नांदो वैभवात पुन्हा

0

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे ही नक्कीच अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. परंतु अशा अभिनंदनाच्या सोहळ्यात किती गुंतायचे याचाही सारासार विवेक हवा. पंचारती उजळण्यात आनंद नक्कीच आहे, परंतु ती झाल्यावर, सरस्वतीच्या गाभार्‍यात गेले पाहिजे. तिची वीणा पुन्हा लख्ख केली पाहिजे, अशा वज्रकठोर साधनेस सुरुवात करणे, हे नव्या पिढीपुढील महत्त्वाचे आव्हान आहे.

निसर्गाचा नियम असा आहे की जे सबळ आहे, जे सखोल आहे, तेच टिकते. इतर दुर्बळ असताना आपण टिकून राहणे यात काही मातब्बरी नाही. विविध काळात हल्ले केवळ मानवी समूहावर होत नसतात, तर संस्कृतीवरही आक्रमणे होतात आणि भाषा हे आत्मिक, अत्यंत प्रवाही आणि चैतन्यशील संस्कृतीचे रूप आहे. म्हणूनच, एखाद्या वैभवशाली परंपरेला, राज्याला नाहीसे करायचे असेल तर आक्रमक भाषा नष्ट करायला घेतात हा इतिहास आहे. ज्याप्रमाणे सत्तालालसी आक्रमक एखाद्या सुंदर दिसणार्‍या लेण्यावर हल्ला करतात, ती विद्रूप करतात आणि त्यांना वाटते आपण ही संस्कृती, हे राज्य नष्ट केले, परंतु अवकाशातले चैतन्य पुन्हा नवे कलावंत निर्माण करते. पुन्हा नवीन शिल्पकार  नवीन लेणी तयार करतात. आक्रमणाला आक्रमणाने उत्तर द्यायचे नसते; आक्रमणाला उत्तर द्यायचे असते, ते त्याहून सबळ नवनिर्मितीने. आज मराठी भाषेपुढे आणि अर्थातच नव्या पिढीपुढे हेच एक आव्हान आहे की, पुन्हा एकदा नव्या सशक्त सर्जनशीलतेने तयार व्हा! सतत इंग्रजी परकीयांचे आक्रमण, आता मराठी भाषेचे कसे होणार? अशा तर्‍हेने रडत राहणे हे काही मराठीपण नाही, तर कितीही आक्रमणे होऊ द्या, आम्ही ती परतावायला अत्यंत सबळ आहोत ही जिद्द हे आता आपल्यापुढचं पहिलं आव्हान आहे. गोष्टी सहज मिळाल्या की त्या जपून ठेवण्याची उर्मी राहत नाही. मराठी भाषा ही सुद्धा, आपल्याला अगदी विनामूल्य, सहज हवेसारखी आणि आकाशासारखी फुकट मिळाली आहे, अशीच अनेकांची भावना असते. आपल्या मराठी भाषेबद्दल तसेच झाले आहे का?

आपल्याला परंपरागत वारसा हक्काने मराठी भाषा मिळाली आणि म्हणूनच ती आपल्याला तितकीशी जतन करता आली नाही. पन्नासएक वर्षांपासून आपण ह्या आक्रमणाच्या चाहुलीने थोडे जागे व्हायला हवे होते, निदान कूस तरी बदलायला हवी होती, पण तसे झालेले दिसत नाही; उलट आपण गाफील राहिलो आणि त्यामुळे इंग्रजीचे बोट धरून अनेक धनदांडगे शिक्षण ह्या स्वधर्माचा व्यवसाय नव्हे; धंदा करण्यासाठी ह्या क्षेत्रात घुसले आणि त्यांनी एकंदरच शिक्षणाचे आणि शिक्षक ह्या पदाचे ओघाने आपल्या परंपरेचे आणि आपल्या भाषेचे वाटोळे करण्याचे व्रत हाती घेतले. शिक्षणसेवक निमाले नि शिक्षणशोषक तणासारखे फोफावले. आपणच त्याचे शिक्षणसम्राट म्हणून कौतुक केले; प्रतिष्ठेसाठी त्यांनी साहित्यसंमेलनेसुद्धा आपल्या कब्जातून सोडली नाहीत. शिक्षणाचे आश्रम जाऊन शिक्षणाचे मॉल उभे राहिले आणि अर्थातच जागतिकीकरण साद घालत असल्यामुळे त्या पिढीला, नव्या पिढीला नव्या प्रदेशाची निमंत्रण येऊ लागली.

आपली त्या काळातली आर्थिक  व मानसिक गरिबी, त्यात सातत्याने महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणारे राजकारणीच आपल्याला लाभले. केवळ मतांचा एकगठ्ठा वाटा, नि सत्तेचा फुगवटा आणि त्यामुळे भाषेचा दुखावटा ही त्री-सूत्री जन्माला आली. आता त्या सगळ्या भूतकाळात न गुंतता पुढे जायला हवे. परंतु ही शोचनीय स्थिती का निर्माण झाली, याचा काहीसा शोध घ्यावा, म्हणूनच हा उहापोह केला. इतक्या वर्षांनी सगळ्यांच्या प्रयत्नाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे, ही नक्कीच अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. परंतु अशा अभिनंदनाच्या सोहळ्यात किती गुंतायचे याचाही सारासार विवेक हवा. पंचारती उजळण्यात आनंद नक्कीच आहे, परंतु ती झाल्यावर, सरस्वतीच्या गाभार्‍यात गेले पाहिजे. तिची वीणा पुन्हा लख्ख केली पाहिजे, अशा वज्रकठोर साधनेस सुरुवात करणे, हे नव्या पिढीपुढील महत्त्वाचे आव्हान आहे.

केवळ पोटार्थी समाज पोट भरण्यावाचून काहीही करू शकत नाही. तो जिवंत राहू शकतो, तो आरोग्य टिकवू शकतो, पण तो त्या आरोग्याला, सुरेल जगण्याचा मंत्र देऊ शकत नाही. त्यामुळे जीवन आणि जीवनसत्व ह्या दोन्ही गोष्टींच्या संगमानेच भाषा पुढे जाते. आपल्याला केवळ बोलता येणे किंवा थातूरमातूर लिहिता येणे म्हणजेच केवळ भाषा उमजणे नव्हे, त्या  भाषेतील लेखनामध्ये प्रतिभेचा झंकार उमटणे, नवनिर्मितीचे स्पंदन प्रकटणे महत्त्वाचे, त्यासाठी आपल्या पूर्वसुरींनी आपल्याआधी जी उत्तुंग नवनिर्मिती केली, त्याचा आस्वाद घेण्याचीही मराठी भाषिकांना गरज आहे. नव्हे; तसा आग्रह असायला हवा आणि म्हणूनच आपल्या पुढचे आव्हान हे आहे की, आपण केवळ आपल्या अभिमानाच्या आवरणाखाली  संकुचितपणाचा कोश विणण्यापेक्षा आता मातृभाषा मराठी ही जागतिक कशी होईल, वैश्विक कशी होईल, याची काळजी घ्यायला हवी. ज्याप्रमाणे उंच माणसांच्या गर्दीत एखाद्या उंचीने कमी असलेल्या माणसाला आपण बुटके आहोत, हा न्यूनगंड अनेकदा असतो, परंतु जपानी माणसाचा आदर्श घ्यायला हवा. ज्याप्रमाणे उंच्यापुर्‍या युरोपियन माणसांपुढे तो न्यूनगंड झटकून, कतृर्र्त्वाने उभा राहिला. जगात आपणच सर्वोच्च आहोत, हा सन्मान मिळवला. कशाच्या बळावर? तर निसर्गाने कदाचित उंची कमी दिली असेल पण, बुद्धी आणि अथक प्रयत्न यामुळे कर्तबगारीची उंची वाढवली. गंगाधर गाडगीळ यांनी जपानी माणसाबद्दल म्हणून ठेवले आहे, ते म्हणतात, आपल्या कतृर्र्ृत्वाने जपानी माणसाने हे सिद्ध केले आहे की आपण जगात सर्वात उंच आहोत. आता मराठी भाषा आणि तिची अभिजातता टिकून राहण्यासाठी अशाच अथक प्रयत्नांची गरज आहे. आपण केवळ राज्यापुरता, प्रदेशापुरता, असे न राहता आपण वैश्विक आहोत, हीच आपल्या मनामध्ये भावना निर्माण करणे ही काळाची गरज आहे आणि नव्या पिढीने ही गरज समजून घ्यायला हवी.

अभिजात मराठीबद्दल इतके बोलले जाते, लिहिले जाते की वर्षभर किंवा आणखी दोन वर्षं ह्या निमित्ताने अनेक संमेलनांत जल्लोष साजरे होतील. त्यातून भाषेच्या निर्मिती आणि समृद्धीपेक्षा सुद्धा त्यातून आपल्याला मलीदा कसा मिळेल, हेही बघणारे धनदांडगे निर्माण होतील. कारण त्यांना कशाचेच काही सोयरसुतक नसते. फक्त त्यांना आर्थिक कमाई आणि त्यामुळे मिळणारी बेगडी प्रतिष्ठा हवी असते. याही क्षेत्रात ही मंडळी नक्की येणारच, कारण ते नेहमीच अशाप्रकारचा उद्योग शोधत फिरत असतात आणि यांच्यापासून युवा पिढीने सावध व्हायला हवे.

का बरे करताहेत भाषेचा आग्रह? याचा अर्थ इंग्रजीकडे किंवा जर्मन भाषेकडे किंवा आणखी फ्रेंच भाषेकडे दुर्लक्ष करायला सांगत आहोत का? अगदी मोजकीच परंतु अभिमानास्पद अशा एकाचवेळी उत्कृष्ट मराठी आणि त्याच वेळेला सर्वोत्तम इंग्रजी अशी प्रभुत्व असलेली काही व्यक्तिमत्त्वं मी आपल्यापुढे ठेवतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे असे कितीतरी दिग्गज! जागतिक भाषा त्यांना अवगत होती आणि म्हणून ते विश्वविख्यात झाले, परंतु आपले लोकोत्तर कार्य करताना त्यांनी आपली निर्मिती, आपले चिंतन, हे मातृभाषा मराठीतच असावे, ही काळजी घेतली.इतिहासातील महापुरुषांची उदाहरणे घेतली की, आपण म्हणतो ते थोरच होते, पण अलीकडचे काय, अगदी मोजकीच उदाहरणे. विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर, अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, शास्त्रज्ञ विजय भटकर, विख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ  माशेलकर असे अनेकजण उत्कृष्ट इंग्रजीमुळे जगात सर्वमान्य झाले. परंतु ते उत्कृष्ट मराठी बोलू शकतात, लिहू शकतात, ह्याचं कारण त्यांनी आपली ज्ञानाची, अभिव्यक्तीची भाषा विश्वभाषा इंग्रजी ठेवली. परंतु त्याचबरोबर आपली परंपरा, संस्कृती आणि संवेदना त्यांचे भान जागे ठेवणारी मराठी जपली, याची नोंद घ्यावी.

इंग्रजीत व्यक्त होणे हा कुठल्याही प्रकारचा आजार समजू नये तर, त्याही भाषेत व्यक्त होणे ही काळाची गरज आहे. परंतु मूळ मात्र रुजायला हवे ते मातृभाषेत! कारण आपली मातृभाषा मराठी असणं म्हणजे फक्त अ आ इ ई उ ऊ येणे म्हणजेच मराठी येणे नाही, तर आपल्या कहाण्या, वाक्प्रचार, दंतकथा, कथा, आजी आजोबांच्या म्हणी, वाक्प्रचार, आपली स्त्री गीते, मराठीचा वेलू गगनावर नेणार्‍या विचारवंतांची, ध्यासवंतांची चरित्रे हे विचारधन आपल्या मुलांना केवळ माहितीच असायला नव्हे तर आपल्या मुलांची ती स्फूर्तिकेंद्रे हवीत. आकाश जसे डोक्यावर असते, त्याप्रमाणे हे सगळे ग्रंथ, आपल्या पाठीशी असतात आणि नक्कीच त्यामुळे आपण पुढे जात असतो. आपल्या रक्तातला लाल रंग, भिनलेला प्राणवायू जितका आपल्यात असतो तोच आपल्याला चैतन्य देतो. त्याप्रमाणे भाषा ही सुद्धा आपल्याला प्रवाही ठेवत असते. केवळ शरीराने नव्हे तर अंतर्मनाने जिवंत ठेवत असते. आपल्यामधील मातृभाषाच काढून टाकली तर रक्ताचा लाल रंग काढून त्याठिकाणी पांढरा भरला तर जे होईल तेच आपले मातृभाषेविना होईल. आज तेच होते आहे. नव्या पिढीपुढचे आव्हान हे आहे की उत्तम मराठी जपून विश्वभाषा ही आलीच पाहिजे, एक भाषा म्हणून कागदोपत्री मातृभाषा अपरिहार्य करणे हा झाला केवळ वरवरचा गिलावा, ही अपरिहार्यता शिक्षा वाटायला नको, ती संधी वाटायला हवी. अनिवार्यतेचे रूपांतर स्वानंदात व्हायला हवे. अनिवार्यता असेल तर केवळ पन्नास-साठ मार्कांपुरती ही भाषा राहील, पण आपल्या अस्तित्वाशी आपली मातृभाषा एकरूप होणार नाही.म्हणून आता नव्या पिढीपुढील आव्हान आहे की आधीची पिढी आणि आजी-आजोबांची पिढी यांची पण मदत घेतली पाहिजे. तीन पिढ्यांचे मिळून हे एक कार्य आहे.

अनेक व्यासपीठांवर किंवा राजकीय सभांमध्ये एक लोकप्रिय विचार सारखा मांडला जातो, तो म्हणजे मराठीत पाट्या करा, मराठीत बोला! अर्थात याची आवश्यकता मला नक्की समजते.परंतु ह्या बाह्य गोष्टी आहेत. मराठीत बोलले पाहिजे, मराठीत पाट्या लिहिल्या पाहिजेत, पण त्या मुळात आतून आल्या पाहिजेत. केवळ एक व्यवहाराचा भाग म्हणून जो येतो तो व्यवहार, पुढे आपल्या रक्तामध्ये उतरणे ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. नव्या पिढीपुढे हे आव्हान आहे की ही जी पंचवीस तिशीची, चाळीशीची आई वडील मंडळी आहेत, त्यांनी आपल्या मुलांशी, त्यांच्या  घरगुती गप्पा, आपली बालगीते, आपली बडबड गीते पुन्हा एकदा म्हणायला सुरुवात केली पाहिजे. आपल्या मराठी भाषेतील उत्तम साहित्याच्या परंपरेची ओळख करून देणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. पण झाले काय, आता आई-बाबांची पिढीच मुळामध्ये इंग्रजीतून जगलेली, इंग्रजी शिकलेली आहे. त्यांना मराठी येत नाही याचा संकोच वाटत नाही आणि इंग्रजी येते ती केवळ पोटार्थी व्यवहारापुरती इंग्रजी येते. ह्याचा अर्थ त्यांना इंग्रजीतले अभिजात साहित्य माहिती असते असे नाही. फक्त त्यांना संगणकापुढे बसून लिहिणे, एखाद्या पार्टीमध्ये चार वाक्य, ‘हाय हॅलो’ करणे इतकेच त्यांना येत असते. प्रत्यक्षात जेव्हा विचारांनी व्यक्त होण्याची वेळ येते तेव्हा पितळ उघडे पडते, बेगडी असते. आव्हान हे आहे. आता अभिजात मराठीच्या प्रेमाचा हा बेगडीपणा उपयोगी नाही. निस्सीम भक्ती हवी भाषेवर!  आतील दांभिकपणा झुगारून पुन्हा पायाभूत काम करण्याची नितांत गरज आहे.

वाचक मित्र-मैत्रिणींनो, अगदी मनापासून सांगतो की, मराठीचा आग्रह किंवा मातृभाषेचा आग्रह आमची पिढी का धरते हे एकदा कृपया समजून घ्या! आपल्या मातृभाषेने आपल्याला संवेदनात्मक देणे दिलेले आहे. ते पुढच्या पिढीकडे देणे आम्हाला आवश्यक वाटते. इतकेच नव्हे तर मातृभाषेचे ऋण फेडण्याची ती संधी आहे असे आम्हाला वाटते. आमच्या आई-वडिलांनी आम्हाला जो वारसा दिला तो भाषेचा! विचारांची आणि उत्तम पुस्तकांची, चांगल्या कवितांची संपत्ती ठेवली. तेव्हा तुमच्या घरामध्ये पुस्तकांचे कपाट असू द्या! इतर भाषेची पुस्तके असू द्या! शेक्सपियर तुमच्याकडे असेल तर योग्यच, त्याप्रमाणे ज्ञानेश्वर – तुकाराम अशा विचारवंत संतांचे साहित्य, तेही असू द्या! इंग्रजीतला थोर कवी वर्ड्सवथ असू द्या, पण कविश्रेष्ठ कुसुमाग्रजसुद्धा तुमच्याकडे असू द्या. ज्याप्रमाणे बर्नार्ड शॉ असेल तर उत्तमच पण त्याचबरोबर आपले लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, तेही असू द्या!

यामुळे मी कधीही कुठेही इंग्रजी वापरू नका आणि इंग्रजी बोलू नका असे दुराग्रही म्हणणे मांडणार नाही. मी एकच म्हणेन की, नव्या पिढीला कळले पाहिजे. आपली मुले आणि आज तुम्ही सुद्धा सहजगत्या मराठी भाषेचा आनंद घेऊ शकता यांच्यामुळेच. विचार करा, पाण्यातली मासोळी ही पाण्यात खूप आनंदी असते. मजेत असते, पाणी सहज मिळते असे म्हणून तर त्या मासोळीला एखाद्या रंगीत अत्तर हौदात सोडली तर दोन मिनिटातच त्या मासोळीचं शव काढण्याची वेळ येईल. आज संगणकाच्या जगात, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ आले आहे, पण भाषेचे जग मात्र दूर गेलेले आहे. त्यामुळे  आपले सगळेच संबंध यांत्रिक आणि तांत्रिक होत आहेत. संबंधांना पण शुष्क व्यवहाराचे रूप आलेले आहे. घराचा मॉल होतो आहे आणि त्यामुळे एकमेकाचा एकमेकाला आदर नाही. कृतज्ञतेची वृत्ती नाही आणि मला वाटतं की ज्या घरामध्ये एकमेकाचा, नात्यांचा सन्मान नसेल, कृतज्ञता नसेल, ते घर किती प्रशस्त आणि सुंदर देखणं असेल, हवेशीर असेल तरी त्या ठिकाणी घुसमटच होणार. कारण त्या ठिकाणी तो आत्मीय नात्याचा सुगंध नाही. तो निर्माण करण्याचं, नात्यांचा उत्सव निर्माण करण्याचं काम भाषा करते. केवळ पैशाने मिळणारे आनंद नि खाण्यापिण्याचे उत्सव क्षणभंगुर असतील. ते आज असतील, उद्या नसतील. पण कुसुमाग्रजांची एखादी कविता आपल्या मनात चिरंतन रेंगाळत राहील. आपण कितीही जरी प्रगत झालो, तरी सुद्धा गणपतीची आरती इंग्रजीतून आपल्याला ऐकवेल का?

ह्या कल्पनेने सुद्धा अंगावर काढा आला की नाही? मला असं वाटतं, यातच उत्तर आहे! कारण मखरातल्या गणपतीपेक्षासुद्धा ह्या समर्थ रामदासांच्या शब्दाचा, त्यातील सौंदर्याचा गणपती हा आपल्या मनात परंपरेने प्रतिष्ठापना केलेला असतो. कारण तो आपल्या मातृभाषेत असतो. म्हणून हे मुळात समजून घ्या, केवळ आम्ही म्हणतोय किंवा उपचार म्हणून नको.शासकीय कार्यक्रम, वेगवेगळे उपक्रम नक्कीच महत्त्वाचे आहेत, पण त्यापलीकडे जाऊन त्या उपचारांना आनंदाचे आणि आत्मानंदाचे रूप देणे, हे एक मोठे आव्हान आहे, ते स्वीकारण्याची ही संधी आहे. सतत आक्रमण होत आहे असे म्हणत कुढण्यापेक्षा ह्या आक्रमणाला कसदार नवनिर्मितीने तोंड द्या! आपण मराठी भाषिक मराठी भाषेच्या प्रभुत्वाने विश्वही जिंकू शकतो, हा विश्वास नव्या पिढीने प्रस्थापित करणे, हीच काळाची गरज आहे. पुन्हा मराठी भाषेला ते पूर्वीचे डौलदार गतवैभव प्राप्त करून द्या!

– प्रवीण दवणे

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech