभाषेशी माझं नव्यानं नातं जुळलं.
……………………………….

आपल्याला पाय आहेत ही जाणीव आपल्याला सर्वांत अधिक कधी होते? खूप चालून पाय दुखू लागले की जशी पायांच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव होते, तशी एरवी कधीच होत नाही! पडसं झालं की नाकाच्या अस्तित्त्वाचा जाणीव, बोट चिमटलं की बोटाच्या अस्तित्वाची जाणीव! तसंच जेव्हा माझी अस्मिता दुखावली गेली तेव्हा मी एक मराठी माणूस, एक मराठी संगीतकार असल्याची जाणीव मला झाली.

एका जिंगलच्या ध्वनिमुद्रणाच्या निमित्ताने मी मुंबईमधल्या एका व्यावसायिक रेडिओ वाहिनीच्या (एफ.एम. स्टेशन) स्टुडियोमध्ये गेलो होतो. काम झाल्यावर तिथे माझा मित्र असलेल्या एका रेडिओ जॉकीला अगदी सहज विचारलं –
‘काय रे, तुमच्या वाहिनीवर मराठी गाणी का नाही लागत?’
‘आमची पॉलिसी आहे.’ त्याने उत्तर दिलं.
‘तुमची महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी गाणी न लावण्याची पॉलिसी आहे?’ मी आश्चर्याने विचारलं.
त्याने मान डोलावली.

‘अशी पॉलिसी तुमची भारताच्या कुठल्या इतर शहरामध्ये आहे? कोइमतूरमध्ये तमिळ गाणी लावणार नाही, अशी पॉलिसी आहे? बेंगळुरूमध्ये कन्नड गाणी लावणार नाही, अशी पॉलिसी आहे? कोलकात्यामध्ये बंगाली गाणी लावणार नाही, अशी पॉलिसी आहे?’
‘अरे, मुंबईची गोष्ट वेगळी आहे मित्रा!’ त्याने मला समजावलं, ‘मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे.’

‘मान्य आहे ना. कॉस्मोपॉलिटन बेंगळुरूही आहे! पण तिथे कन्नड गाणी लागतात की. कारण बेंगळुरू कर्नाटकाची राजधानी आहे. तसं मुंबईही महाराष्ट्राची राजधानी आहे. मग इथे मराठी गाणी लावायची नाहीत, असं धोरण तुम्ही अवलंबता?’
पहिल्यांदा माझा मित्र निरुत्तर झाल्यासारखा झाला. मी पुढे म्हणालो –

‘तुम्ही हिंदी गाणी लावता आणि त्याचा आनंद आहेच आम्हाला. तुम्ही पंजाबी गाणी लावता, याचाही आनंद आहे. पण पंजाबी ते कॉस्मोपॉलिटन आणि मराठी ते र्ींशीपरर्लीश्ररी हा न्याय कुठला? म्हणजे रब्बीचं ‘बुल्ला की जाणां’ तुम्हाला चालतं, पण सलील-संदीपच्या ‘डिबाडी डिबांग’चं तुम्हाला वावडं का?’
हे ऐकल्यानंतर मात्र त्या रेडिओ जॉकीने शस्त्रं खाली ठेवली. तो म्हणाला –
अरे खरं सांगायचं तर आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ना, त्यांना असं वाटतं की मराठी गाणी लावली तर रेडिओ स्टेशनला एक ‘डाउनमार्केट फील’ येईल.
इथे मात्र मी चमकलो. ‘डाउनमार्केट फील’? मराठीमुळे? एखादी भाषा ‘डाउनमार्केट’ असते असं ठरवण्याचा अधिकार ह्या तथाकथित वरिष्ठ अधिकार्‍यांना कोणी दिला? आणि मराठी डाउनमार्केट म्हणजे हास्यास्पद विधान होतं!

युनेस्कोच्या एका सर्व्हेनुसार जागात सुमारे 6500 भाषा आणि बोली भाषा आहेत. यात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषा क्रमवार लावल्या तर विकिपिडियाप्रमाणे मराठीचा क्रमांक तेरावा आहे. तेरावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही आकडेवारीच्या जोरावरच ‘डाउनमार्केट’ कशी असू शकते? इतकंच नव्हे, तर काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या ‘नासा’ ह्या संस्थेने ‘व्होयेजर’ नावाचं एक यान अंतराळात पाठवलं होतं. त्या यानातून पृथ्वीवरच्या संस्कृतीची नोंद करणारी एक ‘ग्रामोफोन रेकॉर्ड’ अंतराळात पाठवण्यात आली आहे. ह्या ध्वनिमुद्रिकेचा हेतू हा की, परग्रहावरल्या जीवांना पृथ्वी आणि तिच्या संस्कृतीची माहिती उपलब्ध व्हावी. ह्या ‘गोल्डन रेकॉर्ड’मध्ये परग्रहवासीयांच्या नावे एक संदेश ध्वनिमुद्रित केला गेला आहे. हा संदेश जगाच्या 55 भाषांमध्ये ध्वनिमुद्रित केला आहे, ज्यामध्ये भारतातल्या 9 भाषा आहेत. ह्या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे.

इथेच ही कथा संपत नाही. याच ‘गोल्डन रेकॉर्ड’मध्ये पृथ्वीतलावरचं संगीतही ध्वनिमुद्रित करून पाठवलं आहे. जगाच्या वेगवेगळ्या कोपर्‍यातल्या संगीताचा यात समावेश आहे. अमेरिका, मेक्सिको, जर्मनी, अजरबैजान, पेरू, चीन, बल्गेरिया, इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रिया, अशा विविध देशांमधलं संगीत ह्या ध्वनिमुद्रिकेत आहे. यात भारताच्या संगीताचं प्रतिनिधित्व केसरबाई केरकर करतात. त्यांची बंदिश – ‘जात कहाँ हो’ ही ह्या ध्वनिमुद्रिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.
तात्पर्य काय – तर जिथे ‘नासा’ला अंतराळातही कुणी परग्रहवासी मराठी समजू शकेल असं वाटतं, तिथे महाराष्ट्राच्या राजधानीतच तुमची भाषा ‘डाउनमार्केट’ वाटेल असं म्हणणार्‍या ह्या रेडिओच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा मला मनस्वी राग आला! बरं, मराठी गाणी महाराष्ट्रात ऐकायची नाहीत तर कुठे आसाममध्ये ऐकायची?!

त्या रेडिओ जॉकी मित्राशी फार वाद न घालताच मी बाहेर पडलो आणि मला आढळलं की ही परिस्थिती मुंबईत आणि महाराष्ट्राच्या बहुतांश शहरांमध्ये अशीच आहे. मुंबईमध्ये व्होडाफोनसारख्या मोबाइल कंपन्या मराठीतून बोलायला नकार देत होत्या. पुण्यामधल्या रेडिओ वाहिन्या नवी मराठी गाणी वाजवायला नकार देत होत्या. चित्र विदारक होतं!
मुंबईमधली परिस्थिती अधिक बिकट होती आणि आहे. आज मुंबईमध्ये आपल्याला भाजीपाला मराठीतून विकत घेता येत नाही की एका जागेहून दुसर्‍या जागी मराठीतून जाता येत नाही! म्हणजे महाराष्ट्रात मुंबई आहे, पण मुंबईत महाराष्ट्र कुठेही दिसत नाही!
प्रश्न फक्त मुंबईचाही नव्हता. मराठी लोकांमध्येच मराठी भाषेच्या बाबतीत एक औदासिन्य आहे, असं प्रकर्षाने जाणवत होतं. मुळातच मराठी ‘डाउनमार्केट’ आहे, हा संकेत इतर भाषकांपर्यंत पोचतो तरी कुठून? कुणाकडून? आणि उत्तर येतं – आपल्याकडून! आणि धोक्याचा इशारा तेव्हाच असतो जेव्हा आपल्यालाच आपली भाषा डाउनमार्केट आहे असं वाटू लागतं.
माझ्या मनात विचार आला की, आपण राजकारण्यांना शिव्या घालतो, सरकारच्या नावाने ठणाणा करतो, पण ह्या सगळ्या प्रश्नाबाबत आपण काय करतोय? असा आत्मपीडाकारक प्रश्न सतत मला भेडसावत राहिला. पण मी काय करू शकत होतो? मी संगीतकार आहे आणि मी गाणं करू शकतो एवढंच एक सत्य माझ्या डोळ्यासमोर दिसत राहिलं.
इतर भाषकांना ‘मराठीचा आदर बाळगा’ असं सांगण्या अगोदर खरी गरज होती ती मराठी माणसांच्या मनात मराठीचा अभिमान रुजवण्याची. मराठीला गरज होती एका अभिमानगीताची!
तुम्ही आमच्या भाषेतल्या गाण्यांना ‘डाउनमार्केट’ म्हणता? ठीक. मग तुम्ही ‘अपमार्केट’ कशाला म्हणता? रेहमानचा स्टुडिओ, इलियाराजाचे वादक – हे ‘अपमार्केट’ आहे का? तर आम्ही तिथे जाऊन हे गाणं करू. तुम्ही म्हणता – यशराज स्टुडिओ एशिया खंडातला सर्वांत आधुनिक स्टुडिओ आहे? आम्ही तिथे ह्या गाण्याचं ध्वनिमुद्रण करू. तुम्ही म्हणता बिश्वदीप चॅटर्जी (ज्यांनी थ्री इडियट्स, हम दिल दे चुके सनम, किंवा आत्ताचा बाजीराव मास्तानी ह्या चित्रपटांचं ध्वनिनियोजन केलं) हे भारतातले आघाडीचे ध्वनिसंयोजक आहेत? तर आम्ही त्यांना सांगू ह्या गीताचं ध्वनिनियोजन करायला. ह्या गाण्यात दहा नाही, वीस नाही, शंभर नाही – तीनशे गायक गातील. जगातलं सर्वांत भव्य गाणं आम्ही मराठीत करू, मराठीबद्दल करू आणि मग तुम्ही आम्हाला सांगून दाखवा की हे ‘डाउनमार्केट’ आहे म्हणून आम्ही ते लावणार नाही.

मग शब्दांचा शोध सुरू झाला. आधी विचार आला की, महाराष्ट्रगीत पुन्हा करावं का? श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा’ ह्या गीताच्या वास्तविक दोन प्रचलित चाली होत्या. एक शंकरराव व्यासांची. जी ज्योत्स्ना भोळे आणि जी. एन. जोशी गायले होते आणि दुसरी आनंदघनची. जी लता मंगेशकर, आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर गायले होते. दोन्ही चालींमध्ये गोडवा होता. माझ्या मनात आलं की महाराष्ट्रगीत आपण रोज गात राहिलो असतो तरी मराठी अभिमानगीत करायची वेळच आली नसती. पण जे वापरात नाही ते गंजतं हा वैश्विक न्याय आहे आणि दुर्दैवानं काहीसं हेच ह्या महाराष्ट्रगीताचं झालं. आज पाण्याला आपण ‘जल’ म्हणत नाही, ‘तुरंग’ म्हणजे घोडे हे आपल्याला माहीत नसतं, ‘गिरा’ शब्द आता वापरात नाही! वापर नसेल तर शब्दकोशातला एक एक शब्द असाच गळून पडेल.
माधव ज्युलिअन यांच्या ‘मराठी असे आमुची मायबोली’ ह्या कवितेचाही विचार केला. पण ह्या दोन्ही गाण्यांमध्ये अभिमानापेक्षाही भिडस्तपणा जास्त होता. शिवाय दोन्ही गाण्यांमध्ये संस्कृतप्रचुर मराठी होती. खूप वर्षांपूर्वी ऐकलेल्या सुरेश भटांच्या ‘मायबोली’ ह्या कवितेचं मला स्मरण झालं.

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

वीज लखलखावी तसे हे शब्द माझ्या मनात लकाकले! हेच ते शब्द! पहिल्याच ओळीत भाषेबद्दल केवळ अभिमानच नव्हता तर एक तृप्तीची भावना होती, कृतज्ञतेची भावना होती. मी चाल लावायला घेतली. सुरेश भटांचे शब्दच इतके ओजस्वी होते की चाल लावायचे कष्टच पडले नाहीत. चाल स्फुरत गेली. कवितेचा प्रत्येक शब्द अन् शब्दच ती चाल सुचवत होता.

चाल लागली. पण आता प्रश्न असा होता की एवढ्या मोठ्या प्रमाणात गाणं करायचं तर पैसे लागणार होते. मला स्वत:लाच सगळा खर्च करायला आवडला असता पण स्वप्न खिशापेक्षा मोठं होतं. अस्मिता पांडे ही माझी मैत्रिण घरी आली होती. तिच्याशी गप्पा मारत असतांना मी म्हटलं. मायकल जॅकसनची एखादी सीडी 500 ला मिळते. आपण लोकांना आवाहन केलं की तुम्ही पाचशे रुपये द्या, आम्ही जगातलं सर्वात भव्य गाणं करून तुम्हाला सीडी देऊ, तर लोक देतील?

अस्मिता म्हणाली, ‘लोकांचं माहीत नाही’ – तिच्या पर्समधून पाचशे रुपयाची नोट काढत पुढे म्हणाली, ‘पण हे माझे पाचशे रुपये.’ माझ्या लक्षात आलं की यात ताकद आहे. दोन हजार लोकांनी पाचशे रुपये दिले तर खर्च तर निघेलच पण दोन हजार लोक ह्या गाण्याच्या निर्मितीमध्ये माझाही सहभाग आहे, म्हणून ते गाणं वाजवतील, गुणगुणतील, गातील!

मी मित्रांना, आप्तांना कल्पना सांगू लागलो. सुरुवातीला लोक साशंक नजरेने पहायचे. एका गाण्याने काय होणार? पासून हे तू स्वत:ला प्रसिद्धी हवी म्हणून करतो आहेस! असे अनेक प्रश्न, आरोप झाले! मी शांतपणे सर्वांना उत्तरं द्यायचो.

‘एका गाण्यानं काय होणार? मला खरंच माहित नाही, पण हिमालयाची यात्रा करायची असेल तरी पहिलं पाऊल घराबाहेर टाकाल की नाही? किंवा मला प्रसिद्धी हवी म्हणून करत असलो तरी सुरेश भटांचंच गाणं करणार ना? सवंग मार्गानं तर प्रसिद्धी मिळवणार नाही? आणि मला जी मेहनत घ्यावी लागेल ती लागेलच की!’ अशी उत्तरं द्यायचो. पण हळूहळू माझ्या म्हणण्यातली कळकळ लोकांपर्यंत पोचत गेली असावी आणि दोन महिन्यातच पैशाचा ओघ सुरू झाला. मग मी चेन्नईला गेलो. रेहमानच्या स्टुडिओत इलियाराजाच्या वादकांना घेऊन गाण्यातल्या स्ट्रिंग्ज ध्वनिमुद्रित केल्या. मुंबईला येऊन माझ्या संपर्कात असलेल्या सर्व गायकांना विनंती केली की ह्या गाण्यात त्यांचा सहभाग म्हणून एक ओळ गावी. प्रतिसाद माझ्या अपेक्षेपलीकडचा होता. फक्त गायकच नाही तर मला ज्येष्ठ आणि माझे समकालीन संगीतकार माझ्या एका हाकेवर ह्या गाण्यात सहभागी झाले. चोवीस ओळींमध्ये जवळजवळ एकशे दहा प्रस्थापित गायक गायले. मग विचार आला की ह्या गाण्याचा शेवट एका भव्य समूहगानाने का होऊ नये? म्हणून मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात एके दिवशी समूहगानाचं वर्तमानपत्रामार्फत लोकांना निमंत्रण दिलं. माझा अंदाज होता की दोनशे-अडीचशे लोक येतील कारण तो सुट्टीचा दिवस नव्हता. पहिल्या 15 मिनिटात दहा बाराच लोक आले. पुढच्या अर्ध्या तासात मात्र सभागृह खच्चून भरलं आणि मोजले तेव्हा एकूण 356 लोक आले होते! गंमत म्हणजे ह्या 356 लोकांमध्ये केवळ मराठीच नाही तर गुजराती, सिंधी, पंजाबी, मारवाडी, तमिळ, मल्याळी, हिंदी, बंगाली असे विविध भाषक लोक आले होते, तेही आपणहून! स्वत: संगीतकार असलेला विनय राजवाडे ह्या माझ्या मित्राने समूहगानाचं अप्रतिम संयोजन केलं. खरं सांगायचं तर त्या दिवशीपर्यंत आपण नेमकं काय केलंय याचा अंदाज आला नव्हता. पण ध्वनिमुद्रण झाल्यावर जेव्हा सर्वांना ते गाणं ऐकवलं आणि शेवटी 356 लोकांचा आवाज एकमेकांमध्ये मिसळला तेव्हा त्या गाण्याचा आवाका लक्षात आला. माझ्यासहित तिथं उपस्थित सर्वंच गायकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यात पाणी दाटून आलं.

2008च्या सप्टेंबर महिन्यात सुरू झालेलं हे गाणं 27 फेब्रुवारी 2010ला ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये प्रकाशित झालं तेव्हा 8000 लोक उपस्थित होते. गाणं झाल्यानंतर ते सगळे उठून उभे राहिले आणि टाळ्यांचा गजर थांबेचना एवढंच मला आठवतंय. सव्वा वर्षाच्या माझ्या प्रवासात महेश वर्दे, उन्मेष जोशी, उत्पल मदाने ह्या माझ्या अनेक मित्रांनी साथ दिली. पण ह्या संपूर्ण सव्वा वर्षाच्या कालावधीत जो मित्र सावलीसारखा सोबत राहिला तो म्हणजे मंदार गोगटे! हे गाणं माझं स्वप्नंच होतं! पण मी पाहिलेल्या स्वप्नावर विश्वास ठेवून श्रद्धेने काम केलं ते मंदारने. ह्या सव्वा वर्षात मी आणि मंदारने दुसरं एकही व्यावसायिक काम केलं नाही!

गाणं तयार झाल्यावर मी मुंबईच्या बिग एफ.एम. इथे फोन लावला आणि त्यांच्या अधिकार्‍याशी बोललो. त्यांनी गाणं ऐकताक्षणी अनेक वर्ष चालू धोरणाला बगल दिली. 27 फेब्रुवारीला गाणं प्रकाशित झालं आणि 28 फेब्रुवारीला सुरेश भटांचे शब्द मुंबईच्या खासगी एफ.एम. वाहिनीवर दुमदुमले. पुण्याच्या रेडिओ मिर्चीनेही ह्या गाण्याची दखल घेतली आणि मराठी गाण्यांकरता पुरस्कार सुरू केले. जगात जिथे जिथे म्हणून मराठी माणूस आहे तो हे शब्द गायला लागला. अमेरिकेत जन्माला आलेली मराठी मुलं आनंदाने हे गीत गाऊ लागली. शेखर रहाटे नावाच्या आंतरराष्ट्रीय कीर्तिच्या फॅशन डिझाइनरने ऑस्कर अवॉर्ड्सपूर्व फॅशन शोमध्ये मराठी अभिमानगीतावर रॅम्पवॉक सादर केला! मुंबईच्या गोरेगांवकर शाळेच्या 1500 मुलांना मराठी अभिमानगीत गाताना पाहून रत्नागिरीतल्या दोन शिक्षकांना वाटलं की हेच आपल्या शहरातही झालं पाहिजे आणि 26 जानेवारी, 2011 रोजी रत्नागिरीच्या शिवाजी स्टेडियमवर इंग्रजी, मराठी, आणि उर्दू माध्यमातल्या 8000 मुलांनी हे गीत एकत्र सादर केलं तेव्हा तिथे जमलेल्या लोकांचे कंठ दाटून आले होते. पद्मभूषण संगीतकार श्रीनिवास खळेंपासून संगीतकार प्यारेलाल शर्मा ते महानायक अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत सर्वांनाच ह्या गाण्याची मोहिनी पडली.
एका गाण्याने काय होणार? असं म्हणणार्‍या माझ्या मित्रांना उत्तर मिळालंय का ते माहीत नाही, पण मला ते मिळालंय. एका गाण्याने माझं आयुष्य बदलून टाकलं होतं आणि माझा हा वसा एका गाण्यावर थांबणार नव्हता हेही माझ्या ध्यानात आलं होतं. मराठी माणूस एकत्र येत नाही ही दंतकथा आहे अशी खात्री मला पटली आणि माझ्या मातृभाषेशी माझं नव्यानं नातं जुळलं.

– कौशल इनामदार

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech